वारकरी संप्रदाय - महाराष्ट्राचा अभिमान

वारकरी संप्रदायाचा मुख्य सोहळा म्हणजे आषाढी एकादशी त्यामुळे आषाढ महिना सुरु झाला की समस्त वारकऱ्यांना वेध लागतात आषाढी एकादशीचे.

वारकरी संप्रदाय - महाराष्ट्राचा अभिमान

Marathi Buzz Shop

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

Marathi Buzz Shop

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

महाराष्ट्रास वारकरी संप्रदायाचा थोर वारसा आहे. वारकरी संप्रदाय हा भागवत संप्रदाय या नावानेही ओळखला जातो. जातीभेद विरहित मानवतेच्या शिकवणीचा प्रचार व प्रसार करणाऱ्या वारकरी संप्रदायात अनेक थोर संतांची परंपरा लाभली आहे. या संतांनी वेगवेगळ्या कालावधीत जन्म घेऊन तत्कालीन राजकीय व सामाजिक परिस्थितीत लोकांना प्रबोधन केले.

वारकरी संप्रदायाचे मुख्य दैवत म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी. विठ्ठलास पांडुरंग असेही नाव आहे. वारकरी संप्रदायासाठी तर ही साक्षात त्यांची विठूमाऊली आहे. वारकरी संप्रदायाचा मुख्य सोहळा म्हणजे आषाढी एकादशी त्यामुळे आषाढ महिना सुरु झाला की समस्त वारकऱ्यांना वेध लागतात आषाढी एकादशीचे. आषाढ शुद्ध ११ या दिवशी येणाऱ्या आषाढी एकादशीस देवशयनी अथवा शयनी एकादशी या नावानेही ओळखले जाते कारण या दिवशी भगवान विष्णू शयन करतात व कार्तिक शुद्ध एकादशीस ते शयनातून जागे होतात त्यामुळे कार्तिक शुद्ध एकादशीस प्रबोधिनी एकादशी या नावाने ओळखले जाते.

वारकरी म्हणजे भागवत पंथांचे अनुसरण करून दर वर्षी आषाढी एकादशीस पायी चालत पंढरपुरास आपल्या विठूमाऊलीच्या दर्शनास जातो तो. आषाढी एकादशीस पायी चालत पंढरपुरास जाण्याच्या प्रथेस वारी असे म्हणतात व ही वारी करणारे ते वारकरी. भागवत संप्रदाय हा अतिशय प्राचीन संप्रदाय असला तरी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरास श्री विठोबा रखुमाईच्या दर्शनास जाण्याची प्रथा म्हणजे वारकरी पंथ ही इसवी सन १२९० च्या पूर्वीपासून प्रचलित झाली असावी.

वारकरी पंथामध्ये जी संतपरंपरा आहे त्यातील अनेक विठ्ठलभक्त संतांची पालखी त्यांच्या मूळ स्थानावरून पंढरपुरास नेण्याचीही परंपरा आहे. ही प्रथा फार वर्षांपूर्वी सुरु झाली असे म्हटले जाते. फार पूर्वी हैबतराव नावाचे एक गृहस्थ होते जे संत ज्ञानेश्वरांचे भक्त होते. त्यांचे मूळ गाव साताऱ्याजवळील आरफळ हे होते. आपल्या उतारवयात ते आळंदीस येऊन राहिले त्यावेळी त्यांनी ज्ञानेश्वरांच्या पादुका पालखीत ठेवून पंढरपुरास मिरवत नेण्याची परंपरा सुरु केली तेव्हापासून ही परंपराही नेमाने सुरु आहे.

ज्ञानेश्वरांच्या पालखीसहित देहूहून संत तुकाराम महाराजांची, पैठणहून संत एकनाथ महाराजांची, त्र्यंबकेश्वरहून संत निवृत्तीनाथ महाराजांची, एदलाबाद येथून संत मुक्ताबाईंची, मच्छिन्द्रगडावरून श्री मच्छिन्द्रनाथ यांची, सासवडहून संत सोपानदेवांची, अरणगाव येथून संत सावतामाळी महाराजांची आणि इतर अनेक संतमाहात्म्यांच्या पालख्या मूळ स्थानावरून निघून पंधरा वीस दिवसांचा प्रवास करून दशमीच्या दिवशी पंढरपुरात दाखल होतात.

प्रत्येक पालखीच्या निघण्याचे दिवस आणि वाटेतील मुक्काम हे पालखीच्या मुख्य स्थानापासून पंढरपूरच्या अंतरानुसार ठरलेले असतात व हे सर्व कार्य वारकरी बांधवांकडून अतिशय नियोजनबद्ध आणि बिनचूक होत असते. पालख्यांचे प्रस्थान पंढरपुरास होत असता समस्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले वारकरी या पालख्यांना मिळतात आणि विठ्ठलभक्तांचा एक महासागर निर्माण होऊन पंढरीच्या दिशेने वाटचाल सुरु करतो.

लाखोंच्या संख्येने हा महासागर मग भक्तिरसात तल्लीन होत भजनाच्या गजरात पंढरपूरकडे वाटचाल करू लागतात. मार्गात त्यांना भोजन पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून परिसरातील समस्त गावे वारकऱ्यांची सेवा करतात. ही सेवा म्हणजे एक प्रकारे पंढरीस जाण्याचे पुण्यच असते.

ज्येष्ठ नवमीस आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांची जी पालखी पंढरपुरास निघते ती पुणे, सासवड, कापूरहोळ, शिरवळ, लोणंद, तरटगाव, फलटण, वरड, नातेपोते, माळशिरस, वेळापूर, शेगाव, वाखरी मार्गे पंढरपूर येथे जाते व मार्गात उर्वरित संतजनांच्या पालख्या या पालखीस मिळतात. पंढरपुरास भक्तांची गर्दी ही प्रचंड प्रमाणात असतेच आणि सर्व वारकरी आणि पालख्या ज्यावेळी येथे येतात त्यावेळी हे क्षेत्र भक्तांनी फुलून जाते.  विठ्ठलनामाचा गजर, टाळ, मृदूंग, कीर्तन, भजन या सर्वांत हे क्षेत्र नाहून निघते. 

इसवी सनाचे तेरावे शतक हा जर वारीच्या उगमाचा काळ मानला तरी गेली आठशे वर्ष अव्याहतपणे ही परंपरा महाराष्ट्रात सुरु आहे. भक्तिरसात डुंबून वारकरी बांधव दिंडी (वीणा) आणि पताका घेऊन आपल्या दैवताच्या दर्शनासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी करतात ही निश्चितच सामान्य गोष्ट नाही.