महाराष्ट्र दिन - महाराष्ट्राच्या महा संस्कृतीचा जयघोष

१ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या शुभ औचित्यावर महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून महाराष्ट्र राज्याच्या ऐतिहासिक व वर्तमानकालीन गौरवशाली परंपरेला मानाचा मुजरा.

महाराष्ट्र दिन - महाराष्ट्राच्या महा संस्कृतीचा जयघोष

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

महाराष्ट्र हे नाव ‘रथी’ या नामापासून तयार झाले. रथी म्हणजे रथ हाकणारी व्यक्ती. इसवी सनाच्या ५ व्या शतकात ‘महावंश’ नावाच्या बौद्ध ग्रंथात महाराष्ट्राचा प्रथम उल्लेख सापडतो. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५६ साली मुंबई, गोवा, बेळगाव, परभणी, कारवार, निपाणी, वऱ्हाड अशा सर्व मराठी भाषिक प्रांताचा मिळून संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे अशी मागणी जोर धरू लागली आणि त्यातून संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाची पायाभरणी झाली.  

१ मे १९६० या दिवशी बॉम्बे रिऑर्गनायझेशन ऍक्ट नावाच्या कायद्याअंतर्गत गुजरात आणि महाराष्ट्र ही दोन राज्ये भाषिक निकषांवर विभाजित झाली आणि तोच दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा होऊ लागला. संयुक्त महाराष्ट्र समिती ही या आंदोलनाचे नेतृत्व करत होती. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, एस एम जोशी, आचार्य अत्रे, अण्णाभाऊ साठे, केशव सीताराम ठाकरे इत्यादी अनेकांनी कधी आपल्या शब्दांना, कधी आपल्या लेखणीला शस्त्र करत हा लढा यशस्वीपणे लढला. या लढ्याच्या वेळी खऱ्या अर्थाने मराठी अस्मिता आकारास येत होती. तेव्हाच महाराष्ट्रात किती प्रतिभावान मंडळी आहेत हे सिद्ध झालेले होते. राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवरील नेतृत्त्वाची फळी महाराष्ट्रात निर्माण झालेली होती. मात्र पूर्वीच्या बॉम्बे प्रेसिडेन्सीचे महाराष्ट्रात रूपांतर होऊन आज ६१ वर्षे झाली तरीही महाराष्ट्राचा वर्तमान त्याच्या इतिहासाइतकाच गौरवशाली  राहिला  आहे. या लेखातून  याच वर्तमानाविषयी जाणून घेऊया. 

महाराष्ट्रात अशा अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत ज्या अन्य राज्यांत क्वचितच पाहायला मिळतात.

 • तेव्हाच्या ब्रिटिश साम्राज्यात मुंबई हे महत्त्वाचे बंदर असल्याने पहिली रेल्वे मुंबईतील बोरी बंदर येथून ठाण्यापर्यंत १६ एप्रिल १८५३ रोजी धावली होती.  हीच रेल्वे आशियाची पहिली रेल्वे ठरली. या रेल्वेने  ३४ किमी चे  अंतर  कापले होते. महात्मा फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे यांसारख्या दिग्गजांच्या महाराष्ट्रात आज ६३ सरकारी  आणि खाजगी विश्वविद्यापीठे आहेत. मुंबई विद्यापीठ हे पदवीधरांच्या संख्येच्या बाबतीत जगातील सगळ्यात मोठे विद्यापीठ आहे. भारतातील सर्वांत पहिली महाविद्यालये विल्सन कॉलेज, एल्फिन्स्टन कॉलेज महाराष्ट्रात मुंबईत सुरु करण्यात आली.
 • महाराष्ट्रात ३५० हुन अधिक किल्ले असून जलदुर्ग, भुईकोट आणि गिरिदुर्ग अशा तीनही प्रकारचे किल्ले येथे पाहायला मिळतात. सागरी दुर्ग हे संपूर्ण देशात फक्त महाराष्ट्रात आढळतात. 
 • युनेस्कोच्या  एकूण ३८ जागतिक वारसा स्थळांपैकी ५ वारसा स्थळे महाराष्ट्रात आहेत.  अजिंठा लेणी , वेरूळ लेणी, एलिफन्टा गुंफा, छत्रपती शिवाजी  महाराज टर्मिनस स्थानक आणि व्हिक्टोरियन गॉथिक व आर्ट डेको इमारती ही ती पाच स्थळे होत. याव्यतिरिक्त पश्चिम घाट, कास पठार, कोयना  वन्यजीव अभयारण्य, चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि राधानगरी वन्यजीव अभयारण्य ही जागतिक  नैसर्गिक वारसा स्थळे महाराष्ट्रात आहेत. 
 • भारतातील अर्वाचीन तीन औद्योगिक शहरांपैकी दोन शहरे किर्लोस्करवाडी आणि वालचंदनगर महाराष्ट्रात आहेत.
 • महाराष्ट्रातील अजिंठा-वेरूळची लेणी जागतिक वारसास्थळांमध्ये गणली जातात. महाराष्ट्रात  १००० वर्षे जुनी मंदिरे आढळतात. यावरून येथील संस्कृती व सभ्यता किती प्राचीन होती त्याचा अंदाज येतो. 
 • १२ ज्योतिर्लिंगांपैकी ५ ज्योतिर्लिंगे- त्र्यंबकेश्वर, औंढा-नागनाथ, परळी-वैजनाथ, घृष्णेश्वर आणि भीमाशंकर महाराष्ट्रात आहेत. 
 • पंढरपुरात वर्षातून चार वेळा वारी होते. आषाढ, श्रावण, कार्तिक आणि माघ अशा चार महिन्यात पंढरपूरला वारकरी प्रस्थान करतात. 
 • महाराष्ट्रात  सह्याद्री डोंगररांगांमुळे प्रचंड जैवविविधता आहे. ४९ अभयारण्ये आणि ६ राष्ट्रीय उद्याने असलेल्या या राज्यातील मुंबई हे शहर भारतातील एकमेव शहर आहे ज्याच्या हद्दीत एक राष्ट्रीय उद्यान आहे. 
 • रसायने आणि त्यासंबंधीचे  उद्योग, विद्युत उपकरणे, पेट्रोल आणि संबंधित उत्पादने, औषधे, अभियांत्रिकी उपकरणे, यांत्रिक उपकरणे, स्टील आणि लोखंड  उद्योग इत्यादी महाराष्ट्रातील प्रमुख उद्योग आहेत. भारतातील सर्वात पहिली सोन्याची रिफायनरी महाराष्ट्राच्या शिरपूरमध्ये आहे. 
 • मुंबईतील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादनातून भारताची ३०% तेलाची मागणी पूर्ण होते. 
 • नागपूरला भारताची व्याघ्र राजधानी आणि भारताचे व्याघ्र प्रवेशद्वार मानले जाते. 

स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर ज्ञानपीठ विजेते विंदा करंदीकर, कुसुमाग्रज यांच्यासारखे साहित्यिक, एम एफ हुसेन, वासुदेव गायतोंडे यांच्यासारखे चित्रकार, बाबा आमटे, डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि डॉक्टर स्मिता कोल्हे यांसारखे समाजसेवक, विजय तेंडुलकरांसारखे नाटककार इत्यादींच्या रूपात महाराष्ट्र पुरोगामित्वाची परंपरा पुढे चालू ठेवत आहे.  

अगदी  २१व्या शतकात देखील महाराष्ट्रातील प्रतिभावान मंडळी महाराष्ट्राला देशात आणि जगात मानाचे स्थान मिळवून देत आहेत. या वर्तमानकालीन पराक्रमींनागौरवल्याशिवाय महाराष्ट्र दिनाचा उत्सव अपूर्ण राहील हे निश्चित.  यानिमित्ताने प्रातिनिधिक स्वरूपात या तरुण प्रतिभावंतांचा खास उल्लेख करावासा वाटतो- 
१.  प्रथमेश हिरवे-  मुंबईचा प्रथमेश हिरवे इस्रो [ISRO] या नामांकित अवकाश संशोधन संस्थेत २०१७ पासून  इलेक्ट्रिकल इंजिनीयर या पदावर नियुक्त आहे. इस्रोमध्ये स्थान मिळवलेला तो पहिला मुंबईकर आहे. मुंबईतील पवई फिल्टरपाड्यात बालपण घालवलेल्या प्रथमेशने स्वतःच्या मेहनतीवर एवढी मोठी झेप घेतली. मुख्य म्हणजे प्रथमेशचे १०वी पर्यंतचे शिक्षण मराठीतून झाले होते. 
२. प्रांजल पाटील- उल्हासनगर येथील प्रांजल पाटील २०१९ साली प्रथम दिव्यांग महिला आय ए एस ऑफिसर झाली. वयाच्या सहाव्या वर्षी दृष्टी गमावूनदेखील तिने जिद्दीने शिक्षण पूर्ण केले व दुसऱ्या प्रयत्नात १२४वा क्रमांक मिळवला. प्रांजल सध्या तिरुअनंतपुरम येथे सेवेत रुजू आहे. 
३. अल्फिया पठाण- आशियन ज्युनिअर गर्ल चॅम्पियन असलेल्या अल्फिया पठाण हिने ८१ किलो पेक्षा अधिक वजनाच्या बॉक्सिंग या क्रीडाप्रकारात भारताला एड्रियाटिक वर्ल्ड टूर्नामेंट, मोंटेनेग्रो येथील स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिले. सध्या पोलंड येथे चालू असलेल्या वुमेन्स बॉक्सिंग वर्ल्डकपमध्ये अंतिम फेरीत मजल मारलेली नागपूरची अल्फिया गोल्डन गर्ल म्हणून ओळखली जाते. 
४. प्रियांका मोहिते- माउंट अन्नपूर्णा हे जगातील दहाव्या क्रमांकाचे उंच शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला होण्याचा सन्मान प्रियांका मोहिते हिला मिळाला. साताऱ्याची प्रियांका साहसी क्रीडाप्रकारांसाठी दिल्या जाणाऱ्या  २०१८ सालच्या शिव छत्रपती राज्य पुरस्काराची मानकरी असून जैवतंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहे.  
५. मानसी देवधर- मानसी देवधरने स्वतः लिहिलेल्या  व दिग्दर्शित केलेल्या  ‘चाफा’ या लघुपटासाठी तिला प्रतिष्ठित ‘कान्स’ महोत्सवात नामांकन मिळाले.  सिंधुदुर्गातील अकेरी नावाच्या लहानशा गावातून आलेल्या मानसीने फोटोग्राफीचे कौशल्य आत्मसात केले आणि तिच्या पहिल्याच लघुपटाला २०१८ सालच्या कान्स व इतर अनेक चित्रपट महोत्सवांत पदार्पण करण्याचा सन्मान मिळाला. 
६. कविता रावत-  कविता रावत-तुंगार हिचा जन्म नाशिकमधील सावरपाडा नावाच्या लहानशा खेड्यातला. ती लांब पल्ल्याची धावपटू आहे.२०१२ साली तिला अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले. रिओ  ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवलेली  कविता रावत स्वतः क्रीडा प्रशिक्षक असून १० किमी  धावण्याच्या  शर्यतीतील  उच्चांक तिच्या नावावर आहे. 
७. सचिन टेके- माटुंग्याच्या व्ही जे टी आय महाविद्यालयातून पदवी संपादन करून २०१० साली  सचिन टेके  यांनी  नोकरी  सोडली  व  पारंपरिक  मार्गावरून न  चालता स्वतःचे एम-इंडिकेटर नावाचे ऍप्लिकेशन तयार केले. आज लाखो लोक या ऍप्लिकेशनचे वापरकर्ते आहेत.  
८. रणजितसिंह दिसले- युनेस्को’ आणि लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या ‘ग्लोबल टीचर’ या सन्मानाने श्री. रणजितसिंह दिसले यांना गौरवण्यात आले. क्विक रिस्पॉन्स म्हणजे क्यूआर पद्धत बालभारतीच्या पुस्तकात आणल्याबद्दल त्यांना हा  पुरस्कार देण्यात आला. सोलापुरातील परितेवाडी या छोट्याशा गावात, जिल्हा परिषदेच्या शाळेत अध्यापन करणाऱ्या डिसले सरांनी ‘ग्लोबल टीचर’ पारितोषिकाची निम्मी रक्कम उर्वरित स्पर्धकांना देण्याचा; तसेच अन्य रक्कम शिक्षणासाठी वापरण्याचा निर्धार व्यक्त केला. 
९. शशिकांत धोत्रे- जागतिक कीर्तीचे चित्रकार असलेले शशिकांत धोत्रे हे मूळचे सोलापूरचे असून  केवळ कलर पेन्सिल आणि पेपरच्या साहाय्याने अत्यंत सूक्ष्म तपशील सांगणारी बोलकी चित्रे ते काढतात. लहानपणापासून खूप चांगले निरीक्षण व जीवनाविषयी आस्था त्यांच्या मनात होती. शशिकांत धोत्रे यांच्या चित्रांत अत्यंत मूलगामी स्वरूपातील ग्रामीण आणि शहरी समाजजीवन दिसते. मुंबईत आणि महाराष्ट्राबाहेरदेखील त्यांची अनेक प्रदर्शने लागतात. 
१० . सुमन धामणे- या  ७० वर्षांच्या आजी युट्युब वर त्यांच्या पारंपरिक पाककृतींसाठी प्रसिद्ध आहेत. नुसते महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात फॉलोअर्स असलेल्या सुमन धामणे यांनी आपल्या पाककृतींतून महाराष्ट्राचा आजीबाईचा बटवा घरोघरी पोहचवला आहे.
११. डॉ. राजेंद्र भारूड - जिल्हाधिकारी म्हणून नंदुरबार जिल्ह्यात सरकारी सेवेत रुजू होण्याआधी डॉ. राजेंद्र भारूड वैद्यकीय सेवेत होते. यांनी नंदुरबार जिल्ह्यात पुरेसा ऑक्सिजन, रुग्णालयांतील खाटा, विलगीकरण कक्ष यांची सोय करून कोरोना वैश्विक महामारीचा अत्यंत योजनाबद्ध प्रतिकार केला व जिल्ह्याचे कामकाज सुरळीतपणे चालवले.  

मानसी देवधर या प्रतिष्ठित कान्स महोत्सवात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलेल्या तरुणीला तिच्या प्रवासाविषयी आणि तिच्या महाराष्ट्र दिनाविषयीच्या भावनेविषयी विचारले असता ती म्हणाली- “तुकोबांच्या भक्ती गाथेपासून शिवबाच्या शौर्य गाथेपर्यंतचा जीवनकथांचा वारसा म्हणजे महाराष्ट्रीय; विशाल समुद्रापासून सह्याद्रीच्या रांगांपर्यंतचे अस्तित्व म्हणजे महाराष्ट्रीय; शेकडो बोलीभाषा कवेत घेऊन "मराठी" म्हणून नांदणारी एकभावना म्हणजे महाराष्ट्रीय; पुरणपोळीच्या मऊसुतपणापासून खर्ड्याचा ठसक्या पर्यंतच्या चवी म्हणजे महाराष्ट्रीय आणि कीर्तनाच्या टाळा पासून लावणीच्या चाळा पर्यंत ठेका धरणे म्हणजे महाराष्ट्रीय. या गौरवशाली इतिहासाची जाणीव मनात ठेवून हा वारसा जपण्यासाठी जग नावाच्या खेड्यामध्ये मराठी माणूस म्हणून ठामपणे उभे  राहायला हवे आणि आजूबाजूला असलेल्या लोककला,मौखिक साहित्य परंपरा,संस्कृती,रीती,जत्रा, यात्रा निसर्गाची विविध रूपे ह्यांचा विस्तार एवढा आहे की यातल्या गोष्टी चित्रभाषेत मांडायला एक आयुष्य पूरे पडणार नाही आणि मी तर नुकती कुठे सुरवात केली आहे” 

शशिकांत धोत्रे या महाराष्ट्राच्या मातीत रुजलेल्या जगप्रसिद्ध चित्रकारांना त्यांच्या महाराष्ट्र दिनाविषयीच्या त्यांच्या भावनेविषयी विचारले असता ते म्हणाले, “माझ्या चित्रांमध्ये, त्यांतील छोट्या छोट्या वस्तू, स्वयंपाकघरे, मातीने लिंपलेली घरे, जात्यावर दळण दळणाऱ्या स्त्रिया या सगळ्यात महाराष्ट्राची संस्कृती ओतप्रोत भरलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीवर जन्माला आल्याचा मला अभिमान वाटतो. मला असेही वाटते की आपण खऱ्या अर्थाने पुरोगामी असले पाहिजे. आपण एकत्र येऊन महाराष्ट्राला सर्वोत्तम बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विशेषतः सध्या कोरोना सारख्या वैश्विक महामारीचा सामना करून आपण महाराष्ट्राला पुन्हा नवीन शिखरावर पोहचवले पाहिजे. शिरापूरसारखे माझे छोटे गाव असो किंवा माझे राज्य असो, ते सुंदर असले पाहिजे. आपल्या ऐतिहासिक वास्तू, आपला वारसा आपण जपला पाहिजे. जगातील अनेक राष्ट्रांनी स्वतःची ओळख जपत, नैसर्गिक मूल्ये जपत, पर्यटनातून पुष्कळ आर्थिक प्रगती केली आहे. मला वाटते की भविष्यात आपण आपल्या निसर्गाला तसेच ऐतिहासिक वारशाला आपली संपत्ती समजले पाहिजे. आणि त्यांच्या संवर्धानासाठी काम केले पाहिजे.” 

महाराष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रांतील यशस्वी वाटचालीमुळे तसेच येथील व्यवसायांच्या उन्नतीमुळे महाराष्ट्र राज्य देशात नेहमीच अग्रेसर राहिले आहे.

- पर्यटन महासंचानालय - महाराष्ट्र राज्य