विजेचा कडकडाट व ढगांचा गडगडाट म्हणजे काय

ध्वनीपेक्षा प्रकाशाचा वेग अधिक असल्याने वीज चमकलेली प्रथम दिसते आणि नंतर ढगांचा गडगडाट अर्थात मेघगर्जना ऐकू येते.

विजेचा कडकडाट व ढगांचा गडगडाट म्हणजे काय
विजेचा कडकडाट व ढगांचा गडगडाट

आपल्या पृथ्वीवर जे निसर्गनिर्मित चमत्कार आहेत त्यापैकी एक म्हणजे आकाशात चमकणारी वीज. वीज ही बहुतांशी पावसाळ्यात अथवा आकाशात पावसाळी ढग दाटून आल्यावर कडाडलेली पाहावयास मिळते मात्र विजेच्या कडाडण्यामागील शास्त्र काय असते हे या लेखातून समजून घेण्याचा प्रयत्न करू.

मुळात वीज चमकण्यासाठी आकाशात ढग असणे गरजेचे असते अन्यथा वीज चमकू शकत नाही. विजेचे धन आणि ऋण असे दोन प्रकार असतात आणि प्रत्येक ढगात या दोन प्रकारातील कुठल्यातरी एका प्रकारची वीज असते. 

हवेमुळे ढगांतील वाफेचे थंड पाणी होऊ लागले की ढग अधिक काळे दिसू लागतात. धनविद्युत ढग ऋण विद्युत ढगाजवळ आला की चकचकाट होऊन विजेच्या दोन्ही शक्ती एकवटतात आणि त्यावेळीच वीज चमकते.

पृथ्वीच्या भोवतालच्या वातावरणात हवेचा अतिशय मोठा दाब आहे. विजेच्या ज्या ठिकाणी चकचकाट होतो तेथील हवा अचानक तापून तेथे पोकळी तयार होते आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी चारही बाजुनी हवा घुसते आणि मोठा आवाज होतो. या आवाजाचे ढगांवरील प्रतिध्वनी आपल्याला ऐकू येतात त्याला ढगांचे गडगडणे असे म्हणतात.

ध्वनीपेक्षा प्रकाशाचा वेग अधिक असल्याने वीज चमकलेली प्रथम दिसते आणि नंतर ढगांचा गडगडाट अर्थात मेघगर्जना ऐकू येते. 

कधीकधी वीज चमकल्यावर एकदाच मोठा आवाज होतो तर कधीकधी बराच वेळ आवाज येत राहतो कारण जर वीज सरळ चमकली तर एकदाच आवाज येतो आणि जर ती वळणे वळणे घेत चमकली तर बराच वेळ ढगांच्या गडगडण्याचा आवाज येत राहतो.

असे म्हटले जाते की जगात एका मिनिटात सहा हजार वेळा वीज चमकते मात्र माणसाचे सुदैव हे आहे की शंभरातील एकच वीज जमिनीत शिरते व जी वीज जमिनीवर पडते त्यामुळं जीवितहानी अथवा आर्थिक हानी होण्याची मोठी शक्यता असते.

फार कमी वेळा आणि बहुतांशी उन्हाळ्यात विजेचा आवाज ऐकू न येता तिचा प्रकाश क्षितिजावर दिसुन येतो व याचे कारण म्हणजे दूरवर झालेल्या विजेच्या चमकण्याचा प्रकाश आकाशातून परावर्तित झालेला असतो. काही प्रसंगी वीज ही गोळ्याच्या स्वरूपातही पाहण्यात येते.