हुएनस्तंग - भारतभ्रमण करणारा चिनी यात्री

चीनमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार करीत असताना हुएनस्तंग यास बौद्ध धर्माचे उगमस्थान असलेला भारत पाहण्याची ओढ लागली आणि ६२९ साली म्हणजे वयाच्या तेविसाव्या वर्षी त्याने भारताकडे प्रयाण केले.

हुएनस्तंग - भारतभ्रमण करणारा चिनी यात्री

प्राचीन काळी ज्यावेळी प्रवासाची सुविधा फारशी अद्ययावत नव्हती त्याकाळी नवीन देश व संस्कृती जाणून घेण्याची जिज्ञासा व ज्ञानाची ओढ या कारणांमुळे जगाच्या विविध भागातील काही लोकांनी देशदेशीचे प्रवास केले व या प्रवासावर वर्णने लिहिली ज्यावरून आजही त्या काळातील इतिहास जाणून घेण्यास मदत होते.

प्राचीन काळात जगाचा प्रवास करण्यामुळे प्रसिद्ध झालेले जे प्रवासी आहेत त्यामध्ये हुएनस्तंग हे नाव प्रसिद्ध आहे. हुएनस्तंग हा एक चिनी नागरिक असून त्याचा जन्म इसवी सन ६०६ साली झाला होता. चीन देशातील क्यूशी या जिल्ह्यातील होननफू हे त्याचे जन्मगाव होते.

त्याकाळी चीनमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार मोठ्या प्रमाणात झाला होता व अनेक युवक बौद्ध भिक्षु होत असत. हुएनस्तंग याचा मोठा भाऊ सुद्धा भिक्षु झाल्यामुळे हुएनस्तंग हा सुद्धा प्रथम भिक्षु झाला.

हुएनस्तंग हा जन्मतः विद्वान असल्याने फार कमी काळात त्याने चीनमध्ये एक ज्ञानी बौद्ध भिक्षु म्हणून नावलौकिक मिळवला व चीन देशातील विविध प्रांतात प्रवास करून बौद्ध धर्माचा प्रसार व प्रचार केला. त्याकाळी चीनची राजधानी शिनगफू येथे होती व या ठिकाणी त्याने काही काळ वास्तव्य केले व येथे त्याच्या लौकिकात अधिकच भर पडली.

चीनमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार करीत असताना हुएनस्तंग यास बौद्ध धर्माचे उगमस्थान असलेला भारत पाहण्याची ओढ लागली आणि ६२९ साली म्हणजे वयाच्या तेविसाव्या वर्षी त्याने भारताकडे प्रयाण केले. भारतात येण्याचा त्याचा प्रमुख उद्देश बौद्धधर्माचा अभ्यास करणे, संस्कृत भाषा शिकणे आणि पुस्तकांचा संग्रह करणे हा होता.

त्याकाळी सीमाबंदी कायदा असल्याने हुएनस्तंग याने प्रथम चीनची उत्तर पश्चिम सीमा गाठली आणि तेथून आक्सस आणि जैक्स्टर्स या नद्यांचे प्रदेश पाहून हिंदुकुश पर्वत ओलांडून भारतातील काश्मीर प्रांतात प्रवेश केला.

सुरुवातीस हुएनस्तंग याने काश्मीर येथे तब्बल दोन वर्षे वास्तव्य करून तेथे अध्ययनात काळ व्यतीत केला. काश्मीर येथून हुएनस्तंगने मथुरा गाठली आणि तेथून ठाणेश्वर आणि गंगा व यमुना या पवित्र नद्यांच्या काठावरील प्रदेश पाहून तो कनोज येथे रवाना झाला. कनोज येथून हुएनस्तंग याने बौद्ध आणि हिंदू धर्मांची क्षेत्रे पाहिली आणि नालंदा येथील प्रख्यात विद्यापीठात दोन वर्षे संस्कृत भाषेचा अभ्यास केला. नालंदा येथेच त्याने बौद्ध धर्मातील तत्वज्ञानाचा सुद्धा अभ्यास केला. 

नालंदा येथील अभ्यास पूर्ण झाल्यावर हुएनस्तंग याने तब्बल पंधरा वर्षे भारतात वात्सव्य करून संपूर्ण भारत पाहिला आणि येथून साहित्य, मूर्ती आणि अनेक अवशेष घेऊन तो इसवी सन ६४५ साली काबूलमार्गे चीनमध्ये परत गेला.

चीनमध्ये परत गेल्यावर चीनच्या बादशाहने हुएनस्तंगचा मोठा सत्कार करून त्यास आपला भारतातील अनुभव प्रवासवर्णनाच्या स्वरूपात लिहिण्यास सांगितले. हुएनस्तंग सुद्धा बादशहाच्या विनंतीचा स्वीकार करून इसवी सन ६४८ मध्ये म्हणजे एकूण तीन वर्षे लिखाण करून आपले प्रवासवर्णन पूर्ण केले. हुएनस्तंग याने लिहिलेले प्रवासवृत्त हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास जाणून घेण्यास अत्यंत लाभदायक ठरले आहे.

इसवी सनाच्या ६६४ व्या साली हुएनस्तंग याचा चीन येथेच मृत्यू झाला आणि मृत्यूपूर्वी त्याने आपल्या शिष्याकडून आयुष्यात केलेल्या चांगल्या कामांची यादी तयार करवून घेतली आणि आपल्या सर्व शिष्यांदेखत ती वाचून घेतली.

वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी भारतात येऊन तेथे अनेक वर्षे राहून भारताचा एक वैभवशाली प्राचीन इतिहास लिहून हुएनस्तंग याने इतिहास क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली आहे.