वाघबीळ अथवा नाचणटेपाची गुहा - किल्ले रायगड

वाघबीळ अथवा नाचणटेपाची गुहा ही रायगड किल्ल्याच्या परिसरातील एक नैसर्गिक गुहा आहे, जी पाचाडहून रायगडच्या दिशेने येताना चीत दरवाज्याच्या विरुद्ध दिशेस असलेल्या एका डोंगरात समुद्रसपाटीपासून सुमारे साडे चारशे मीटर उंचावर आहे.

वाघबीळ अथवा नाचणटेपाची गुहा - किल्ले रायगड
वाघबीळ अथवा नाचणटेपाची गुहा

स्वराज्याची मुख्य राजधानी असलेल्या रायगडाच्या आसमंतात अनेक गूढ आणि ऐतिहासिक स्थळे आहेत, ज्यापैकी वाघबीळ गुहा किंवा नाचणटेपाची गुहा हे एक खास ठिकाण आहे.

वाघबीळ गुहेची भौगोलिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी

किल्ले रायगडाच्या आसमंतात अनेक स्थळे आहेत जी आजही फारशी प्रसिद्धीच्या झोतात आलेली नाहीत व यापैकी एक म्हणजे वाघबीळ अथवा नाचणटेपाची गुहा. ही गुहा पाचाडहून रायगडच्या दिशेने येताना चीत दरवाज्याच्या विरुद्ध दिशेस असलेल्या एका डोंगरात समुद्रसपाटीपासून अदमासे साडे चारशे मीटर उंचावर आहे. ही गुहा नैसर्गिक असून तिचा काळ अश्मयुगापर्यंत जातो. राजगडावर जसे नेढे आहे तशीच काहीशी या गुहेची रचना असली तरी हिचा अंतर्भाग बऱ्यापैकी मोठा असल्याने कोकणातील हातखंबा येथील गुहेशी ही खूप साम्य दर्शविते. वाघबीळ गुहेची रचना आणि तिचा प्राचीन काळापासूनचा इतिहास यामुळे ती पुरातत्त्वशास्त्रज्ञ आणि इतिहासप्रेमींसाठी विशेष आकर्षण आहे.

गुहेचा ऐतिहासिक वापर आणि पुरातत्वीय महत्त्व

अश्मयुगात मानवाने याठिकाणी निवास केल्याचे दगडी हत्यारे इत्यादी पुरावे संशोधकांना आढळले आहेत. या गुहेस वाघबीळ, नाचणटेपाची गुहा अथवा गन्स ऑफ पाचाड या नावाने ओळखले जाते व हिचा वापर मानवी अधिवास, वन्य प्राण्यांचा अधिवास तसेच पहाऱ्याची चौकी म्हणून केला गेला होता. अश्मयुगापासून ते मराठा कालखंडापर्यंत या गुहेचा वापर विविध कारणांसाठी झाला, ज्यामुळे तिचे ऐतिहासिक आणि पुरातात्विक महत्त्व वाढते. या गुहेचे वैशिट्य म्हणजे हिला एकूण तीन तोंडे असून यातील दोन तोंडे पश्चिम दिशेस असून तिसरे व मोठे तोंड पूर्वेस आहे व येथूनच सध्या गुहेत प्रवेश करण्याचा मार्ग आहे. गुहेच्या आतील भाग प्रशस्त असून हवा व प्रकाश येण्यास विपुल जागा आहे व एका वेळी या ठिकाणी पंचवीस माणसे राहू शकतात.

वाघबीळ गुहेचे रायगड किल्ल्याच्या दृष्टीने लष्करी महत्व

ऐतिहासिक काळात येथून पश्चिमेकडील पाचाड व पूर्वेकडील रायगडवाडी या रायगडाकडे येणाऱ्या दोन प्रमुख मार्गांवर नजर ठेवणे शक्य होते आणि वेळप्रसंगी या ठिकाणी तोफा सुद्धा ठेवल्या गेल्याचे उल्लेख आढळतात. १७७३ साली रायगडची मोर्चेबंदी झाली होती त्यावेळी तोफांसाठी धमधमे रचण्याच्या जागा निश्चित केल्या गेल्या होत्या व यातील एक मोर्चा चीत दरवाज्याजवळ, दुसरा मोर्चा रायगड वाडी येथे, तिसरा मोर्चा घळकीच्या मेटाजवळ तर चौथा मोर्चा हा नाचणं टेपाजवळ बांधण्यात आला असल्याचा उल्लेख आढळतो. या गुहेचे लष्करी महत्त्व मराठा साम्राज्याच्या संरक्षण व्यवस्थेत स्पष्ट होते, कारण येथून रायगडाकडे येणाऱ्या मार्गांवर लक्ष ठेवणे आणि संरक्षणासाठी तोफांचा वापर करणे शक्य होते.

वाघबीळ गुहेचे पर्यटन महत्व

वाघबीळ गुहा ही केवळ ऐतिहासिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर सांस्कृतिक आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाची आहे. वाघबीळ गुहेचा हा गौरवशाली वारसा मराठा इतिहास आणि पुरातत्त्व अभ्यासकांसाठी प्रेरणादायी आहे, आणि ती रायगडाच्या ऐतिहासिक वैभवाचा एक अविभाज्य भाग आहे.