भारत चीन सीमावाद - एक पाताळयंत्र
भारत व चीन यांच्यातील संघर्षाची अनेक कारणे असली, तरी सीमाप्रश्न हे त्यांपैकी एक प्रमुख कारण आहे. चीनला मान्य असलेली सीमा व सीमाप्रदेश, भारत स्वीकारीत नाही, हे पाहून चीनने भारताच्या सीमाप्रदेशावर अकस्मात आक्रमण केले.
भारत व चीन यांच्यातील हाडवैर खूप जुने आहे. मध्यंतरी हिंदी चिनी भाई भाई अशा वल्गना करून दोन देशांमधील संबंध सुधारत असल्याचा आव अनेकदा आणला गेला मात्र भारताच्या या कवी कल्पनांना चीनने आपल्या कारवायांनी अनेकदा तिलांजली दिली आहे व आजही देत आहे. सद्यस्थितीतही भारत चीन सीमेवर जे काही गेले वर्षभर सुरु आहे ते याचेच उदाहरण म्हणावे लागेल.
भारत व चीन यांच्यातील संघर्षाची अनेक कारणे असली, तरी सीमाप्रश्न हे त्यांपैकी एक प्रमुख कारण आहे. चीनला मान्य असलेली सीमा व सीमाप्रदेश, भारत स्वीकारीत नाही, हे पाहून चीनने भारताच्या सीमाप्रदेशावर अकस्मात आक्रमण केले. चीनने सुरू केलेले हे अघोषित युद्ध २० ऑक्टोबर पासून २१ नोव्हेंबर १९६२ पर्यंत चालले. २२ नोव्हेंबरच्या सकाळपासून चीनने एकतर्फी गोळीबार स्थगित केला व युद्ध बंद पडले तथापि या आकस्मित सैनिकी कारवाईनंतरही चीनला स्वतःच्या अपेक्षेप्रमाणे सीमाप्रश्न सोडविण्यात यश मिळाले नाही.
भारत चीन मध्ये झालेल्या युद्धास ५९ वर्षे पूर्ण झाली मात्र सीमाप्रश्न हा प्रलंबितच आहे. गेल्या वर्षांपासून चीनने भारताच्या लडाख प्रांतात केलेले अतिक्रमण दोन्ही देशांमध्ये अनेक उच्चस्तरीय चर्चा होऊनही काढलेले नाही. यात नुकतीच एक बातमी येऊन धडकली आहे की, चीनने लडाखमधील हॉट स्प्रिंग आणि गोगरा भागातून सैन्य माघारी घेण्यास नकार दिला आहे. इतकंच नव्हे तर भारताला जेवढं मिळाले आहे, त्यात समाधानी रहावे अशी मखलाशी चीनने केली आहे.
१९६५ साली सुद्धा चीनने असे काही कारनामे केले होते ज्यामुळे भारताच्या चिंतेत भर पडली होती.
झाले असे की चीनचा प्रमुख माओ याने थेट घोषणा केली की भूतान, नेफा, सिक्कीम, लडाख आणि नेपाळ ही चीनची पाच बोटे आहेत म्हणजे या पाच बोटांचा पंजा करून भारतावर घाव करण्याचा माओचा इरादा स्पष्ट दिसून येत होता.
सुरुवातीस चीनने आपली नजर भूतान आणि नेपाळकडे वळवली. भूतानमध्ये हा कट तेव्हा उघडकीस आला जेव्हा भूतान नरेशांवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न फसला. या कटाचा शोध घेतला असता माओवादी विचारांचे काही लोक चीनमध्ये प्रशिक्षण घेऊन आल्याचे नंतर उघडकीस आले. भूतानचे प्रथम पंतप्रधान जिगमी दोरजी यांची हत्या सुद्धा अशाच स्वरूपाची होती. खरं तर जिगमी दोरजी हे चीन सोबत मैत्रीचा व्यवहार ठेवण्यास तयार होते मात्र चीनची सर्वच तत्वे त्यांना मान्य नव्हती त्यामुळे वाद निर्माण झाला आणि पुढे दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला.
१९६५ साली अचानक भूतान या देशातून ४-५ लष्करी अधिकारी नेपाळमध्ये येऊन दाखल झाले. नेपाळ मध्ये आम्ही आश्रय घेतला आहे असा प्राथमिक दावा होता मात्र चीनकडून त्यांना काही सूचना मिळत होत्या हे नंतर लक्षात आले. असे प्रकार भारताच्या आजूबाजूस असणाऱ्या काही देशांमध्ये कालांतराने केले गेले ही बाब वेगळी. अगदी पाकिस्तानही तेव्हापासूनच चीनचे समर्थन करू लागले होते.
हळूहळू नेपाळच्या सीमेवर चीनच्या कारवाया सुरु झाल्या. नेपाळची राजधानी काठमांडू ते तिबेटची राजधानी ल्हासा असा रस्ता चीनने बांधण्यास सुरु केला. रस्ता तयार झाल्यावर दर दहा पावलावर एक चिनी सैनिक तिथे येऊन बसवला म्हणजे हा रस्ता एकाअर्थी चीनची सीमाच झाला होता. यात भर म्हणजे या बद्दल नेपाळ सरकारला चीनने काही माहितीही दिली नव्हती.
१९६५ साली झालेला हा प्रकार माओच्या मते चीनच्या पाच बोटांवरील दोन बोटे ताब्यात घेऊन ती बोटे भारताकडे दाखवयाचाच प्रकार होता. यानंतरही चीनने सिक्कीम आणि लडाख वर अनेकदा उभे दावे मांडले आहेत. सध्या चीनने आपले लक्ष लडाख कडे वाळवलेले दिसत असले तरी उरलेली बोटंसुद्धा त्यांच्या नजरेत आहेत हे त्यांच्या नेपाळ आणि सिक्कीम मधील वाढत्या कारवायांवरून लक्षात घ्यायला हवे आणि हा घातक पंजा तयार होण्यापूर्वीच निकामी करायला हवा.