जायफळ - एक उपयुक्त मसाल्याचा पदार्थ

जायफळाच्या वरील साल नारळाच्या चोडासारखी जाडी असते. नारळास ज्याप्रकारे करवंटी असते त्याप्रमाणे जायफळास सुद्धा पातळ कवच असते. हे पातळ कवच फोडून त्यातून जायफळ बाहेर काढले जाते.

जायफळ - एक उपयुक्त मसाल्याचा पदार्थ
जायफळ

जगभरात आढळणाऱ्या मसाल्यांचे प्रमुख पदार्थांपैकी एक पदार्थ म्हणजे जायफळ. जायफळाचे उत्पादन प्रामुख्याने आशिया खंडाच्या पूर्वेकडील बेटांवर होते. 

इंडोनेशिया देशांतील बांडा या बेटावर मात्र अत्यंत उच्च प्रतीची जायफळे तयार होतात. भारतात केरळ व तामिळनाडू आदी राज्यांत जायफळाचे उत्पादन घेतले जाते.

पूर्वी जायफळाची झाडे बागांमध्ये लावली जात मात्र आपल्याकडील हवामानामुळे त्यांस फळे येत नसत मात्र जायफळाचे झाड खूप सुंदर दिसत असल्याने एक शोभिवंत झाड म्हणून सुद्धा त्याची जोपासना केली जाते.

जायफळाच्या झाडांस जायफळाचे उत्पादन साधारणतः पावसाळ्यात येते. पूर्णपणे पिकलेले जायफळ हे पेरूच्या आकाराचे असते. जायफळाचा रंग पिवळसर असतो. जायफळाच्या आत जायपत्रीचे आवरण असून तिचा रंग लाल असतो.

जायफळाच्या वरील साल नारळाच्या चोडासारखी जाडी असते. नारळास ज्याप्रकारे करवंटी असते त्याप्रमाणे जायफळास सुद्धा पातळ कवच असते. हे पातळ कवच फोडून त्यातून जायफळ बाहेर काढले जाते.

अदमासे शंभर वर्षांपूर्वी युरोपियन लोकांनी जायफळाचे महत्व ओळखून तेथील जंगले ताब्यात घेतली होती व यामध्ये डच लोक आघाडीवर होते. डच लोक जायफळाची जंगले ताब्यात ठेऊन तेथे काम करण्यास स्थानिक गुलामांची नेमणूक करीत असत.

जायफळ पिकून तयार झाले की त्या झाडावर चढून लांब आकडी लावून झाडाच्या डहाळ्या जवळ आणून त्यावरील जायफळ काढून घेतले जाते. या नंतर जायफळावरील साल काढले जाते आणि आतील जायपत्री प्रथम सुरीने काढून घेतली जाते व यानंतर उरलेले जायफळ उन्हात ठेवले जाते.

उन्हात एक दिवस जायफळ ठेवले की ती परत आत आणून बांबूच्या साटीवर ती घालून खालून अग्नीची आच दिली जाते त्यामुळे वरील कवच फुटून आतील जायफळ बाहेर पडते. यानंतर ते जायफळ समुद्राच्या पाण्यात चुना कालवून त्याने धुतले जाते आणि ती वाळवली जाऊन एका थैलीत भरली जातात आणि नंतर ती विक्रीकरिता बाजारात पाठवली जातात. 

जायफळाचा उपयोग मसाल्यात, विड्याच्या पानांत, बासुंदी आणि पाक इत्यादींमध्ये आणि औषधांमध्ये सुद्धा केला जातो. जायफळापासून तेल सुद्धा काढले जाते. जायफळ हे खऱ्या अर्थी संपूर्ण जगभरात लोकप्रिय असलेले उपकारक फळ आहे.