पुण्याच्या हुजूरपागा शाळेची १३६ वर्षे
कॉमनवेल्थ बिल्डींगवरून कुंटे चौकातून पुढे आलो की आपण एका ऐतिहासिक ठिकाणापाशी येतो. हे ठिकाण म्हणजे हुजूरपागा. या जागेवर आता मुलींची शाळा आहे, पण पूर्वी इथे पेशव्यांची पागा होती.
शनिवारवाड्याच्या नैऋत्येला आंबिल ओढ्याच्या पलीकडे सगळी हिरवीगार मोकळी जागा होती. त्यातल्या जवळजवळ ४ एकर जागेत पेशव्यांच्या हुजुरातीच्या घोड्यांची पागा होती. तीच ही हुजूरपागा. पुढे पेशवाई संपली. जागा ओस पडली. त्यात प्रचंड गवत वाढले. सन १८५७ नंतर इंग्रजांचे राज्य स्थिरस्थावर झाले. मग पुण्याची नगरपालिका स्थापन झाली आणि पुढे शिक्षणसंस्था स्थापन झाल्या.
१९ जुलै १८८४ साली हिराबागेच्या टाऊन हॉलमधे सरकारी अधिकारी आणि काही प्रतिष्ठित नागरिक यांच्यात सभा भरली होती. या सभेचे अध्यक्ष सर विल्यम वेडरबर्न हे होते. ‘स्त्रियांचे अज्ञान दूर झाल्याशिवाय हिंदुस्थानची स्थिती सुधारणार नाही’ या विचाराने या वेडरबर्न साहेबाने आपल्या दिवंगत बंधूंच्या स्मरणार्थ १०००० रुपयांची देणगी स्त्री शिक्षणासाठी जाहीर केली. त्यानुसार २ ऑक्टोबर १८८४ रोजी श्री महादेव गोविंद रानडे, डॉ. रा. गो. भांडारकर आणि शं. म. पंडित यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीचे ‘फीमेल हायस्कूल’ सुरु झाले.
भारतातील ही दुसरी मुलींची माध्यमिक शाळा. पहिली कलकत्त्यात स्थापन झाली होती. सुरुवातीला या शाळेत १८ मुली दाखल झाल्या आणि पुढे ही संख्या ४५ पर्यंत गेली. सर्व जाती-धर्माच्या मुली या शाळेत शिकत होत्या. पहिली जवळजवळ ५० वर्षे इथल्या मुख्याध्यापिका या युरोपीय, ख्रिश्चन, पारशी स्त्रिया होत्या. ही शाळा म्हणजे श्रीमंत, उच्चभ्रू आणि वैचारिकदृष्ट्या पुढारलेल्या स्त्रियांची आणि विद्यार्थिनींची शाळा असा काहीसा समज या शाळेबद्दल पसरला होता.
आवडीबाई भिडे ही या शाळेची पहिली विद्यार्थिनी असल्याचे सांगितले जाते. पुढे या शाळेने अनेक उत्तमोत्तम विद्यार्थिनी या देशाला दिल्या. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिराजी गांधीनीसुद्धा एक वर्ष या शाळेत शिक्षण घेतल्याचे सांगतात. या शाळेमुळेच या रस्त्याला फीमेल हायस्कूलचा रस्ता असे म्हणत असत. हा रस्ता पुढे जाऊन आज जिथे बाजीराव रस्ता मिळतो तिथे संपत असे. हाच रस्ता नंतर लक्ष्मी रस्ता म्हणून ओळखला जाऊ लागला.
- आशुतोष बापट