तुलसीविवाह अर्थात तुळशीचे लग्न
देवलोकावर विजय मिळवल्याने जालंधरापासून मुक्ती कशी मिळवावी ही चिंता देवांना पडली व पुढे तर जालंधर इंद्रप्रस्थावर चाल करून इंद्रास जिंकण्याचा बेत करू लागला त्यामुळे देवांच्या संकटात अजून भर पडली.
कार्तिक महिन्यातील एक महत्वाचा सण म्हणजे तुलसीविवाह. आपल्याकडे या सणास तुळशीचे लग्न या नावानेही ओळखले जाते. तुळशी ही वनस्पती आपल्या धर्मात अत्यंत पवित्र मानली गेली असून ती पर्यावरणास उपयुक्त आहेच याशिवाय ती एक आरोग्यदायी वनस्पती सुद्धा आहे. तुळशीच्या पानांचे अथवा रसाचे सेवन केल्याने शरीरास अनेक लाभ होतात हे जगभरातील शास्त्रज्ञांनी मान्य केले आहे.
तर अशा या देवत्वास पावलेल्या तुळशीच्या लग्नाविषयी आपण या लेखातून जाणून घेऊ. तुलसीविवाह हा सण कार्तिक महिन्याच्या द्वादशीस साजरा केला जातो व यावेळी संपूर्ण भारतभरात एख्याद्या लग्नकार्याप्रमाणेच हा उत्सव केला जातो आणि हा उत्सव संपन्न झाल्यावर खऱ्या अर्थी स्त्री पुरुषांच्या विवाहाचा मौसम सुरु होतो.
या सणाबद्दल जी पौराणिक कथा सांगितली जाते त्यानुसार फार पूर्वी जालंधर नामक दैत्यकुळातील एक शूर योद्धा होता व त्याने आपल्या पराक्रमाच्या जोरावर देवलोकावरही विजय प्राप्त केला. जालंधराच्या विजयामागे त्याच्या पराक्रमासोबत त्याच्या पत्नीची पुण्याई सुद्धा होती कारण त्याची पत्नी वृंदा ही महापतिव्रता असल्याने तिच्याकडे पुण्याचा संचय खूप मोठा होता व यामुळे जालंधर हा त्रिलोकात अजिंक्य झाला.
देवलोकावर विजय मिळवल्याने जालंधरापासून मुक्ती कशी मिळवावी ही चिंता देवांना पडली व पुढे तर जालंधर इंद्रप्रस्थावर चाल करून इंद्रास जिंकण्याचा बेत करू लागला त्यामुळे देवांच्या संकटात अजून भर पडली. कालांतराने देव व दैत्य यांच्यात मोठे युद्ध झाले व देवांचा पराजय झाला. या पराजयानंतर सर्व देव श्री विष्णूस शरण गेले.
जालंधराच्या मागे त्याच्या पत्नीची पुण्याई आहे हे विष्णूस माहित होते त्यामुळे जालंधराची ताकद कमी करण्यासाठी विष्णूने वेगळ्या नीतीचा वापर करण्याचे ठरविले आणि त्याने जालंधरासारखे हुबेहूब दिसणारे शरीराचे दोन भाग अर्थात शीर आणि धड दोन माकडांकडून वृंदेच्या समोर टाकवीले व आपल्या पतीचे मृत शरीर समजून पतिव्रता वृंदा दुःखाच्या सागरात बुडाली. याचवेळी विष्णूनेच पाठवलेल्या एका साधूने समोर येऊन संजीवनी मंत्राने या मायावी जालंधरास जिवंत करण्याचा प्रयोग केला आणि त्या मृत शरीराच्या जागी जालंधराचे रूप धारण केलेला विष्णू उभा राहिला.
वृंदेस खरोखर आपला मृत पती जिवंत झाला आहे असे वाटले आणि तिने अत्यंत आनंदाने पती समजून विष्णूस मिठी मारली आणि यानंतर विष्णूचे वास्तव्य काही काळ जालंधरच्या महालात झाले. यावेळी जालंधर युद्ध मैदानात देवांसोबत लढत होता मात्र देवांनी केलेल्या युक्तीमुळे अनभिज्ञपणे का होईना वृंदेचे पातिव्रत्य भंग पावल्याने जालंधरची शक्ती कमी झाली आणि देवांशी लढता लढत त्याचा युद्ध मैदानातच मृत्यू झाला.
कालांतराने वृंदेस हे सर्व समजल्यावर ती अत्यंत क्रोधायमान झाली आणि तिने विष्णूस असा शाप दिला की तुला सुद्धा पुढील काळात पत्नी वियोग सहन करावा लागेल आणि यावेळी सुद्धा दोन मर्कटांचे साहाय्य घेण्याची वेळ तुझ्यावर येईल आणि हा शाप विष्णूच्या राम अवतारात खराही ठरला.
शाप दिल्यावर वृंदेने चिता तयार करून त्यात प्रवेश केला आणि पंचतत्वात विलीन झाली. एका पतिव्रतेसोबत आपण इतके चुकीचे वागलो हे जाणवून विष्णूस अत्यंत दुःख झाले आणि तो तिच्या चितेच्या राखेसमोर भ्रमिष्ट अवस्थेत बराच काळ बसून राहिला व या दुःखातून विष्णूस बाहेर काढावे या साठी देवादिकांना अथक प्रयत्न करावे लागले व अखेरीस स्मशानभूमीतील वृंदेच्या राखेवर पार्वतीने तुलसी, आवळा आणि मालती यांचे बीज पेरले व त्यातून तीन झाडे उत्पन्न झाली.
या तीन झाडांपैकी तुळशी ही वनस्पतीच त्या पतिव्रता वृंदेप्रमाणे आहे असे समजून विष्णूस ती अत्यंत प्रिय झाली आणि कालांतराने वृंदेचा पुनर्जन्म विष्णूच्या कृष्णावतारात रुक्मिणीच्या रूपात झाला व त्यांचे लग्न कार्तिक शुद्ध द्वादशीस संपन्न झाले त्यामुळे हा दिवस म्हणजेच रुक्मिणी कृष्ण विवाह अथवा तुलसीविवाह संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.