सागाच्या झाडाची माहिती व उपयोग

साग हा मोठा विस्तार असलेला वृक्ष असून त्याची उंची खूप असते व परिघही विस्तीर्ण असतो. सागाचा सर्वात मुख्य उपयोग म्हणजे प्राचीन काळापासून याचे लाकूड हे बांधकामासाठी वापरले जाते.

सागाच्या झाडाची माहिती व उपयोग

भारतातील प्रसिद्ध वृक्षांमधील एक वृक्ष म्हणजे साग. सागाचे शास्त्रीय नाव टेक्टोना (Tectona) असे आहे सागाच्या वृक्षास मराठीत सागवान तर हिंदीत सागौन या नावांनी सुद्धा ओळखले जाते.

इंग्रजीमध्ये यास टिक असे नाव आहे. साग हा विषुववृत्तीय प्रदेशात आढळणारा एक पानझडी वृक्ष आहे. भारताव्यतिरिक्त ब्रह्मदेश या देशातही साग विपुल प्रमाणात आढळतो. 

साग हा मोठा विस्तार असलेला वृक्ष असून त्याची उंची खूप असते व परिघही विस्तीर्ण असतो. सागाचा सर्वात मुख्य उपयोग म्हणजे प्राचीन काळापासून याचे लाकूड हे बांधकामासाठी वापरले जाते. सागाचे लाकूड हे टणक व टिकाऊ असते.

सागाचे लाकूड हे पाण्यात कुजत नाही व कडवट असल्याने यास वाळवी अथवा कीड लागत नसल्याने बांधकामाकरिता सागासारखे उपयुक्त लाकूड दुसरे नसते.

सागाच्या लाकडाचा बांधकामासाठी वापर करण्यासाठी झाडाचे वयोमान जास्त असावे लागते कारण कोवळ्या सागाचे लाकूड हे तेवढे टिकाऊ नसते. सागाच्या झाडाच्या लाकडाच्या उपयुक्तेमुळे पूर्वी सागांच्या झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात असे व ज्या ठिकाणी सागवानी जंगले असायची ती जंगले राखली जात असत.

घरे, मंदिरे व तारवे तयार करण्यासाठी सागाच्या लाकडांना पूर्वी मोठी मागणी होती व आजही आहे.

सागाच्या झाडाची पाने ही दिसावयास अंजिराच्या पानांसारखी असतात मात्र अंजिराच्या पानांपेक्षा सागाची पाने ही खूप मोठी असतात. सागाची पाने हातात घेऊन चोळली असता लाल रंग निघतो.सागाचा वृक्ष हा खूप काळ टिकणारा वृक्ष असून काही ठिकाणी सागाच्या २५० वर्षे टिकलेल्या झाडांची नोंद घेण्यात आली आहे.

अशा प्रकारे भारत उच्च दर्जाच्या लाकडासाठी जी झाडे प्रसिद्ध आहेत त्यामध्ये शिसम, देवदार, बिब्बा आदी वृक्षांमध्ये सागाचे नाव अग्रक्रमाने घेण्यात येते.