पाणी तापवायचे तपेले

गिझर, हिटर, शॉवर या गोष्टी कुणी नीटशा ऐकलेल्याही नव्हत्या. क्वचित कुणी मुंबईत जाई तेव्हा या अपूर्वाईच्या गोष्टी पाहून थक्क होई. मग गावी परत आल्यावर तो सार्‍यांना ते रंगवून रंगवून सांगी. तेव्हा ऐकणारे तोंडात बोटे घालत. पितळेचा जाडजूड बंब लोकांना माहित होता, पण सर्वसामान्यांना तो कसा परवडणार?

पाणी तापवायचे तपेले

केवळ सुखवस्तूंकडेच तो असे. मग रोजच्या आंघोळीला आंघोळीला गरम पाण्याची गरज मंडळी कशी भागवत असत? तर त्यांच उत्तर आहे हे पाणी तापवायचे भले मोठे हंडे.

पूर्वी कुटूंब मोठी असत. घरात पै-पाहूणे, आश्रितांचा राबता असे. खेरीज सोवळ्या ओवळ्याच्या अतिरेकी कल्पना अस्तित्वात होत्या. भारतीय जीवनशैलीत आंघोळीला अनन्यसाधारण महत्त्व असे. ते क्रियाकर्म केल्याशिवाय रोजची देवपूजा वर्ज्य असे आणि देवपूजेशिवाय अन्नग्रहण त्याज्य म्हणून आंघोळीचे पाणी तापवायला विशेष व्यवस्था असायची. पण तिही घरात स्वयंपाकघर असलेल्या चूलीवर नाही तर बाहेर मागीलदारी न्हाणी घराजवळ किंवा मागच्या पडवीत मांडलेल्या वेगळ्या चूलीवर पहाटेलाच ही चूल धडधडून पेटवली जाई. पाणी तापवायचा हंडा साधाच असे पण जाडजूड घसघशीत व धारदार निमूळत्या तोंडाचा असे, तांब्याचा पण कालप्रवाहात त्यावर एवढे किटण चढलेले असे की, आपला मूळ रंग हरवून केवळ काळाकुट्ट एवढा एकमेव रंग त्याने धारण केलेला असे. त्याच्या बुडाला तर काळेकुट्ट जाड-जूड किटणच चढलेले असे. चुलीतल्या भरपूर धगीने पाणी चटकन तापे. मग हे पाणी फडक्याच्या सहाय्याने पितळी बादलीत ओतून घ्यायचं व न्हाणीत आंघोळीला न्यायचं. अर्थात आंघोळीला बाथरुम काय न्हाणीघरंही क्वचित असत. बर्‍याच घरात झाडांच्या वाळलेल्या फांद्यांची सलदी बनवलेली असत. न्हाणीचा एक खास दगड असे. त्याला सलद्यांनी चारही बाजूंना झाकून आडोसा तयार करत आणि झाली आंघोळीची सोय! किंवा मग घरातच एक आंघोळीची मोरी असे. तसही पावसाळ्यात सलद्यांचा वापर अशक्यच असे.

पाणी तापवायच्या हंड्याला खरा सन्माननीय दिवस येई तो दिवाळीच्या आधीचा दिवस. दिवाळीच्या पहाटन्हाणीसाठी हा हंडा स्वच्छ घासून चकचकीत करत. मग त्यावर झेंडूच्या फुलांची माळ घालून त्याची पूजा करत. मग ते पाण्याने काठोकाठ भरुन आंघोळीसाठी सज्ज केला जाई. वर्षातून एकदा मिळालेल्या मानाच्या जोरावर मग तो पुन्हा वर्षभर काळा पडून घ्यायला तयार असे. घरात हंडे तसे बरेच असत. तांब्याचे, पितळेचे पण हे सारे पिण्याचे व स्वयंपाकाचे पाणी भरायला  वापरत. पाणी तापवायचा हंडा वेगळा व घराबाहेर असे. सगळ्यांच्या आंघोळी झाल्या की तो बाहेरच उपडा घालून ठेवत. पण बर्‍याच वेळा तो दिवसभर पाण्याने भरलेलाही असे. चूलीतली उरली-सुरली धग व कडक ऊन या जोरावर दिवसभर त्यातील पाणी कोमट राही. दिवसा या नाही त्या कारणाने बाहेरच्या वापराला गरम पाणी मिळण्याची सोय होई. पण दरखेपेला एवढा मोठा कडक पाण्याने भरलेला जाड हंडा उचलणे व बादलीत उपडा करणे कमी ताकदीचे काम नसे. एकत्र मोठ्या कुटुंबात पाण्याच्या मोठ्या गरजेसाठी हंडेही चांगले जाडजूड व ऐसपैस आकाराचे ठेवलेले असत. पण मग असे मोठे हंडे चिमुकल्या चूलीवर बसणे शक्यच नसे, मग त्यासाठी सहा विटांची वेगळी मजबूत चूल मांडत. तीन दिशांना दोन-दोन विटा मांडल्या की, पुढचं तोंड जळावण सारायला उघडं ठेवत. मग त्यावर तो भला मोठा हंडा विराजमान होई. हंड्याचे तोंड झाकायला पितळी बादली हवीच. बायकांना हा हंडा उचलून बादलीत रिकामा करणं शक्यच नसे. मग त्या छोट्या तपेलीने गरम पाणी उपसत रहात. हीच तपेली मग आंघोळ करताना बादलीतले पाणी अंगावर ओतून घ्यायला उपयोगी पडे. प्लास्टीकचे मग, जग हा पुढचा जमाना होता. पण आंघोळीच्या पाण्यासाठीही तांब्या पितळेच्या वस्तू वापरण्यात आरोग्याचा फार मोठा विचार होता हे निश्चित. यासाठी जळावण म्हणूनही आजूबाजूंच्या झाडांच्या काटक्या, लाकूड फाटा याचाच उपयोग होत असे. शिवाय उरलेली राख घरात भांडी घासायला उपयोगी येई.

पाणी तापवायची चूल आणि त्यावर हा हंडा घरातील लहान मुले आणि क्वचित वृद्धांचेही जीवाभावाचे ठिकाण असे. सकाळी थंडीच्या दिवसात यांच्या भोवती कोंडाळे करुन शेकत थंडी घालवत सकाळ सरलेली असे. याच चूलीत भाजून फणसाच्या, काजूच्या, आंब्याच्या बिया (कोय) खात मुलं बालपण संपवत. सुकी मासळी विशेषतः बोंबिल, वाकट्या, सोवळ्या, ओवळ्याच्या कल्पनेत सणावारी घरातल्या चूलीत भाजायची परवानगी नसे. मग त्यावेळी अशी घराबाहेरची चूल कामी येई आणि चुलीवरील हंडा हसत राही.

- श्रीनिवास गडकरी