शेणखताचे फायदे व महत्व
गोवंशाचे आणखी एक महत्व म्हणजे त्यांच्या शेणापासून खतही तयार केले जाते व ही प्रक्रिया आपल्या भारत देशात फार पूर्वीपासून चालत आली आहे. गोवंशाच्या शेणापासून निर्माण झालेल्या खतास शेणखत या नावाने ओळखले जाते.
पारंपरिक कृषी प्रक्रियेतील एक अत्यंत उपयुक्त असे खत म्हणजे शेणखत. भारत देश जसा कृषिप्रधान आहे तसाच तो गोधनपालक सुद्धा आहे व प्राचीन काळापासून कृषिक्षेत्रात गोधनाचा वापर केला जात होता व आजही केला जात आहे. शेताची नांगरणी ही बैलांचा वापर करूनच केली जाते. गोधनास आपल्या भारतात एवढे महत्व असल्याचे कारण म्हणजे गोवंश हा मानवजातीस विविध प्रकारे कायमच उपयोगी पडत असतो.
गोवंशाचे आणखी एक महत्व म्हणजे त्यांच्या शेणापासून खतही तयार केले जाते व ही प्रक्रिया आपल्या भारत देशात फार पूर्वीपासून चालत आली आहे. गोवंशाच्या शेणापासून निर्माण झालेल्या खतास शेणखत या नावाने ओळखले जाते. पाश्चिमात्य देशात ज्यावेळी सोनखताचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात होता त्यावेळी भारत देशात शेणखताचा वापर केला जात असे व ही दोन्ही खते शेतीस अत्यंत उपयुक्त आहेत.
शेणखतात प्रामुख्याने गाय, बैल, म्हैस आणि रेडा या गोवंशातील प्राण्यांचे शेण वापरले जाते त्यामुळे कृत्रिम खतांनी उत्पादकता वाढत असली तरी पिकांचा कस कमी होतो व त्यामुळेच भारतीय शेतकरी पुन्हा एकदा पारंपरिक खतांकडे मोठ्या प्रमाणात वळताना दिसत आहेत.
शेणखत हे कसे तयार करावे याची सुद्धा एक प्रक्रिया आहे. एक मोठा खड्डा तयार करून त्यावर एक छप्पर केले जाते कारण उघड्यावर शेणखत ठेवल्यास त्याचा संपर्क गरम हवेसोबत होऊन त्यातील पोषक गुणधर्म वाफेच्या रूपात उडून जाऊ शकतात आणि खताचा दर्जा कमी होऊ शकतो.
शेणखतासाठी खड्डा तयार करून त्यावर छप्पर केले की त्या खड्ड्यात गुरांचे शेण, मूत्र दररोज टाकत राहावे आणि खड्डा पूर्ण भरल्यावर त्यावर गुरांपुढील वैरणीचा केराचा लेप देऊन त्यावर चार इंच मातीचा थर द्यावा. ही प्रक्रिया केल्यानंतर अदमासे एक वर्षांनी उत्तम असे शेणखत तयार होते.
उघड्या जागेत तयार केलेल्या शेणखतातून छप्पर असलेल्या जागेत केलेले शेणखत हे अधिक उपयुक असते मात्र ते उघड्या जागेतील खतातून कमी प्रमाणात पुरते. शेणखताचा दर्जा हा ज्या गुरांच्या शेणाने ते तयार झाले आहे त्यांच्या प्रकृतीवर आणि वयावर अवलंबून असतो आणि तरुण गुरांच्या एका जोडीपासून एका वर्षात चाळीस बैलगाड्या भरतील एवढे शेणखत तयार होऊ शकते.