पर्यटन महोत्सव - पर्यटन विकासाच्या दृष्टीने योग्य पाऊल

कोकण हे निसर्ग सौंदर्याने समृद्ध असल्यामुळे व कोकणाला विस्तृत सागर किनारपट्टी लाभलेली असल्यामुळे कोकणातील अनेक स्थळे विशेषतः किनारपट्टीवरील गावे ही पर्यटन स्थळे म्हणून लोकप्रिय आहेत. दुसरे म्हणजे मुंबई-ठाणे-पुणे अशा मोठ्या शहरांपासून ही ठिकाणे जवळ असल्याने शहरातील पर्यटकांचा ओघ हा बराच असतो. कारण बरीच ठिकाणे ही एक्-दोन दिवसांत पाहून होण्याजोगी आहेत.

पर्यटन महोत्सव - पर्यटन विकासाच्या दृष्टीने योग्य पाऊल

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

सध्या पर्यटनास प्रोत्साहन देण्यासाठी व पर्यटकांना आकर्षीत करण्यासाठी सिंधुदूर्ग, श्रीवर्धन, मुरुड व अलिबाग सारख्या ठिकाणी पर्यटन महोत्सवांचे आयोजन केले जात आहे. स्थानिक लोकांच्या कला तसेच त्या त्या भागाची संस्कृती पर्यटकांना दाखवण्याचे महत्त्वाचे काम या पर्यटन महोत्सवांच्या द्वारे होत आहे.

यापूर्वी सिंधुदूर्ग, श्रीवर्धन व मुरुड या ठिकाणी अशा प्रकारचे पर्यटन महोत्सव साजरे झाले आणि नुकताच अलिबाग येथे दि.२२ ते २५ जानेवारी या कालावधीत पर्यटन महोत्सव पार पडला. पर्यटकांचे स्वागत, स्थानिक उद्योगांना व लोककलांना प्रोत्साहन असे अनेक उद्देश या महोत्सवामागे होते.

मात्र अशा महोत्सवांमुळे वाढणार्‍या पर्यटकांची योग्य व्यवस्था करण्याची स्थानिक नगरपालिकांची व व्यावसायिकांची जबाबदारीही वाढते. पर्यटकांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, रस्ते, निवास्थाने याबाबतची योग्य ती सोय करणे ही अशा पर्यटन स्थळांच्या ग्रामपंचायती, नगरपालिका व हॉटेलमालक यांची जबाबदारी असते. पर्यटकांना आवश्यक त्या सुविधा वाजवी दरात व योग्य रितीने उपलब्ध झाल्यास पर्यटकांचे समाधान होते व ते पुन्हा या ठिकाणी भेट देण्यास उत्सुक रहातात.

याखेरीज महामार्ग, शहर व गावातील रस्ते पुरेसे रुंद, सुव्यवस्थित असतील तर अपघातांचे प्रसंग कमी होतील. कोकणातील मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रश्न गेले कित्येक वर्षे रेंगाळला आहे आणि अपघातांची संख्याही किती वाढली आहे हे आपण पहातच आहोत. त्याचप्रमाणे अलिबाग-रेवस, अलिबाग - रेवदंडा, नागोठणे - रोहा, रोहा - कोलाड व महाडजवळील रस्ते नेहमीच कसे नादुरुस्त अवस्थेत असतात हेही दिसते आणि प्रवाशांनाही नाईलाजास्तव याच मार्गावरुन प्रवास करावा लागतो मात्र हे प्रवाशांच्या व पर्यटकांच्या सुरक्षीततेच्या व सुखदायक प्रवासाच्या दृष्टीने चिंताजनक बाब आहे.

त्याचप्रमाणे रस्त्यावरील मार्गदर्शक फलक योग्य ठिकाणी व लोकांना ठळकपणे दिसतील अशा ठिकाणी लावले पाहिजेत. काही वेळा ते फार लहान व सहज दिसणार नाहीत असे लावलेले असतात किंवा बाजूला लावलेल्या होर्डिंगमुळे झाकले जातात. गावातील व शहरातील रस्तेही पुरेसे रुंद हवेत, त्यावरील आक्रमणे हटवली गेली पाहिजेत. अनाधिकृत बांधकामांची आक्रमणे, फेरीवाले, भाजीवाले, हातगाड्या यांनी आजकाल जागोजागी आक्रमणे केलेली आढळून येतात. त्याचप्रमाणे वन-वे, नो एन्ट्री यांची आखणी प्रवाशांना सोईस्कर अशी केली पाहिजे नाहीतर नवख्या प्रवाशांना फार मोठा वळसा घेऊन गावात यावे लागते अगर गावाबाहेर जावे लागते.

पर्यटन स्थळे, गावांची व शहरांची स्वच्छता, पाणीपुरवठा, वीजपुरवठा याबाबतही काळजी घेण्याची गरज आहे. पर्यटकांचा त्रास स्थानिकांना होता कामा नये उलट स्थानिकांना त्याचा लाभच मिळायला हवा. महोत्सवांचे ठिकाणी दोन चार दिवसांपुरता खाद्यवस्तुंची विक्री करण्यापेक्षा महिला बचत गटांतर्फे कायम अल्पोपाहाराची व जेवणाची व्यवस्था करता आली तर ते पर्यटकांच्या व स्थानिकांच्याही दृष्टीने लाभदायक ठरेल. यासाठी तिथल्या नगरपालिकांनी योग्य ती जागा उपलब्ध करुन द्यायला हवी.

थोडक्यात केवळ पर्यटन महोत्सवापुरती सोय करण्याऐवजी पर्यटक हे वर्षभर येतच असतात हा विचार करुन कायमस्वरुपी सुविधा उपलब्ध करण्यावर भर देणे गरजेचे आहे. तरच पर्यटनास व विकासास चालना मिळेल.