बळकट पण दुर्लक्षित असा किल्ले यशवंतगड

प्राचीनकाळापासून कोकणातील बंदरे व्यापारासाठी प्रसिद्ध होती. या बंदरांचा अनेक देशांशी व्यापार होत असे. त्यापैकीच एक महत्त्वाचे बंदर होते रेडी. प्राचीनकाळी रेडी गाव ‘रेवतीद्वीप’ या नावाने ओळखले जाई. इ.स. ६१० मध्ये चालुक्य राजांचे रेडी हे प्रमुख व्यापारी केंद्र होते. सागरी व्यापारावर तसेच खाडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यशवंतगड उभारला गेला.

बळकट पण दुर्लक्षित असा किल्ले यशवंतगड

Marathi Buzz Shop

Marathi Buzz Shop

वेंगुर्ल्याच्या दक्षिणेस २५ कि.मी. वर द्विभुज गणपती आणि मॅंगनीज खाणींसाठी प्रसिद्ध असलेले रेडी गाव आहे. याच रेडी गावातील खाडीमुखाजवळील छोट्या टेकडीवर भक्कम यशवंतगड उभा आहे.

प्राचीनकाळापासून कोकणातील बंदरे व्यापारासाठी प्रसिद्ध होती. या बंदरांचा अनेक देशांशी व्यापार होत असे. त्यापैकीच एक महत्त्वाचे बंदर होते रेडी. प्राचीनकाळी रेडी गाव ‘रेवतीद्वीप’ या नावाने ओळखले जाई. इ.स. ६१० मध्ये चालुक्य राजांचे रेडी हे प्रमुख व्यापारी केंद्र होते. सागरी व्यापारावर तसेच खाडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यशवंतगड उभारला गेला. यशवंतगडाच्या उंच बुरुज आणि तटबंदीमुळे गाव व सिंधुसागरावर लक्ष ठेवता येई. इ.स. १६६४ मध्ये आदिलशहाचे मांडलिक असलेल्या वाडीकर सावंतांकडून शिवाजी महाराजांनी यशवंतगड जिंकून घेतला आणि त्याची डागडुजी केली. पुढे हा किल्ला वाडीकर सावंत-भोसले, पोर्तुगीज, डच, करवीर छत्रपती या सत्तांच्या ताब्यात होता व अखेरीस ब्रिटीश सत्तेच्या अधिपत्त्याखाली गेला. 

यशवंतगडास जाण्यासाठी सावंतवाडी किंवा वेंगुर्लेहून रेडी गाव गाठावे. रेडी गावात जाण्यासाठी सावंतवाडी तसेच वेंगुर्ले येथून STची सोय आहे. रेडी गावातील विठ्ठल मंदिराच्या बाजूने जाणारा गाडी रस्ता थेट गडाजवळ नेऊन सोडतो. इथूनच पुढे झाडीत मातीच्या रस्त्याने चार पावलं चालत गेलो की आपण गडाच्या भक्कम कमानीयुक्त महाद्वाराजवळ येतो. या दरवाजाला लागूनच भक्कम असा बुरुज आहे. थोडे कष्ट घेतले तर आपण या बुरुजावरही जाऊ शकतो.

महाद्वारातून डावीकडच्या वाटेने पुढे चालत गेल्यावर आपण बालेकिल्ल्याच्या पहिल्या दरवाजात येतो. या दरवाजातून आत शिरल्यावर प्रथम आपल्या नजरेत भरतो तो संरक्षणासाठी दोन्ही बाजूने खोदलेला खोल खंदक. हा खंदक पूर्ण बालेकिल्ल्याच्या भोवती खणला आहे.

तर समोरच एक दरवाजा आणि दयनीय अवस्थेत असलेला बुरुज दिसतो व एकदा वाचलेल्या ओळी आठवतात:-


फत्तरातला एक-एक चिरा निखळून पडतोय,
राजे तुमच्या आठवणीने उर भरून येतोय!


यानंतर लगेच समोर एक भक्कम बांधणीचा दरवाजा दिसतो. हा दरवाजा वैशिष्ट्यपूर्ण आहे. मुख्य दरवाजा बंद असल्यास आत प्रवेश करण्यासाठी दिंडी दरवाजाची सोय आहे. इथून आत येताच दोन्ही बाजूस असलेल्या पहारेकऱ्यांच्या देवड्या दिसतात. तर समोर तीन ओवऱ्या दिसतात. हे सर्व पाहून बंदिस्त चौकात येतो.

येथे समोरच बालेकिल्ल्याचा मुख्य दरवाजा दिसतो. या दरवाजाचे गोलाकार बुरुज आवर्जून पाहण्यासारखे आहेत. या गोलाकार बुरुजांमुळे दरवाजाच्या सौंदर्यात अजूनच भर पडते. या दरवाजाच्या आत देखील देवड्या आहेत व पुढील मार्ग कातळात कोरलेला आहे. याच मार्गाने पुढे गेल्यावर डावीकडे एक भव्य इमारत दिसते. हीच गडावरची राजवाड्याची इमारत. थोडं पुढे गेल्यावर एका कमानयुक्त प्रवेशद्वारातून आपण भव्य राजवाड्यात प्रवेश करतो. हा राजवाडा म्हणजे एक भुलभुलैय्याच आहे. त्यामुळे आपण कुठून आलो आणि कुठून बाहेर पडलो. हे कळतच नाही. या राजवाड्यात सभागृहासारखी दोन प्रशस्त दालने आहेत. तळमजल्यावर अनेक खोल्या आहेत. तसेच दुमजली खोल्या देखील आहेत. पण आता त्या ढासळल्यामुळे फक्त कल्पनेतच पाहाव्या लागतात.

अशा या सुंदर आणि प्रशस्त राजवाड्यातून आपण तटबंदीकडे चालत जातो. तटबंदीकडे जात असताना वाटेत एक आयताकृती मोठी विहीर लागते. या विहिरीत उतरण्यासाठी काही पायऱ्या आहेत. पण पुढे फक्त माती असल्यामुळे सांभाळतच पुढे जावे लागते. विहीर पाहून तटावरून गड-फेरी चालू ठेवत, बुरुज-जंग्या पाहत, सिंधुसागाराचे-पुळणीचे तसेच केरवाडा येथील नौकांचे दर्शन घेत आपण एका बुरुजापाशी येतो. या तटाजवळ तटबंदीत पहारेकाऱ्यांसाठी बांधलेल्या दोन खोल्या आहेत. या खोल्या पाहून परत तटफेरी चालू ठेवत. आपण एका भव्य अशा मोठ्या भक्कम बुरुजावर येतो. इथून रेडी बंदरापासून खाडीपलीकडील केरवाडा पर्यंतचा परिसर दिसतो. यावरूनच या किल्ल्याचे महत्त्व कळून येते.

इथून पुढे चालत आपण बालेकिल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या माथ्यावर येतो. इथल्या खिडकीतून बंदिस्त चौकाचे आणि तिसऱ्या  दरवाजाचे दर्शन होते. पुढे तटावर झाडी माजल्यामुळे जास्त फेरी मारता येत नाही. पुढे फक्त एक बुरुज पाहून व प्रस्तराने खाली उतरून दरवाज्यापाशी येतो. इथे आपली बालेकिल्ल्याची फेरी संपते व परत आपण सुंदर राजवाडा भक्कम दरवाजाची दृश्ये कॅमेऱ्यात आणि डोळ्यात साठवत गडपायथ्याशी येतो.

गडपायथ्यापासून सागरकिनाऱ्याकडे रस्त्याने चालत जावे. इथे एक अर्धा फुटका बुरुज आहे. हा बुरुज चढून वरून गेल्यावर समोरच एक जांभ्या दगडात कोरलेली द्विभुज श्रीगणेशाचे वाईट अवस्थेत असलेले शिल्प दिसते. या शिल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे हे शिल्प व रेडी गावातील प्रसिद्ध द्विभुज गणेश मूर्ती हुबेहूब आहेत. बाप्पाचे दर्शन घेऊन पुढे चालत गेल्यावर एक छोटेखानी विहीर लागते. या विहीरीत उतरण्यासाठी चार पायऱ्या आहेत. स्थानिक लोक या विहिरीला घोड्याची विहीर संबोधतात. तिथेच वाटेत एक अजून कोरडी विहीर आहे. हे सर्व बघून एक छोट्या दरवाजाने बाहेर पडतो. आणि समोर असलेल्या सुंदर पुळणीवाटे  सिंधुसागरात स्नान करण्यासाठी निघून जातो.

- अमित म्हाडेश्वर