डॉ. विश्राम रामजी घोले - एक वंदनीय समाजसुधारक

१८७४ साली त्यांची पुण्यास बदली झाली व पुण्यात ते अगदी १८८९ सालापर्यंत म्हणजे निवृत्त होईपर्यंत नोकरी करत होते. निवृत्त झाल्यावर त्यांनी पुण्यात स्वतःचे रुग्णालय सुरु करून तेथे रुग्णसेवा सुरु केली. शस्त्रक्रिया हा त्यांचा मुख्य पेशा असल्याने पुण्यात ते खूपच प्रसिद्ध झाले.

डॉ. विश्राम रामजी घोले - एक वंदनीय समाजसुधारक

एकोणिसाव्या शतकात भारत ज्या कर्तृत्वाने मोठ्या व्यक्ती झाल्या त्यामध्ये डॉ. विश्राम रामजी घोले यांचे नाव मानाने घेतले जाते. उदारमतवाद व समाजसुधारणा या दोन तत्वांवर एकनिष्ठ राहून त्यांनी केलेले कार्य आजही अमर आहे.

विश्राम रामजी घोले यांचे कुटुंब हे मूळचे कोकणातील चिपळूण येथे. गवळी समाजातील घोले घराणे हे त्याकाळी कोकणातील प्रतिष्ठित घराणे म्हणून ओळखले जात असे. विश्राम घोले यांचे पणजोबा गोपाळराव हे अंजनवेल या किल्ल्याचे किल्लेदार होते. गोपाळरावांना संभाजीराव नावाचे पुत्र होते व त्यांनीही गोपाळगडाची किल्लेदारी केली. १८१८ साली ब्रिटिशांची सत्ता आल्यावर संभाजीरावांना कैद करण्यात आले मात्र त्यांनी हुशारीने आपली सुटका करून घेतली व तेथून ते तत्कालीन हबसाणात म्हणजे सध्याच्या मुरुड जंजिरा परिसरात गेले.

पुढे संभाजीराव यांचे पुत्र रामजी यांनी सैन्यात आपली कर्तबगारी दाखवली. ब्रिटिशांच्या चौदाव्या हिंदुस्थानी पायदळ पलटणीत त्यांनी सुभेदार म्हणून कार्य केले. ही पलटण कोकणातील वेंगुर्ले येथून कार्यरत होती. वेंगुर्ले येथेच रामजी यांचे वास्तव्य असताना त्यांना १८३३ साली पुत्ररत्नाचा लाभ झाला व य पुत्राचे नाव विश्राम असे ठेवले गेले. 

पुढे रामजी हे कार्यरत असलेली पलटण सिंध प्रांतात गेल्याने विश्राम हे सोळा वर्षे तत्कालीन ठाणे जिल्ह्यात आपल्या मामांकडे राहावयास होते. यानंतर ते दापोली येथे आपल्या वडिलांच्या मामांकडे राहावयास आले. वडिलांचे मामा हे पेन्शनर सुभेदार होते व दापोली येथे विश्राम यांच्या विद्याभ्यास खऱ्या अर्थी सुरुवात झाली. पुढे रामजी घोले यांची पुण्यास बदली झाली व विश्राम दापोली येथून पुण्यास येऊन तेथेच पुढील शिक्षण घेऊ लागले.

वडिलांची कामानिमित्त सतत बदली होत असल्याने विश्राम यांना सुद्धा सारखे स्थित्यंतर करावे लागत असे. पुढे विश्राम यांच्या वडिलांची मुंबईस बदली झाली. मुंबईस त्यांनी शिक्षण घेता घेता १८५२ साली सेकंडग्रेड अप्रेंटीसची नोकरी मिळाली. दोन वर्षे नोकरी केल्यावर त्यांनी पुढील शिक्षणासाठी ग्रांट मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. १८५७ मध्ये त्यांनी हॉस्पिटल असिस्टंटची परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्याच वर्षी बाटलीवाला रुग्णालयात त्यांना नोकरी मिळाली. मात्र विश्राम यांना हे शिक्षण पुरेसे वाटत नव्हते त्यामुळे त्यांनी नोकरी करता करता अभ्यास करून पुढील पदवी प्राप्त केली. १८५७ ते १८६८ या काळात हॉस्पिटल असिस्टंटची नोकरी करत असताना १८५७ च्या उठावाने त्यावेळी जोर धरला असल्याने विश्राम यांना सतत पुणे, नगर, शिऊर, बुंदेलखंड, महू, ललितपूर, झांशी या ठिकाणी जावे लागत असे.

रातगड, बरोडिया, सागर, धाराखोटा, मदनपूर, झांशी, बिटवा, कुंच, मथुरा, गालवली, काल्पी आणि ग्वाल्हेर येथे तर युद्धाची धामधूम सुरु असताना त्यांना जखमी सैनिकांची सुश्रुषा करावी लागत असे. यावेळी दोन्ही बाजूनी गोळ्यांचे वर्षाव सुरु असतानाही युद्धभूमीत सैनिकांची सुश्रुषा करण्याचे कठीण काम विश्राम घोले यांनी केले. प्रत्यक्ष युद्धातील आणीबाणीत वैद्यकीय सेवेचा अनुभव हा त्यांच्यासाठी खूप मोलाचा ठरून त्यांनी वयाच्या पस्तिसाव्या वर्षी ग्रॅण्ट मेडिकल कॉलेजमध्ये असिस्टंट सर्जनाची परीक्षा दिली आणि १८७० साली त्यांची कुमठा येथील दवाखान्यावर असिस्टंट सर्जन म्हणून नेमणूक झाली.

१८७४ साली त्यांची पुण्यास बदली झाली व पुण्यात ते अगदी १८८९ सालापर्यंत म्हणजे निवृत्त होईपर्यंत नोकरी करत होते. निवृत्त झाल्यावर त्यांनी पुण्यात स्वतःचे रुग्णालय सुरु करून तेथे रुग्णसेवा सुरु केली. शस्त्रक्रिया हा त्यांचा मुख्य पेशा असल्याने पुण्यात ते खूपच प्रसिद्ध झाले. १८८७ साली त्यांना रावबहादूर ही त्याकाळातील मानाची पदवी मिळाली याशिवाय त्यांच्याकडे ऑनररी सर्जन टू दि व्हॉईसरॉय ही पदवी आणि मुंबई युनिव्हर्सिटीचे फेलो हे पदही होते.

पुण्यास त्याकाळी नगरपालिका होती व या ठिकाणी ते कमिशनर म्हणूनही कार्यरत होते. त्याकाळात पुणे शहराच्या सुधारणेमध्ये त्यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. नालेसफाई, पाण्याचा  पुरवठा, स्मशानभूमी इत्यादी कार्य त्यांनी नगरपालिकेत कमिशनर पदी असताना करवून घेतली आणि स्वतःच्या खर्चाने पुण्यात दोन हौद आणि कारंजी निर्माण केली. यातील एक हौद त्यांचे वडील रामजी यांच्या स्मरणार्थ तर दुसरा त्यांची कन्या बाहुली हिच्या स्मरणार्थ बांधला होता. कोकणातील दापोली येथे व्यावसायिक शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्यांनी तेथील शालेय खात्याच्या संचालकांना तेव्हाचे दोन हजार रुपये पाठवले होते.

पूर्वी सैन्यात ठराविक समाजाच्याच पलटणी असत मात्र विश्राम घोले यांनी भारतातील सर्वच तरुणांना सैन्यात स्थान देऊन त्यांच्या योग्यतेप्रमाणे आणि कर्तृत्वानुसार त्यांना बढती द्यावी असा सल्ला तत्कालीन सरकारला दिला होता. वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात अविरत कार्य केल्यानंतर सन १९०० मध्ये म्हणजे वयाच्या ६७ व्या वर्षी मधुमेहाच्या विकाराने विश्राम रामजी घोले यांचे निधन झाले. मनुष्याने राजसेवा आणि समाजसेवा यांच्यात समतोल राखल्यास समाजसुधारणा मोठ्या प्रमाणात करता येऊ शकते हा आदर्श डॉ. विश्राम रामजी घोले यांनी प्रस्थापित केला तो आजही अनुकरणीय आहे.