ख्रिस्तोफर कोलंबस - अमेरिका खंडाचा शोधकर्ता

भूगोल विषयावरील पुस्तकात पृथ्वीचे वर्णन आणि तेथील प्रदेशांचे वर्णन केले आहे ते प्रत्यक्ष पाहावे असे ठरवून त्याने एका गलबतावर नोकरी सुरु केली आणि विविध प्रदेशांत पर्यटन केले.

ख्रिस्तोफर कोलंबस - अमेरिका खंडाचा शोधकर्ता
ख्रिस्तोफर कोलंबस

आधुनिक युगातील सर्वात प्रगत देश म्हणून प्रसिद्ध असलेल्या अमेरिका या देशाचा शोध हा मध्ययुगात म्हणजे इसवी सन १४९२ साली लागला व या देशाचा शोधकर्ता म्हणजे कोलंबस.

मुळात अमेरिका हा केवळ देश नसून एक खंड आहे मात्र या ठिकाणी पूर्वापार मानवी लोकवस्ती असली तरी इतर खंडातील लोक या ठिकाणी १४९२ सालापूर्वी पोहोचले नव्हते त्यामुळे या खंडास नवीन खंड या नावाने सुद्धा ओळखले जाते.

या खंडाचा शोधकर्ता कोलंबस हा मूळचा युरोप खंडातील इटली येथील असून त्याचा जन्म इसवी सन १४५१ साली जिनोव्हा येथे झाला. शालेय शिक्षण घेत असताना त्याला सर्वात अधिक आवडणारा विषय भूगोल हा होता आणि या विषयावरील विविध पुस्तके वाचायचा छंद त्याला बालपणीच लागला.

भूगोल विषयावरील पुस्तकात पृथ्वीचे वर्णन आणि तेथील प्रदेशांचे वर्णन केले आहे ते प्रत्यक्ष पाहावे असे ठरवून त्याने एका गलबतावर नोकरी सुरु केली आणि विविध प्रदेशांत पर्यटन केले. कोलंबसच्या काळात पृथ्वी गोल असल्याचा शोध लागला असल्याने त्याला असे जाणवले की युरोपखंडातील लोकांच्या माहितीपलीकडे पृथ्वीवरील अटलांटिक महासागराच्या पलीकडे अजून काही प्रदेश असावेत आणि याच वेळी त्यास भारत येण्याचीही तीव्र इच्छा होती कारण भूगोलाच्या पुस्तकात भारताची जी वर्णने त्याने पहिली अथवा ऐकली होती त्यावरून त्याला भारत भेटीची मोठी ओढ लागली होती.

अटलांटिक महासागर पार करून नवा प्रदेश भेटला नाही तरी पुढे जाऊन आपण भारतात तरी पोहोचू असे त्यास वाटून त्याने जल पर्यटनाचा ध्यास पकडला मात्र या कार्यासाठी मोठा खर्च लागणार असल्याने त्याने प्रथम इटली आणि नंतर पोर्तुगालच्या राजाकडे मदत मागितली मात्र दोन्ही राजांनी त्यास मदत केली नाही त्यामुळे त्याने स्पेनचा राजा आणि राणी यांच्याकडून मदत मिळवली व त्याबदल्यात एक असा ठराव केला की सफारीच्या खर्चातील आठवा भाग कोलंबसने खर्च करावा आणि या सफारीतून जो आर्थिक लाभ मिळेल त्यातील आठवा हिस्सा कोलंबसने घ्यावा आणि नवीन प्रदेश सापडल्यावर त्याचे अधिपत्य स्पेनच्या राजाकडे राहून त्या प्रदेशाचा कारभार कोलंबसने सांभाळावा.

त्यानतंर कोलंबस सफरीवर निघाला व त्याच्या सोबत तीन गलबते आणि बरेच खलाशी व ओल्फेन्झो फिंझान नावाचा एक श्रीमंत माणूस होता. कोलंबसने पश्चिम दिशा पकडून सफर सुरु केली. सफारीस अनेक दिवस लोटले तरी जमीन दृष्टीस न पडल्याने सर्वजण घाबरले मात्र कोलंबस सफरीवर ठाम असल्याने सर्वांनी त्यास समुद्रात फेकून देण्याची धमकी दिली मात्र कोलंबसने हुशारीने सर्वांना पटवून आपली सफर सुरु ठेवली आणि काही काळाने त्यांना एक बेट सापडले व या बेटावर त्यांनी स्पेनच्या राजाचे निशाण रोवले. महत्वाचे म्हणजे या बेटात त्याला खूप सोने मिळाले त्यामुळे सर्वांची उमेद वाढली.

कोलंबसच्या मनात आणखी पुढे जाण्याची इच्छा होती तरी त्याच्यासहित असलेले लोक बऱ्याच दिवसाच्या प्रवासाला कंटाळले व त्यांनी मागे जाण्याचा हट्ट सुरु केल्याने नाईलाजाने कोलंबसला मागे फिरावे लागले. स्पेन मध्ये परत गेल्यावर त्याचा मोठा सत्कार झाला आणि तो अल्पावधीत प्रसिद्ध झाला.

यानंतर कोलंबसने आणखी दोन पर्यटन सफरी केल्या आणि तिसऱ्या सफरीत त्यास अमेरिका खंडाचा शोध लागला. मात्र या काळात त्याचा राज्यात दुसऱ्या एका सरदाराचे वर्चस्व वाढून कोलंबसचे महत्व कमी झाले आणि त्यानेच शोधलेल्या अमेरिका खंडाचा कारभार दुसऱ्यालाच देण्यात आला आणि कोलंबसवर खोटे आरोप ठेवून त्यास बेड्या घालून स्पेन मध्ये कैदेत ठेवले.

कालांतराने कोलंबस निष्पाप आहे व त्यास खोटे आरोप लावून अटक करवले आहे हे सर्वांना समजले व त्याची सुटका करण्यात आली मात्र या कृत्यामुळे राजाची स्पेनमध्ये मोठी बदनामी झाली आणि कोलंबस देखील कायमचा दुखावला गेला.

सुटका झाल्यावरही कोलंबस त्याच्या बेड्या कायम सोबत ठेवत असे आणि सर्वांना सांगत असे की हे माझ्या प्रामाणिकपणाचे राजाने दिलेले बक्षीस आहे. आपल्या मृत्यूनंतर या बेड्या सोबत पुराव्यात अशी इच्छा सुद्धा त्याने व्यक्त केली होती.

कोलंबसची झालेली बदमानी विसरून सर्व स्पेन वासियांनी त्यास स्वीकारले होते मात्र कोलंबस पूर्वी झालेला अपमान विसरू शकला नाही आणि याच धक्क्याने पुढे आजारी पडून त्याचा १५०६ साली मृत्यू झाला. जगात जे कर्ते पुरुष होऊन गेले आहेत त्यांना सुद्धा अपमानाच्या किती झळा सहन कराव्या लागल्या हे कोलंबसच्या उदाहरणावरून लक्षात येईल.