दासोपंतांची पासोडी - अंबेजोगाई

पासोडी हा प्रकार दासोपंतांनी प्रसिद्धीस आणला. पासोडी म्हणजे जाड कापड, आणि त्या कापडावर केलेली काव्यरचना होय.

दासोपंतांची पासोडी - अंबेजोगाई
दासोपंतांची पासोडी - अंबेजोगाई

महाराष्ट्राला आणि त्यातही मराठवाड्याला संतांची फार मोठी परंपरा लाभलेली आहे. ज्ञानेश्वर, रामदास आणि कितीतरी मराठवाड्यातले संत या भूमीत होऊन गेले. दासोपंत हे त्यांच्याच पंक्तीत बसणारे. मराठवाड्यातले एक महान संत-कवी. दासोपंत या नावासोबत ‘पासोडी’ हा शब्द येतोच. बीड जिल्ह्यातले अंबेजोगाई हे दासोपंतांचे गाव. दासोपंतांचा काळ हा इ.स. १५५१ ते १६१६. दत्तसंप्रदायातले फार थोर आणि अधिकारी व्यक्ती असलेल्या दासोपंतांनी अनेक काव्य रचना केल्या. त्यांना कुठल्याही विषयाचे वावडे नव्हते. अनेक विषयात त्यांनी केलेल्या विविध रचनांमुळे त्यांना लोकांनी ‘सर्वज्ञ’ अशी पदवी दिली होती. त्याचबरोबर त्यांना ‘मराठी भाषेचे कुबेर’, ‘मराठीतील महर्षी व्यास’ अशी विविध नामाभिधाने प्राप्त झाली होती.

पासोडी हा प्रकार दासोपंतांनी प्रसिद्धीस आणला. पासोडी म्हणजे जाड कापड, आणि त्या कापडावर केलेली काव्यरचना होय. ही काव्य रचना पंचीकरण म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे या पासोडीला ‘पंचीकरण पासोडी’ असे म्हणतात. दासोपंतांची ही पासोडी ४० फूट लांब आणि ४ फूट रुंद आहे. आणि दासोपंतांची ही पासोडी जवळजवळ ४०० वर्षे जुनी आहे. अंबेजोगाईमध्ये असलेल्या ‘थोरल्या देवघर’ या त्यांच्या निवासस्थानी आजही ती व्यवस्थित जपून ठेवली आहे. त्याच्यावर काचेचे आवरण घातलेले आहे. या पासोडीवर लेखन तर आहेच पण त्याचसोबत दासोपंतांनी केलेली सुंदर चित्रकलासुद्धा बघायला मिळते. वेदांताच्या अभ्यासकांना या पासोदिवरील लेखनातून विशेष माहिती प्राप्त होते. पासोडीवरील लिखाण जुन्या मराठी (प्राकृत) भाषेत असून ते जास्त करून काळ्या शाईने लिहिलेले आहे. या लिखाणाच्या मधे काही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी चित्रे काढलेली दिसतात. मार्कंडेय पुराणात सांगितलेल्या चित्रसूत्राचे तंतोतंत पालन ही पासोडी लिहिताना केलेले आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी ही ६ ऑक्टोबर १९५४ रोजी ही पासोडी प्रत्यक्ष पाहण्यासाठी दिल्लीला राष्ट्रपती भवनात मागवून घेतली होती. त्यानंतर राष्ट्रपतींनी त्या पासोडीसाठी खास एक कपाट बनवून दिले. राज्यसभेत डॉ. मौलाना आझाद आणि लोकसभेत अध्यक्ष दादासाहेब मावळंकर यांनी या पासोडीबद्दल गौरवोद्गार काढलेले असून ते संसदेच्या रेकॉर्डवर आहेत.

दासोपंतांनी संस्कृत, हिंदी, मराठी, प्राकृत, कन्नड, तेलगु, फारसी अशा जवळजवळ १० ते १२ भाषांमध्ये लिखाण केले आहे. इतक्या भाषेत एखाद्या व्यक्तीने क्वचितच लिखाण केले असेल. पासोडी ही त्यांची १ कलाकृती होती, अशा प्रत्यक्षांत त्यांनी १०० पेक्षा जास्त साहित्यकृतींची निर्मिती केलेली आहे. आणि म्हणूनच त्यांना मराठी भाषेचे ‘नवकोट नारायण’ असे म्हणतात. दासोपंत हे निस्सीम दत्तभक्त होते. खरंतर लोक त्यांना दत्तात्रेयाचा अवतारच समजायचे. त्यांच्याविषयी काही चमत्कारसुद्धा सांगितले जातात. दासोपंतांवर सन १९२२ साली जर्नल ऑफ अमेरिकन ओरीएंटल सोसायटीच्या ४२ व्या खंडात जस्टीन इ. अॅबॉट यांनी विस्तृत लेखन केलेले आहे. तसेच जेन वॉटर यांनी अमेरिकन टाईम्समध्ये दासोपंतांवर लिखाण केले आहे. दासोपंतांचे वंशज आजही अंबेजोगाईमध्ये देवघर या त्यांच्या पारंपारिक घरात राहतात. ते आवर्जून आपल्याला दासोपंतांची पासोडी तसेच त्यांचे देवघर, त्यांच्या पूजेतील मूर्ती दाखवतात. त्यांचे एक वंशज श्री दत्तप्रसाद गोस्वामी हे अंबेजोगाईच्या महाविद्यालयात प्राध्यापक असून इतिहासात विशेष रुची असणारे व्यक्तिमत्व आहे. अंबेजोगाई ही अनेक चित्पावन ब्राह्मणांची कुलादेवता. तिच्या दर्शनाला ही मंडळी नित्यनेमाने जात असतात. आता यावेळी जायचे ते दासोपंतांचे देवघर आणि त्यांची पासोडी बघूनच आले पाहिजे. इतिहासाचा एक मोठ्ठा ठेवा दासोपंतांच्या वंशजांनी जपेला आहे त्याचे अवश्य दर्शन घ्यायला हवे.

- आशुतोष बापट

सर्व प्रकाशचित्रे : श्री दत्तप्रसाद गोस्वामी