श्री जोतिबा - दख्खनचा राजा

ज्योतिबा हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध देवस्थान असल्याने येथे सदासर्वदा भाविकांची मांदियाळी असल्याने हा परिसर कायम गजबजलेला असतो.

श्री जोतिबा - दख्खनचा राजा

महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापूर जिल्ह्यात असलेले एक प्रसिद्ध श्रद्धास्थान म्हणजे श्री जोतिबा. जोतिबा हे खंडोबा, तुळजा भवानी, अंबाबाई, भैरी भवानी, काळभैरव आदीं देवतांप्रमाणेच महाराष्ट्रातील अनेक घराण्यांचे कुलदैवत म्हणून प्रसिद्ध आहे.

कोल्हापूर शहराच्या वायव्येस २० किलोमीटर अंतरावर ज्योतिबाचे स्थान असून ते रत्नागिरी नामक एका पहाडावर स्थित आहे. ज्योतिबा म्हणजे ज्योतिर्लिंगाचे पवित्र स्थान असून बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले केदारनाथ या लिंगाचे मूळ स्थान हे ज्योतिबा आहे असे म्हटले जाते. 

या स्थळास रात्नागीरी हे नाव मिळण्याचे कारण असे सांगितले जाते की प्राचीन काळी जोतिबा या देवतेचे आगमन समुद्रमार्गे येथे झाले व कोल्हापूरच्या पश्चिमेस रत्नागिरी हा जिल्हा असून समुद्रमार्गे जेव्हा देव आला तेव्हा तो रत्नागिरीमार्गे आला म्हणून या देवतेस रत्नागिरी ज्योतिबा म्हणू लागले. अशाप्रकारे रत्नागिरी ज्योतिबा हा दख्खनचा राजा जोतिबा म्हणून प्रख्यात झाला.

या देवस्थानाचे वैशिट्य हे आहे की रत्नागिरी पहाड पूर्णपणे चढून वर आल्यावर जोतिबाच्या मंदिराकडे जाण्यासाठी अनेक पायऱ्या उतरून पुन्हा काही अंतर खाली जावे लागते.

ज्योतिबा हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध देवस्थान असल्याने येथे सदासर्वदा भाविकांची मांदियाळी असल्याने हा परिसर कायम गजबजलेला असतो. मुख्य प्रवेशद्वारापासून पायऱ्या पूर्ण उतरेपर्यंत दोन्ही बाजूंस पूजा व इतर साहित्यांची विक्री होणाऱ्या दुकानांची रांग या स्थळाच्या सौंदर्यात आणखीनच भर पाडते. दूरदूरहून आलेले भाविक जोतिबाच्या नावाने चांगभलं असा जयघोष करत देवाच्या दर्शनाकरिता रांगेत उभे असतात.

मंदिरातील देव हा जोतिस्वरूप आहे मात्र त्याचे रूप हे कोल्हापुरी पद्धतीतील असून पगडी आणि घोड्यावर बसलेले आहे. देवाची मूर्ती चतुर्भुज असून सर्व हातांत प्रत्येकी खड्ग, पानपात्र, डमरू आणि त्रिशूल आहेत. मूळ ज्योत नंदादीपाच्या रूपात मंदिराबाहेरील काळभैरव मंदिराजवळ तेवत आहे. काळभैरवाचे रूप सुद्धा जोतिबासारखेच असून त्यास जोतिबाचा अंगरक्षक मानतात आणि सर्वप्रथम काळभैरव आणि नंदादीपाचे दर्शन घेऊनच मग जोतिबाचे दर्शन घेता येते. 

रविवार हा दिवस जोतिबाचा वार मानला गेल्याने जोतिबाच्या दर्शनास रविवारी विशेष गर्दी असते आणि वर्षातील चैत्र पौर्णिमा हा मुख्य दिवस असल्याने या काळात येथे मोठी यात्रा असते आणि संपूर्ण डोंगर भक्तांनी फुलून जातो. अदमासे दोन लाखाहून अधिक भाविक या ठिकाणी दूरदूरहून येतात. चैत्र पौर्णिमेसह श्रावण षष्टी, नवरात्रातील देवाचा जागर, दर पौर्णिमेस आणि रविवारी सुद्धा या स्थळी यात्रा भरते.

चैत्र पौर्णिमेस यमाई देवीच्या लग्नसोहळ्यासाठी जोतिबाची पालखी लाखो भाविकांसह मिरवणुकीने जाते. जोतिबा देवस्थानाचे भक्ती चिन्ह म्हणजे गुलाल आणि खोबरे व त्यामुळे येथे येणारे भाविक माथ्यास गुलाल लावून व खोबऱ्याचा नैवेद्य घेऊन कृतकृत्य पावतात.

जोतिबा हे स्थळ ज्या पहाडावर आहे त्यास रत्नागिरी असे नाव होते व याच नावाचे गाव गडाच्या माथ्यावर वसले आहे व त्यास वाडी रत्नागिरी म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी जुन्या काळापासून देवाचे सेवेकरी वास्तव्य करीत आहेत. या ठिकाणी १९५९ साली महाराष्ट्र सरकारने भाविकांसाठी विश्रांतीगृह बांधले आहे आणि देवस्थानाची व्यवस्था महाराष्ट्र सरकार नियुक्त देवस्थान मंडळाकडे आहे. हे मंडळ देवस्थानातील सर्व व्यवस्था पाहते. वाडी रत्नागिरी गावाची ग्रामपंचायत देवस्थानाच्या यात्रेची व्यवस्था पाहते.