वनौषधी, कंदमूळांकडे दुर्लक्ष

सध्या बाजारात खूप मोठ्या प्रमाणात वनौषधी व कंदमूळे विकायला आलेली दिसतात. अळकुड्या, कनक, कनघर, रताळी, शिंगाडा, सुरण अशा नावांची ही कंदमूळे जंगलातून आदिवासी स्त्री-पुरुष गावाच्या बाजारात विकायला घेऊन येतात. ही सारी उकडून किंवा भाजून खातात.

वनौषधी, कंदमूळांकडे दुर्लक्ष
वनौषधी, कंदमूळांकडे दुर्लक्ष

शिवाय यापैकी कित्येकांच्या भाज्या काप करुन जेवणातही घेतात. अतिशय नैसर्गिक चवीमुळे या भाज्या स्वादिष्ट तर लागतातच, पण त्या औषधी गुणधर्माच्याही असतात. पण नव्या जमान्यात त्यांच्या थोड्याशा अनाकर्षक रुपामुळे त्या फारशा कुणी खात नाहीत. त्यांच्या पाककृती तसेच त्यांचे औषधी  गुणधर्मही आता विस्मरणात जाऊ लागले आहेत. या कंदमूळांपैकी कोनफळ लाल व पांढर्‍या अशा दोन प्रकारांत मिळते. पांढर्‍या कोनफळास गुजरातीत 'गराडू' म्हणतात. दोन्हींचीही सोलून भाजी किंवा पुरी, भजी, खिर असे पदार्थ करतात. ते अन्य पिठात कालवूनही वापरतात. याच्या पानांची भाजीही करतात.

आयुर्वेदाच्या दृष्टीने कोनफळ हृदयातील कफ दूर करणारे असते. कोनफळाची पाने विंचवावर वाटून लावतात. दंश झालेल्या जागी लावल्याने विष उतरते. कोनफळात कार्बोहायड्रेटस खूप असतात. रताळे, कनक, कनघर, अळकुड्या, मीठ टाकून उकडून खातात. चुलीत भाजूनही ते खातात. पण आता घराघरातील मातीच्या चुली आणि कोळशाच्या शेगड्या नाहीशा झाल्यामुळे ते खाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. रताळीसुद्धा लाल व पांढर्‍या अशा दोन प्रकारांत असतात. शास्त्रीय मताप्रमाणे रताळ्यात  १६ टक्के स्टार्च व चार टक्के शर्करा असते. त्यात कॅल्शीयम, फॉस्फरस, सोडियम, पोटॅशियम,  लोह व थोड्या प्रमाणात सी जीवनसत्वही असते.

कित्येक बाबतीत बटाट्यापेक्षा रताळी श्रेष्ठ मानली जातात. पण आपल्याकडे उपवासाशिवाय रताळ्यांकडे कुणी फारसे लक्ष देत नाही. खरे तर रताळे घालून केलेली वांग्याची भाजीही चांगली होते. त्यामुळे वायु दोष नाहीसा होतो. पण त्या दृष्टीने रताळी तशी उपेक्षितच राहतात. तीच गोष्ट कनक, कनघर,  व अळकुड्यांबाबतही होते. कनक नावाप्रमाणेच सोन्यासारखे उपयोगाचे आहे. त्यात भरपूर प्रोटिन्स व व्हिटॅमिन्स असतात. पण याचाही वापर अधिक प्रमाणात आदिवासी मंडळीच करतात. उच्चभ्रूंच्या पानात त्याला फारसे स्थान नसते. 'शिंगाडा' तलावात होतो, पण तोही फक्त उकडून व भाजून खातात. खरे तर दुधापेक्षा शिंगाड्यात २२ टक्के खनिज क्षार जास्त असतात. ती शक्तीदायक व ज्ञानतंतूंना सुदृढ करणारी असतात. शिंगाड्याच्या पिठापासून पुर्‍या, दशम्या, पुरी, लाडू, शिरा, कढी असे बरेच पदार्थ करण्यात येतात, पण आता नव्या काळात त्याची माहिती फारशी कुणाला दिसत नाही.

रायणीचे झाडही असेच जंगलात वाढते. रायण्या ताज्या असल्याने धुवून वा कसेही खातात, काही ठिकाणी त्याला तूप चोळून खातात, त्यामुळे त्यातील दूध शोषले जाते आणि ते स्वादिष्ट बनते. ते पौष्टीक तसेच हृदयास हितकारी आहे. रायण्या कोडावर गुणकारी असतात, तसेच त्यामुळे वजन वाढते व त्यातून डिंकही निघतो. ही सारीच कंदमुळे जंगलातून ही आदिवासी मंडळी तशीच आणतात व विकायला ठेवतात. शिवाय त्यांचा आकारही वेडावाकडा असतो यामुळे ती अनाकर्षक ठरत असल्याने आजच्या दिखाऊ-झगमगाटी बाजारात दुर्लक्षित राहतात. याखेरीज वाढत्या शहरीकरणामूळे जंगल व डोंगरांवर आक्रमणे होत आहे. जंगल्-डोंगरच नाहीशी झाल्यावर कंदमुळे कुठून मिळवणार? प्रदुषणामुळेही त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. भोकर, बिब्वे, बांबूचे कोंब, खारी, माचवेल, सराटे या भाज्याही याच दिवसांत येतात. त्याही चविष्ट असतात, पण सध्या त्याही उपेक्षित आहेत.

- श्रीनिवास गडकरी