सोनखत - एक उपयुक्त खत

खतांमध्ये दोन प्रमुख प्रकार आहेत पहिला प्रकार म्हणजे सर्व साधारण अथवा नैसर्गिक खत आणि दुसरा प्रकार म्हणजे कृत्रिम खत.

सोनखत - एक उपयुक्त खत
सोनखत - एक उपयुक्त खत

कृषिप्रधान भारतात जी विविध पिके घेतली जातात त्यामध्ये फलोत्पादन व फुलझाडे यांचाही समावेश होतो. फळझाडे व फुलझाडे ही अशी उत्पादने आहेत जी घरगुती स्तरावर सुद्धा घेता येतात. आपल्याकडे अनेक घरांच्या मागे अथवा पुढे एक छोटीशी फळबाग अथवा फुलबाग असतेच. शहरात जागेची कमी असून लोक आपल्या बाल्कनीत अथवा गच्चीत फुलझाडे अथवा लहान फळझाडे लावून निसर्गाची जपणूक करण्याचा प्रयत्न करतात.

मानवास व इतर प्राणी पक्ष्यांस जगण्यासाठी जशी अन्न व पाण्याची गरज आहे तशीच ती वनस्पतींना सुद्धा असते आणि प्राणी व वनस्पती दोन्ही एकाच प्रकारच्या पाण्यावर जगत असल्या तरी सर्वांचे अन्न विभिन्न आहे. वनस्पतींना जगण्यासाठी व बहरण्यासाठी जे अन्न लागते त्यास खत असे म्हणतात व खत नसल्यास वनस्पती अधिक काळ जगणे अथवा बहरणे अशक्य असते.

खतांमध्ये दोन प्रमुख प्रकार आहेत पहिला प्रकार म्हणजे सर्व साधारण अथवा नैसर्गिक खत आणि दुसरा प्रकार म्हणजे कृत्रिम खत. कृत्रिम खताचा शोध लागण्यापूर्वी मानव नैसर्गिक खताचा वापर करून कृषी उत्पादन घेत असे मात्र जागतिक लोकसंख्येत वाढ झाल्यामुळे लोकांना अधिक अन्नाची गरज भासू लागली व त्यामुळे कृत्रिम खताची आवश्यकता निर्माण होऊन त्या खताचा वापर मोठ्या प्रमाणातील कृषी उत्पादनासाठी सुरु केला गेला मात्र घरगुती अथवा बगिच्यातील फळझाडे आणि फुलझाडे यांच्यासाठी आजही नैसर्गिक खताचाच वापर केला जातो.

नैसर्गिक अथवा सर्वसाधारण खतांमध्ये अनेक प्रकार आहेत व त्यापैकी एक प्रसिद्ध प्रकार म्हणजे सोनखत आणि या खताचा उपयोग सर्व फळझाडांना व फुलझाडांना खूप असतो. 

सोनखत हे मानवी विष्ठेपासून तयार केले जाते व ते वापरात आणण्यापूर्वी प्रथम दहा फूट लांब, सात फूट रुंद आणि तीन ते चार फूट खोल असा खड्डा तयार करावा लागतो. यानंतर त्यात अदमासे चार इंच जाडीचा विष्ठेचा थर लावून त्यावर बारीक आणि सुकलेल्या मातीचा तीन इंच जाड थर लावला जातो. यानंतर परत एकदा विष्ठेचाआणि त्यावर मातीचा थर ही प्रक्रिया खड्डा पूर्ण भरेपर्यंत केली जाते आणि खड्डा भरल्यावर त्याचे तोंड बंद केले जाते.

अदमासे नऊ महिन्यांनी हे सोनखत तयार होते व या काळात खताची दुर्गंधी पूर्णपणे निघून जाते. शेणखताचा शोध हा भारत देशात प्राचीन काळीच लागला असला तरी सोनखताचा वापर सर्वप्रथम युरोपीय देशांत सुरु झाला व कालांतराने याची उपयुक्तता पाहून इतर देशांतही या खताचा वापर केला गेला.

सोनखतात राख मिसळली असता ते लवकर तयार होते असे म्हणतात आणि त्याची उपयुक्तताही वाढते. सोनखत हे फळझाडे, फुलझाडे, बागाईत प्रकारातील उत्पादने, गहू, ऊस आणि भाजीपाला पिकवण्यासाठी प्रामुख्याने वापरले जाते कारण ज्या पिकांना पाण्याची आत्यंतिक गरज असते अशाच पिकांवर सोनखताचा वापर केला जातो.