दूधाचा कुकर - एक कालवश झालेली वस्तू

साधारण सत्तर सालचा सुमार असेल. कुणाच्या घरी लग्न, मुंज, सत्यनारायणाची पूजा काहीही असेल तरी एक गोष्ट अहोरात्र हमखास मिळायची. ती म्हणजे दुधाचा कुकर! म्हणजे लग्न असेल तर पाच-सहा, मुंजीला तीन्-चार किंवा पुजेच्या आहेरात एक तरी दुधाचा कुकर हमखास असेच असे.

दूधाचा कुकर - एक कालवश झालेली वस्तू

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

तेव्हा ही गोष्ट नवीनच आली होती. त्याची साधारण बावीस तेवीस रुपये किंमत होती. पटकन लोकप्रिय होऊन घराघरात ही वस्तू पोहोचली. गॅस तेव्हा शहरात तरी निदान मध्यमवर्गियांपर्यंत पोहोचला होता. गावात लाकडाच्या चुली कमी होऊन रॉकेलच्या स्टोव्हने प्रवेश केला होता. दुधाचा कुकर या दोन्ही गोष्टींना अनुकूल होता.

एक उभ भांड त्याला आतून तसाच एक स्तर, मध्ये पोकळी असे याचे सर्वसाधारण स्वरुप असे. मधल्या पोकळ जागेत पाणी भरायला वरच्या भागात भोक असे. हिच शिट्टी. यात वरुन पाणी भरायचे व आट्याची शिट्टी अडकवून ठेवायची. एका बाजूला गरम भांडे धरायला प्लास्टीकची मुठ असे. तर कुकरवर ठेवायला मापातले झाकण असे. कुकर आवर्जून अ‍ॅल्युमिनियम किंवा हिंडालियमचा असे. कुकरमध्ये दुध भरायचे व झाकण लावून तो गॅस अथवा स्टॉव्हवर ठेवायचा. कुकरमध्ये दुध गरम झाले की शिट्टी वाजे. मग कुकर खाली घ्यायचा. दूध उतू जायची सगळ्यात मोठी अडचण या कुकरने संपवली. त्या कल्पनेला महिलांनी भरभरुन प्रतिसाद दिला. किंमतीतही तेव्हा तो फारसा महाग नव्हता, हौशी कुटुंबांनी तो घरी आणला.

फाट्याच्या चुलीवर किंवा कोळशाच्या चुलीवर गृहिणी अंदाजाने विस्तव ठेवत व त्यावर दूध तापवायला ठेवत. दूध तापलं की, चूल किंवा शेगडी विझून जाई. कारण तेवढीच व्यवस्था त्यात केलेली असे. पण स्टोव्ह किंवा गॅसमध्ये ही सोय नसे. तो आपण विझवत नाही तोपर्यंत पेटतच राही. घरातील गृहिणी इतर कामात मग्न असेल. स्वयंपाकघराबाहेर गेली, कुणाशी बोलत बसली, इतर काम काढल आणि गॅसवर ठेवलेल्या या दूधाचा विसर पडला तर अनर्थ होऊन जाई. त्यामुळे दूध तापवणे हे एक महत्त्वाचे व जबाबदारीचे काम त्या काळात होऊन गेले होते. या काळात शहरात महिला मोठ्या संख्येने नोकरी आणि उद्योगावरही जाऊ लागल्या होत्या. दोन्ही आघाड्या सांभाळताना त्यांची तारांबळ उडत असे. तेव्हा मदतीला त्यांना अशा नाविन्यपूर्ण गोष्टींची गरज होतीच. आता दूधाची व दूध तापवण्याची त्यांची चिंता संपली होती. 'दूधाच्या कुकरने' घराघरात मोठ्या दिमाखात प्रवेश केला. त्या काळात शहरात बाटल्यांमधून मिळणारे व गावात गवळ्याच्या पितळी कासंडीतून मिळणारे दूध घराघरात दुधाच्या कुकरमध्ये रिते होऊ लागले.

पण दूधाच्या कुकरने स्वयंपाकघरात फार काळ राज्य केले नाही. लवकरच त्यातले दोष व मर्यादा समोर आल्या. या कुकरची शिटी आताच्या प्रेशर कुकरसारखी तीनदा न होता तो जसा तापत जाई तशी होत राही. कुकर खालच्य गॅस किंवा स्टोव्हने तापलं की मधल्या पोकळ जागेत भरलेल्या पाण्याची वाफ होई व ती शिट्टीतून आवाज करत बाहेर पडे. हा शिट्टीचा आवाज घरभर ऐकायला येई. तो टिपेवर पोचला की गॅस बंद करायचा, पण याच शिट्टीचा आवाज लवकरच सार्‍या घरादाराला डोकेदुखी होऊ लागली. 'दूध तापते आहे' याची काही कारण नसताना सर्वत्र जाहिरात होऊन जाई. अशा चार घरात एकाचवेळी दूधाच्या कुकरमध्ये दूध तापू लागले की त्या चाळीला गिरणीच्या भोंग्याची अवस्था येई. मुळात दूध तापवण्याच्या शास्त्रीय तत्त्वालाच सोयीचा विचार करुन हरताळ फासला गेला होता. दूध अतिशय मंद अग्नीवर तापवावे म्हणजे त्याला साय भरपूर येते हे शेकडो वर्षाच्या अनुभवातून ज्ञात झालेले साधे सत्य होते. भारतीय गृहिणीला ते माहित होते. पण दूधाच्या कुकरने त्यालाच बगल दिली होती, त्यामुळे यात तापवलेल्या दूधाला सायच येईनाशी झाली. पारंपारिक भारतीय आहार पध्दतीत दुधा-तुपाला अतिशय महत्त्व होते. त्याचा संबंध थेट पाहुण्या-राहुण्यांशी लावला जाई. लवकरच घराघरात साय, दही, ताक, लोणी व तूप यांचा नेहमीपेक्षा अधिक तुटवडा भासू लागला. हे सारं कुकरमध्ये दूध तापवल्याने होत असल्याचं लवकरच लक्षात आलं. स्वयंपाकघरातून त्याची उचलबांगडी होण्याशिवाय काही पर्यायच उरला नाही. पुन्हा स्टीलचे घाटदार भांडे दूधाला वापरात येऊ लागले.

दूधाचा कुकर लवकरच अप्रिय व्हायला आणखी एक कारण झाले ते म्हणजे हे कुकर केवळ अ‍ॅल्युमिनीयम व हिंडालियमचे असत. ते स्वच्छ करणे अवघड जात असे. कितीही चोळले तरी स्टीलप्रमाणे हे भांडे लखलखीत होत नसे. त्याचा तेलकटपणा तसाच राही. दूधाला तर स्वच्छतेची नितांत गरज असे, अस्वच्छतेमुळे दूध नासण्याचे प्रकार होऊ लागले, ते कुणालाच परवडण्यासारखे नव्हते. स्वयंपाकाच्या धांदलीतही दूधाची ठेवदेव करायची गृहिणींना अगोदरपासून सवय होतीच. आता दूधाच्या कुकरचे नाविन्य संपले, अडचणी अधिक टोचू लागल्या. एक दिवस वापरातून बाजूला पडलेला हा कुकर माळ्यावर जाऊन पडला. तोपर्यंत त्याची मूठ, झाकण, शिटी इकडे-तिकडे मोडून पडून नाहीशी झाली होती. मुळात वस्तूही अशाच धातूची बनवलेली होती की, ती मोडीतही देता येईना. आहारशास्त्राचे नियम, संकेत, रुढी लक्षात न घेताच एखादी वस्तू बाजारात आणल्यास तीच काय होत याच उत्तम उदाहरण म्हणजे 'दुधाचा कुकर'