कीर्तिमुख - भगवान शिव यांचा महागण
भारतातील मंदिर स्थापत्य शास्त्रात किर्तीमुखास अनन्यसाधारण महत्व आहे. प्रत्येक शिवमंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताना आपल्याला किर्तीमुखाचे दर्शन होते.
भारतातील मंदिर स्थापत्य शास्त्रात किर्तीमुखास अनन्यसाधारण महत्व आहे. मंदिराच्या गाभाऱ्यातील दरवाज्यामध्ये, प्रभावळीत, उंबऱ्यावर अथवा शिखराजवळ एक विक्राळ स्वरूपातील सिंहसदृश मुख कोरलेले असते ज्यास कीर्तिमुख असे म्हणतात.
भारतातील प्रत्येक शिवमंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताना आपल्याला किर्तीमुखाचे दर्शन होते.
पदमपुराणात किर्तीमुखाची कथा सांगितली गेली आहे ज्यानुसार एक दिवस असुरांचा सम्राट जालंदर याचा दूत राहू हा शंकराकडे गेला व जालंदराची पार्वतीबद्दल असलेली अभिलाषा शंकरास सांगितली ज्यामुळे संतप्त होऊन शंकराने आपल्या जटांतून सिंहमुख नावाचा एक महागण निर्माण केला.
या सिंहमुख गणास तीन मुख, तीन पाय, तीन पृच्छ व सात हात होते. सिंहमुखाने सर्व दैत्यांना मारून टाकले मात्र तरीही त्याचा क्रोध शमला नाही त्यामुळे शंकराच्या आज्ञेने त्याने स्वतःचे शरीरच खाऊन टाकले व शेवटी त्याचे मुख शिल्लक राहिले.
शंकराने प्रसन्न होऊन त्यास कीर्तिमुख असे नाव दिले व आपल्या मंदिरात त्यास मानाचे स्थान दिले.
तेव्हापासून शंकराचे दर्शन घेण्यापूर्वी प्रथम किर्तीमुखाचे दर्शन घेण्याची प्रथा सुरु झाली. किर्तीमुखाचे शिल्प असलेले भवन हे सुरक्षित राहते असे मानण्यात येते त्यामुळे राजद्वार, मंदिर, सिंहासन अशा अनेक स्थानांवर सिंहाची आकृती कोरण्यात येत असे.
केवळ भारतातीलच नव्हे तर इंडोनेशिया या देशातील मंदिरांमध्ये कीर्तिमुख शिल्पे कोरण्यात आली आहेत.