कै. नवीन सोष्टे - पत्रकारितेतील भीष्माचार्य
पत्रकारितेस व्रत मानून या क्षेत्राची तब्बल पाच दशके सेवा करणारे व्रतस्थ पत्रकार म्हणजे कै. नवीन सोष्टे. सोष्टे यांना रायगड जिल्ह्याच्या पत्रकारितेची भीष्माचार्य मानले जायचे कारण भीष्माचार्यांनी जसे वचन घेऊन कर्तव्याचे शेवटपर्यंत पालन केले तसेच त्यांनी एकनिष्ठेने पत्रकारितेचे पालन केले.
पत्रकारितेस व्रत मानून या क्षेत्राची तब्बल पाच दशके सेवा करणारे व्रतस्थ पत्रकार म्हणजे कै. नवीन सोष्टे. सोष्टे यांना रायगड जिल्ह्याच्या पत्रकारितेची भीष्माचार्य मानले जायचे कारण भीष्माचार्यांनी जसे वचन घेऊन कर्तव्याचे शेवटपर्यंत पालन केले तसेच त्यांनी एकनिष्ठेने पत्रकारितेचे पालन केले. त्यांच्या कार्याचा आढावा हा खरं तर एका लेखात मावणे अशक्यच कारण आपल्या ५० वर्षांच्या पत्रकारितेच्या व साहित्यक्षेत्राच्या कारकिर्दीत त्यांनी एवढे कार्य केले आहे की त्यावर अनेक ग्रंथाचे खंड तयार होतील.
नवीन सोष्टे यांचा जन्म २१ डिसेंबर १९५२ साली रायगड जिल्ह्यात नागोठणे येथे झाला. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात पदार्पण केले. अन्यायाविरोधातली चीड, लोकांविषयी आत्यंतिक तळमळ व आपण ज्या भूमीत जन्मास आलो त्या भूमीतील लोकांच्या प्रश्नविषयी कळकळ त्यांच्या स्वभावात उपजतच असल्याने पत्रकारितेच्या माध्यमातूनच आपण सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडून ते प्रश्न सोडवू शकतो हे जाणून त्यांनी सर्वप्रथम साप्ताहिक युगारंभ मधून पत्रकारितेची सुरुवात केली व खऱ्या अर्थाने एका नव्या युगाचा आरंभ झाला.
युगारंभ मधून जनतेचे प्रश्न विविध मांडत असताना हुंडा या प्रथेविरुद्ध समाजसुधारणा करण्याकरिता त्यांनी महिला टोपणनाव स्वीकारून हुंडाविरोधी लिखाण केले. वाचकांना एक मुलगी हुंडाप्रथेविरोधात विचार मांडत आहे हे समजल्यावर अनेक मुली व पालक हुंडाविरोधी चळवळीत सहभागी झाले व गमतीची गोष्ट अशी की अनेकांनी ज्या महिला टोपणनावाने ते लिखाण करीत होते त्या महिलेस लग्नाची मागणी घातली व आपल्याकडून एक रुपयाही हुंडा घेणार नाही अशी पत्रे सुद्धा साप्ताहिक युगारंभाच्या कार्यालयास लिहिली व हाच त्यांच्या हुंडाविरोधी लिखाणाचा खऱ्या अर्थी विजय होता.
७० च्या दशकात स्थापन तत्कालीन पत्रकारांनी कुलाबा जिल्हा दैनिक वार्ताहर संघाने संघाची स्थापना केली या संघाच्या कार्यकारी मंडळावर सोष्टे यांची पदाधिकारी म्हणून निवड झाली. याच काळात त्यांनी कोकण विभागात नुकत्याच सुरु झालेल्या मुंबई सकाळचे (सध्याचा सकाळ) वार्ताहरपद स्वीकारले. तो काळ इंटरनेटचा नव्हता त्यामुळे एखादी बातमी प्रकाशित होण्यासाठी खूप मोठा कालावधी लागत असे व यासाठी त्यांना बातमी लिहिणे, मुंबईस जाणे, बातमी सकाळच्या कार्यालयात देणे व पुन्हा नागोठण्यास येणे अशी धावपळ करावी लागत असे. गळ्यात शबनमची बॅग व त्यामध्ये पेन आणि डायरी या भांडवलावर ते जिल्हाभर फिरुन वृत्तसंकलन करित असत. त्यांच्या लिखाणामध्ये अन्यायाला फटकारण्याची ताकद होती तसेच विषयामध्ये त्यांच्या नावाप्रमाणे नविनपणा व नाविन्य असे.
पत्रकारिता करीत असताना सोष्टे यांच्या कुठल्याही कार्यात स्वतःस झोकून देण्याच्या वृत्तीमुळे सकाळच्या तत्कालीन संपादकांसोबत त्यांचे ऋणानुबंध निर्माण झाले कारण पत्रकारिता या क्षेत्रास त्याकाळी एवढे वलय नसतानाही रायगड जिल्ह्यातील एका लहानशा गावातील एक तरुण अत्यंत परिश्रम घेऊन जिल्ह्यातील जनतेच्या समस्या मांडत आहे ही गोष्ट अनेकांना भावली व पाहता पाहता मुंबई सकाळ संपूर्ण रायगड जिल्ह्यात नावारूपास आला.
दै. लोकसत्ताचे पहिले संपादक त्र्यंबक विष्णू पर्वते, दै. मुंबई सकाळचे माजी संपादक माधवराव गडकरी, राधाकृष्ण नार्वेकर व नाटककार आत्माराम सावंत यांचा सहवास सोष्टे यांना कारकिर्दीच्या सुरुवातीस लाभला त्यामुळे त्यांच्या अनेक बातम्या व लेख राज्यभरात गाजले पण दैनिक वर्तमानपत्रांचे बदतले स्वरुप, प्रचलित सामाजिक व राजकिय परिस्थीती पाहता सामान्य माणसाच्या सर्वच व्यथांना वाचा फोडण्यास पत्रकार म्हणून असमर्थ ठरत आहोत हे शल्य त्यांना टोचत होते. कारण कारखानदारीमुळे रायगड जिल्ह्यात अनेक सामाजिक, आर्थिक, औद्योगिक प्रश्न भेडसावत होते. शेतकरी व मच्छीमारांचे वेगळे प्रश्न होते, प्रदुषण समस्या होती, नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवणारे प्रश्न होते, ग्रामिण पत्रकारितेच्या समस्या होत्या या समस्या वेशीवर टांगण्यासाठी एकेका विषयावर पुस्तक रुपाने विस्तृत लिहावयास हवे म्हणून ते पत्रकारितेसोबत लेखकही बनले. प्रत्येक विषयात झोकून देण्याची वृत्ती, सामान्य माणसाची नाळ पकडण्याची कला व अन्यायास वाचा फोडण्याची जिद्द असल्यामुळे ते यशस्वी लेखकही बनले. त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक पुस्तकाच्या अनेक आवृत्या भराभर संपल्या.
सोष्टे यांचे प्रीतीला विफलतेचा शाप हे गाजलेले तीन अंकी नाटक, जे प्रसिद्ध संगीतकार अच्युत ठाकूर यांनी रंगभूमीवर आणले. यानंतर कारखानदारी, प्रदूषण व बेरोजगारी या समस्यांवर प्रहार करणाऱ्या औद्योगिक क्रांती की सामाजिक शोकांतिका या पुस्तकाचा जन्म झाला. या पुस्तकाचे प्रकाशन इंडियन एक्सप्रेस टॉवर येथे झाले होते.
पत्रकारिता करताना समाजाशी संलग्न अशा अनेक संस्थांसाठी सोष्टे यांनी कार्य केले यामध्ये न्यु ईरा युथ फोरम चे अध्यक्ष, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष, रायगड जिल्हा मुद्रक संघाचे अध्यक्ष, रोहे तालुका पत्रकार संघाचे विश्वस्त, नागोठणे प्रेस क्लब चे विश्वस्त, नागोठणे पत्रकार संघाचे विश्वस्त, साकव ग्रामविकास संस्थेचे खजिनदार व विश्वस्त, कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष अशा अनेक मोठ्या जबाबदाऱ्या त्यांनी लीलया पार पाडल्या.
दै. सकाळचे वार्ताहरपद सांभाळताना सोष्टे यांनी दै. सागर, दै. कुलाबा दर्पण, दै. कृषिवल, दै. सकाळ, सा. युगारंभ, सा. कुलाबा समाचार अशा अनेक वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखन केले व या लेखनावरील अनेक मालिका अत्यंत गाजल्या. त्यांच्या कर्तृत्वाची दखल देशातील अनेक माध्यमांनी घेतली व आशिया खंडात एकूण १८ देशात दिसणार्या झी टिव्ही प्रसारमाध्यच्या चक्रव्युह या मालिकेमध्ये सोष्टे यांचा गौरव करण्यात आला याशिवाय दुरदर्शन, सहारा समय, आकाशवाणी, विविध वृत्तपत्रे व सामाजिक संस्था यांच्या कडून सुद्धा त्यांचा सन्मान करण्यात आला.
१९८९ च्या जुलै महिन्यातील २३ तारखेला निसर्गाचा कोप रायगड जिल्ह्यावर झाला. अंबा नदीला महापूर आल्यामुळे जिवनदायिनी असलेली अंबा नदी वैरिणी बनली. झोपेमध्ये असतानाच जांभुळपाडा गाव अर्ध्याहून अधिक वाहून गेले. शेकडो जणांना जलसमाधी मिळाली. घरे, गुरे, वासरे वाहून गेली. जांभुळपाड्यात होत्याचे नव्हते झाले. तसेच आमनोली, हेदवली, पेडली, पाली, तिवरे, वावे, आंबोले, उन्हेरे, राबगाव, वाकण या गावांना फटकारत ही काळरात्र नागोठण्यात शिरली व तेथेही थैमान घातले. झोपेतच अनेकांस यमसदनास नेले तर अनेकांना सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले. लहान मुलांचे किंचाळणे, गुरांचे हंबरणे, पक्ष्यांचे किलबिलणे हि भयानक दृष्ये दिसत होती. घरे पाण्याखालि गेली. व्यापार्यांचे अतोनात नुकसान झाले. दलदलीमुळे रोगराई पसरली. या आपत्तीने उडालेला आक्रोश आणि आकांत यावर प्रकाश टाकण्यासाठी 'अंबा काठावरील अश्रूचा' जन्म झाला. अंबा काठावरील अश्रू हे पुस्तक जागतिक स्तरावर गाजले व अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठाच्या ग्रंथालयात या शिवाय कराची येथील लायब्ररी ऑफ काँग्रेस मध्ये हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणून स्थानापन्न आहे.
पत्रकारिता व लिखाण करीत असताना अन्यायाविरोधात निर्माण झालेल्या चळवळींमध्ये सुद्धा सोष्टे यांनी सक्रिय सहभाग घेतला. पत्रकारांनाच नव्हे तर वृत्तपत्र विक्रेत्यांनाही एखाद्या बातमीसाठी अटक होवू शकेल असे विधेयक बिहार सरकारने १९८४ साली आणले होते. या बिलाचा निषेध करण्यासाठी सोष्टे यांनी श्रीमती मिनाक्षी पाटील, माधवराव मंडलिक, रामचंद्र पत्की आदी पत्रकारांसोबत सोलापुर येथे सत्याग्रह केला व त्याची शिक्षा म्हणून औरंगाबाद येथील हरसूल कारागृहामध्ये तुरुंगवास भोगला याशिवाय संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात कर्नाटकचा बेळगाव, कारवारसह काही भाग महाराष्ट्रात यावा यासाठी मुंबई येथे केलेल्या आंदोलनात त्यांना अटकही झाली होती.
नविन सोष्टे यांच्या समृद्ध लेखणीची दखल अनेक नामवंत संस्थांनी तसेच संघटनांनी घेतली व त्यांना पुरस्कार व मानपत्र देऊन गौरव केला. यामध्ये रायगड जिल्हा परिषदेचा रायगड मित्र पुरस्कार, रायगड जिल्हा पत्रकार संघाचा रायगड पत्रभुषण पुरस्कार, रायगड प्रेस क्लब सन्मान, रोहे तालुका पत्रकार संघाचा सि.डी. देशमुख पुरस्कार, साकव ग्रामविकास संस्थेचा साकव पुरस्कार, महाराष्ट्र मुक्त पत्रकार संघाचा महाराष्ट्र दिप पुरस्कार, राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रवादी ग्रंथालय पुरस्कार, अखिल भारतीय नाट्य संमेलन सन्मान आणि इतर असंख्य पुरस्कारांचा समावेश आहे.
रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष भूषवित असताना कोकणात प्रशिक्षित पत्रकार तयार करण्याचा ध्यास सोष्टे यांनी घेतला व पत्रकार संघाच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे पत्रकार विद्या अभ्यासक्रम सुरु केला व या अभ्यासक्रमाचा ज्या ज्या तरुणांनी घेतला ते आज मुंबई पुणे इत्यादी शहरांतील प्रमुख वर्तमानपत्रांत मोठ्या पदावर कार्य करीत आहेत.
सोष्टे यांनी पत्रकारितेबरोबर लिखाणाची आवड जोपासताना विपुल पुस्तकांचे लिखाण केले यामध्ये मुहं मे राम बगल मे छुरी, प्रीतीला विफलतेचा शाप, औद्योगिक क्रांती की सामाजिक शोकांतिका, आंबा काठावरील अश्रू, ग्रामदैवत, चीड, डायरी एका पत्रकाराची, भटकंती, ग्रामदैवत, कोकणातील नाक्यावर, चलता है, मधले पान, आठवणीतील माणसे, महाप्रलयाच्या पाऊलखुणा, बातमीमागील जग, हिमालयाच्या सावलीत, मुलुखगिरी एका पत्रकाराची, दक्षिणेच्या सीमेवरून, डायरी नक्षलग्रस्त ईशान्य भारताची, कन्याकुमारी ते काश्मीर, कोकण काल आज व उद्या व इतर अनेक लोकप्रिय ग्रंथांचा समावेश आहे.
रात्रंदिवस पत्रकारिता व समाजसेवा या व्रतास वाहून घेतलेल्या सोष्टे यांना वयाच्या पन्नाशीनंतर अविरत परिश्रमांमुळे मधुमेह, हृदयविकार यासारख्या व्याधी जडल्या त्यामुळे २००५ साली त्यांच्यावर अँजिओप्लॅस्टी शस्त्रक्रिया करण्यात आली मात्र यानंतर ही विश्रांतीची गरज असूनही सोष्टे यांनी त्यांचे कार्य न थांबवता ते अधिक वाढवले व साकव ग्रामविकास संस्थेतील आपल्या सहकाऱ्यांसोबत व त्यांना सावलीसारखी साथ देणारी त्यांची पत्नी किशोरी सोष्टे यांच्यासोबत संपूर्ण भारतभ्रमण करून तेथील संस्कृतीचा अभ्यास केला व त्यावर ग्रंथनिर्मिती करून मराठी साहित्यक्षेत्रात मोलाची भर घातली.
गेली दोन वर्षे कोरोना नामक संकटाने समस्त जगास ग्रासले होते त्यामुळे सर्वच जण चार भिंतींमध्ये कैद होते अशावेळी ही कायम आशावादी असलेल्या सोष्टे यांनी हे ही दिवस जातील असे म्हणून आपल्या माणसांना धैर्य देण्याचे कार्य केले. या काळात सोष्टे यांच्या जवळचे अनेक मित्र व हितचिंतक कोरोनामुळे जग सोडून गेले यामुळे त्यांना खूप दुःख होत होते व ते दुःख ते प्रसार माध्यमावर वर सक्रिय राहून व्यक्त सुद्धा करीत मात्र जुलै २०२१ हा महिना एखाद्या काळासारखा आला व पाहता पाहता पत्रकारितेतील सर्वांचे लाडके भीष्माचार्य सर्वांना एकटे सोडून गेले व मागे ठेवून गेले त्यांचे हिमालयाएवढे कार्य व कधीही भरून न येणारी उणीव.
सोष्टे यांनी तब्बल पाच दशके पत्रकारितेची सेवा केली व त्याची दखल विविध स्तरांवर घेतली गेली. तत्कालीन राज्य सरकारने त्यांना ज्येष्ठ पत्रकार म्हणून ओळखपत्र प्रदान केले होते. त्यांचे पत्रकारिता व साहित्य क्षेत्रातील हिमालयाएवढे कार्य पुढील अनेक पिढयांना दिशा दर्शक ठरेल व एखाद्या दीपस्तंभासारखे पत्रकार व समाज यांना मार्गदर्शन करीत राहील.