सुकेळी - केळ्यांचा एक प्रसिद्ध प्रकार

सुकेळी म्हणजे सुकवलेली केळी आणि या केळ्यांची निर्मिती प्रामुख्याने कोकणातल्या पूर्वीच्या ठाणे व सध्याच्या पालघर जिल्ह्यातील आगाशी विभागात होते.

सुकेळी - केळ्यांचा एक प्रसिद्ध प्रकार

आपल्या आहारात फळांचा समावेश फार पूर्वीपासून आहे कारण ज्यावेळी मनुष्य शेती करू लागला नव्हता त्यावेळी त्यास नैसर्गिक रित्या उपलब्ध असलेल्या अन्नावरच गुजराण करावी लागत असे आणि फळे ही अन्नाच्या अत्यंत महत्वाच्या स्रोतांपैकी एक आहेत.

फळे ही मनुष्यास आरोग्यवर्धक असून त्यांचे इतर अनेक फायदे आहेत आणि त्यामुळेच वैद्यकशास्त्रात दररोज फलाहार करण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि मनुष्याला उपकारक अशा फळांमध्ये एक प्रसिद्ध फळ म्हणजे केळी. केळ्याचे सेवन न करणारा मनुष्य विरळाच. केळ्याच्या विविध फायद्यांमुळे घरोघरी केळ्यांचे सेवन बालकांपासून वृद्धांपर्यंत केले जाते आणि केळी ही पचावयास हल्की असल्याने अगदी आजारपणातही केळ्यांचे सेवन करणे शक्य असते.

केळ्याचे सेवन हे विविध रूपात करण्यात येते व यामध्ये केळ्याची भाजी, केळ्याचे शिकरण, केळ्याचे वेफर्स, केळ्याची पुरी, केळ्याचा हलवा अशा अनेक प्रकारांचा समावेश होतो. केळ्याचे सेवन हे उपवासात सुद्धा केले जाते.

मूळ केळ्यामध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत जे भूभागानुसार तयार होत असतात आणि प्रत्येकाचे वेगवेगळे वैशिट्य असते. केळ्यांमध्ये जे नानाविध प्रकार आहेत त्यापैकी एक अनोखा प्रकार म्हणजे सुकेळी.

सुकेळी म्हणजे सुकवलेली केळी आणि या केळ्यांची निर्मिती प्रामुख्याने कोकणातल्या पूर्वीच्या ठाणे व सध्याच्या पालघर जिल्ह्यातील आगाशी विभागात होते. ही केळी अत्यंत जगप्रसिद्ध असून यांची अशी खासियत होती की या केळ्यांची निर्मिती ही आगाशी व्यतिरिक्त कुठेही होत नसे अथवा होणे शक्य नसे कारण आगाशी येथील जमिनीतच एक वेगळा गुणधर्म होता ज्यामुळे या ठिकाणीच ही केळी तयार होत. पिकलेले केळे वाळवणे हि अत्यंत कठीण गोष्ट मानली जाते तरी आगाशी येथे पिकलेली केळी सुकवून त्यापासून सुकेळी निर्माण केली जात व आजही तयार केली जातात व या केळ्यांना जगभरात मागणी आहे.

सुकेळी ही ज्या केळ्याच्या जातीपासून तयार केली जातात त्यास राजोळे केळे म्हटले जाते व हे राजोळे केळे पिकले की त्यास सोलून सुकवले जाते आणि हे केळे सुकले की खजुराच्या जशा खारका होतात तसे होते आणि हे अत्यंत पौष्टीक व पथ्यकारक मानले जाते. राजोळी केळी पिकण्यापूर्वी सुद्धा त्यांना सोलून व सुकवून सुकेळी तयार होतात व त्यांचे पीठ तयार होते. आजारपणात, उपवासात आणि आरोग्याचे वर्धन करण्यासाठी हे पीठ खाल्ले जाते.

फार पूर्वी युरोपियन लोकांनी या केळ्याचे महत्व ओळखून त्यांचा व्यापार व आयात निर्यात सुरु केली होती व लवकरच ही केळी जागतिक स्तरावर प्रसिद्ध झाली. अधुनिक काळात आगाशी येथील या प्रसिद्ध सुकेळीस भौगोलिक चिन्हांकन मिळून येथे त्याची निर्मिती वाढीस लागून स्थानिकांना रोजगार प्राप्त करण्यासाठी काही करता आल्यास खूपच उत्तम होईल कारण सुकेळी ही केवळ सुकलेली केळी नव्हेत तर खऱ्या अर्थी सुखकारक केळी सुद्धा आहेत.