शरीरास पोषक घटक द्रव्ये
मानवी शरीरास पोषक असे घटक जे अन्नामार्गे आपल्या शरीरास मिळतात ते घटक कोणते हे या लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू कारण हे घटक शरीरास जिवंत ठेवण्यासाठी अत्यंत गरजेचे असतात त्यामुळे दररोज आपल्या शरीरास हे घटक अन्नाच्या माध्यमातून मिळत राहतील याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
मानवी शरीर म्हणजे एक अव्याहत चालणारे यंत्र आहे. मनुष्य काहीच काम न करता स्वस्थ बसून राहिला तरी त्याची शरीर यंत्रणा काम करणे थांबवत नाही. पण ही शरीर यंत्रणा चालण्यासाठी इंधनाची गरज तर भासणारच. गाडीमध्ये इंधन नसल्यास गाडी त्वरित बंद पडते तसेच मानवी शरीराचेही आहे मात्र मानवी शरीराचे इंधन हे पेट्रोल अथवा डिझेल नसून अन्न आहे व या अन्नातील महत्वाचे घटक दररोज आपल्या शरीरास मिळाले तरच आपली शरीर यंत्रणा योग्य प्रकारे कार्यरत राहू शकते.
मानवी शरीरास पोषक असे घटक जे अन्नामार्गे आपल्या शरीरास मिळतात ते घटक कोणते हे या लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू कारण हे घटक शरीरास जिवंत ठेवण्यासाठी अत्यंत गरजेचे असतात त्यामुळे दररोज आपल्या शरीरास हे घटक अन्नाच्या माध्यमातून मिळत राहतील याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
प्रोटीन (Protein) - रासायनिक दृष्ट्या आपल्या शरीरास एकूण सहा प्रकारची द्रव्ये गरजेची असतात यातील पहिले द्रव्य म्हणजे प्रोटीन, मराठीत यास प्रथिन असेही म्हणतात. प्रोटीन हे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन या मूलद्रव्यांचे मिश्रण आहे. प्रोटीनमध्ये कधीकधी फॉस्फरस आणि गंधक हे घटकही समाविष्ट असतात. प्रोटिन्स विविध प्रकारच्या अन्नातून आपल्या शरीरास प्राप्त होत असले तरी सर्व प्रकारच्या प्रोटिन्समध्ये नायट्रोजनचे प्रमाण हे सोळा टक्के असतेच. प्रोटिन्समध्ये अमिनो ऍसिड नावाचा एक अत्यंत महत्वाचा घटक असतो व त्याच्या संख्येवरून प्रोटीनची गुणवत्ता ठरवली जाते. मानवी शरीराच्या वाढीसाठी आणि शरीराची झीज भरून काढण्यासाठी प्रोटीनचा प्रामुख्याने उपयोग केला जातो.
कार्बोहायड्रेट्स (Carbohydrates) - कार्बोहायड्रेट्स हा कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन या घटकांचे मिश्रण असते. यांना मराठीत कर्बोदके म्हणून ओळखतात. कार्बोहायड्रेट्स ही प्रोटीन प्रमाणे शरीराच्या झिजेसाठी फायद्याची नसली तरी आपल्या शरीराची जी हालचाल सुरु असते त्यास कार्बोहायड्रेट्स मुळे शक्ती मिळते.
चरबी (Fat) - चरबी हा शरीरास आवश्यक असणारा तिसरा महत्वाचा घटक. हा आपल्याला तेल, तूप इत्यादी वनस्पतीजन्य तसेच प्राणिजन्य अन्नातून प्राप्त होतो. चरबीमध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे घटक असतात. चरबीचा उपयोग शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी व टिकवण्यासाठी होतो.
पाणी (Water) - शरीरास उपयुक्त असा अतिशय महत्वाचा घटक म्हणजे पाणी. मानवी शरीराचा दोन तृतीयांश भाग हा पाण्याने व्यापला आहे यावरून पाण्याचे महत्व समजेल. पाण्यामुळे शरीरातील सर्व द्रव पदार्थ चांगल्या स्थितीत राहतात. आपल्या शरीरातून मल, मूत्र, घाम आणि उच्छ्वास यांच्या मार्गाने दररोज २५०० ग्रॅम पाणी बाहेर जाते आणि तेवढेच बाहेरून खाद्य व पेयांतून शरीरात येते. पाण्याच्या योगे निर्माण झालेल्या घामामुळे व मल मूत्रामुळे शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर जातात त्यामुळे शरीरात विषारी पदार्थ वाढू द्यायचे नसतील तर नियमितपणे पुरेसे पाणी पिणे अत्यंत गरजेचे आहे. पाण्यामुळे शरीराची उष्णता कायम राहण्यासही मदत होते.
खनिज द्रव्ये (Minerals) - शरीरासाठी महत्वाचा असा पाचवा घटक म्हणजे खनिज द्रव्ये, हे आपल्या शरीरात मोठ्या प्रमाणात असतात व काही अतिशय कमी प्रमाणात असतात त्यामुळे अन्नावाटे यांचे संतुलन कायम राखणे गरजेचे असते. खनिज द्रव्येही शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असतात.
व्हिटॅमिन्स (Vitamins) - अन्नातील आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे व्हिटॅमिन्स, शरीरात जरी हे कमी प्रमाणात असले तरी हे नसल्यास जीवन अशक्य होऊ शकते त्यामुळे अन्नातून व्हिटॅमिन्स योग्य प्रमाणात मिळणेही अत्यंत आवश्यक आहे.
उत्तम आरोग्य हाच खरा दागिना ही म्हण आपल्या पूर्वजांपासून प्रचलित आहे त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी आपल्या शरीरास वर लिहिलेले सहा घटक योग्य प्रमाणात व नियमित मिळत राहतील याची काळजी घेणे म्हणजे निरोगी व दीर्घायुष्याकडे वाटचाल करण्यासारखेच आहे.