अलिबागचा पांढरा कांदा - कांद्याचा अनोखा आणि चविष्ट प्रकार

अलिबागच्या पांढऱ्या कांद्याचे वैशिट्य म्हणजे तो कमी तिखट आहे आणि कांद्याच्या इतर प्रकारांच्या तुलनेत त्यामध्ये कांद्यात तिखट चव आणि अश्रू प्रेरक गुणधर्म निर्माण करणारे एंझाइम एलिनेझ कमी प्रमाणात असते.

अलिबागचा पांढरा कांदा - कांद्याचा अनोखा आणि चविष्ट प्रकार

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

जगभरातील जवळजवळ सर्वाधिक पाककृतींमध्ये वापरला जाणारा घटक म्हणजे कांदा. कांदा हा पदार्थाना एक विशिष्ट चव आणि सुगंध प्रदान करतात. कांदा हा पुरातन काळापासून सेवनात आणला गेलेला पदार्थ आहे व त्याचे अनेक प्रकार आढळतात. जगभरात कांद्याच्या ज्या विविध जाती आहेत त्यापैकी एक वैशिट्यपूर्ण जात म्हणजे अलिबागचा पांढरा कांदा.

कांदा हा सहसा लाल गुलाबी रंगाचा असतो मात्र अलिबागचा कांदा हा पांढऱ्या रंगाचा असून त्याची चव आणि फायदे यामुळे हा कांदा स्वयंपाकघरातील एक आवडता पदार्थ बनला आहे.

अलिबाग हे महाराष्ट्राच्या कोकण प्रांतातील रायगड जिल्ह्यातील मुख्यालय असून सुंदर समुद्रकिनारा, ऐतिहासिक किल्ले, प्राचीन मंदिरे आणि निसर्गरम्य पर्यटनस्थळे यांसोबत अलिबाग हे पांढऱ्या कांद्याचे उगमस्थान म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे हे पांढरे कांदे अलिबागव्यतिरिक्त दुसरीकडे कुठेही उत्पादित होत नाहीत आणि झालेच तरी अलिबागच्या कांद्याची चव आणि गुण इतर भागातील कांद्यांना येत नाही कारण अलिबागच्या मातीचा तो एक विशिष्ट गुण आहे. 

अलिबागचा पांढरा कांदा हा सेवनास सौम्य असून त्याची चव गोड असते आणि त्याची पोत अतिशय कुरकुरीत असल्याने जगभरातील खवय्यांचा तो आवडता झाला आहे.

अलिबागचा हा कांदा रंगाने आतून व बाहेरून सफेद असून त्याच्या आतील भाग अतिशय रसाळ व चविष्ट असा असतो. हा कांदा आकाराने मध्यम असून गोड आणि सौम्य गुणधर्माचा आहे. हा कांदा इतर कांद्यासारखा जेवणास चव आणण्यासाठी नव्हे तर कच्चे सेवन करण्यास वापरला जातो व सलाड, सॅन्डविच आणि साल्सा आदी प्रकारांमध्ये सुद्धा वापरला जातो. सूप, स्ट्यू आणि करीमध्ये मात्र हा शिजवला जाऊ शकतो. 

अलिबागच्या पांढऱ्या कांद्याचे वैशिट्य म्हणजे तो कमी तिखट आहे आणि कांद्याच्या इतर प्रकारांच्या तुलनेत त्यामध्ये कांद्यात तिखट चव आणि अश्रू प्रेरक गुणधर्म निर्माण करणारे एंझाइम एलिनेझ कमी प्रमाणात असते. काही लोकांना कांद्याच्या तीव्र चवीचा आणि वासाचा त्रास होतो अथवा डोळ्यांना त्रास होतो अशांसाठी पांढरा कांदा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

अलिबागच्या पांढऱ्या कांद्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचे पौष्टिक मूल्य. पांढरा कांदा हा व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि आहारातील फायबरचा एक चांगला स्रोत आहे, ज्यामुळे कोणत्याही आहारात त्याचा वापर करणे हे आरोग्य जपण्यात मदत करते. पांढऱ्या कांद्यात कॅलरीज सुद्धा कमी म्हणजे प्रति १०० ग्रॅम फक्त ४० असतात, त्यामुळे वजनाच्या व्यवस्थापनासाठी सुद्धा पांढरा कांदा फायद्याचा ठरू शकतो.

अलिबागचा पांढरा कांदा हा त्याच्या टिकाऊपणासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. या कांद्यासथंड आणि कोरड्या जागेत ठेवल्यास तो सहा महिन्यांपर्यंत टिकू शकतो आणि त्याची चव आणि पोत सुद्धा तशीच राहते. यामुळे अनेक नागरिक अलिबागहून या कांद्याच्या माळा मोठ्या प्रमाणात विकत घेऊन आपल्या घरात त्यांचा साठा करून अनेक महिने त्यांचा आस्वाद घेतात.

गेल्या काही वर्षांत अलिबागचा पांढरा कांदा स्थानिक बाजारपेठ पार करून जागतिक बाजारपेठेतही प्रसिद्ध झाला आहे. जगभरातील खाद्य महोत्सवात आणि पाककृतींमध्ये पांढऱ्या कांद्याचा वापर केलेले पदार्थ दाखवले जातात आणि अलिबागहून त्यांची निर्यात इतर देशांतही केली जाते. आपली अनोखी चव आणि पौष्टिक मूल्य यांमुळे हा कांदा आरोग्याच्या बाबतीत जागरूक अशा नागरिकांमध्ये लोकप्रिय झाला आहे.

अलिबागचा पांढरा कांदा हा खऱ्या अर्थी कांद्याचा एक अनोखा आणि चविष्ट प्रकार आहे ज्याची सौम्य आणि गोड चव, कमी तिखट पणा आणि आरोग्यदायी फायदे त्यास एक वेगळी ओळख देतात. तुम्ही अजूनही पांढरा कांदा खाल्ला नसेल तर लवकर अलिबागला भेट देऊन या कांद्याची खरेदी करा, आम्हाला खात्री आहे की हा कांदा तुम्हाला सुद्धा त्याच्या प्रेमात पाडेल.