कर्णेश्वर मंदिर संगमेश्वर
प्राचीन स्थापत्यकलेचे अद्भुत उदाहरण असे हे कर्णेश्वर मंदिर पांडवांनी उभारल्याची लोककथा आहे मात्र ऐतिहासिक साधनांनुसार या मंदिराची निर्मिती कर्ण या चालुक्यवंशीय राजाच्या काळात झाली असल्याचे सांगितले जाते.
महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर हे एक अतिशय महत्वाचे ऐतिहासिक स्थळ. तालुक्याचे ठिकाण असलेल्या संगमेश्वर परिसरात अनेक प्राचीन व मध्ययुगीन वास्तू या परिसराच्या गतवैभवाच्या साक्षीदार आहेत. अशा अनेक वास्तूंपैकी एक म्हणजे येथील कर्णेश्वर हे प्राचीन असे शिवमंदिर.
पूर्वाभिमुख असे हे मंदिर तारकापीठावर असून त्यास पूर्व, पश्चिम आणि उत्तर दिशेस प्रवेशद्वारे आहेत. व मंदिराची रचना मंडप, महामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी आहे. महा मंडपात रंगशिळेवर नंदी दिसून येतो. महामंडपास एकूण चार मुख्य खांब आहेत.
गर्भगृहात प्रवेश करताना एक गधेगळ व त्यावर एक शिलालेख दिसून येतो. येथे एका बाजूस ब्रह्मदेवाची मूर्ती तर दुसऱ्या बाजूस वरदलक्ष्मीची मूर्ती दिसून येते. मंदिराच्या गर्भगृहात कर्णेश्वराचे जागृत शिवलिंग आहे व याच ठिकाणी पार्वतीची मूर्ती सुद्धा आहे.
प्राचीन स्थापत्यकलेचे अद्भुत उदाहरण असे हे कर्णेश्वर मंदिर पांडवांनी उभारल्याची लोककथा आहे मात्र ऐतिहासिक साधनांनुसार या मंदिराची निर्मिती कर्ण या चालुक्यवंशीय राजाच्या काळात झाली असल्याचे सांगितले जाते.
मंदिराच्या आतील व बाहेरील बाजूस दशावतार, कमल वेलींच्या मालिका, महिषासुरमर्दिनी, नृसिंह, गणपती, सरस्वती, कीर्तिमुख, सुरसुंदरी आणि असंख्य देवदेवतांच्या मूर्ती रचल्या गेल्या आहेत.
मंदिराची निर्मिती काळ्या पाषाणात केली गेली असून याचा कळस दगड, माती व विटांचा वापर करून निर्माण करण्यात आला आहे. कळसावर चुन्याचा व गुळाचा लेप देण्यात आला आहे. मंदिरावर अनेक शिल्पपट सुद्धा कोरलेले आहेत. कर्णेश्वर मंदिराच्या प्रांगणात गणपती व सूर्यनारायणाची सुंदर मंदिरे आहेत. संगमेश्वराच्या ऐतिहासिक वैभवाचे साक्षीदार असलेले कर्णेश्वर मंदिर एकदा तरी पाहायलाच हवे.