विजयनगर साम्राज्य - दक्षिणेतील एक संपन्न राज्य

विजयनगर साम्राज्याचे वैशिट्य म्हणजे हे राज्य एकूण चार हिंदू घराण्यांच्या अमलाखाली राहिले होते व या घराण्यांची नावे संगम, सलुव, तुलूव आणि अरविंदु अशी होती.

विजयनगर साम्राज्य - दक्षिणेतील एक संपन्न राज्य

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

मध्ययुगात भारताच्या उत्तरेस आणि दक्षिणेस अनेक परधर्मीय सत्तांचे वर्चस्व निर्माण झाले असताना दक्षिण भारतात या सत्तांशी दोन हात करणारे राज्य म्हणजे विजयनगर साम्राज्य. विजयनगर साम्राज्याची स्थापना इसवी सनाच्या चौदाव्या शतकात झाली. 

विजयनगर साम्राज्याच्या स्थापनेची कथा सुद्धा रंजक आहे. इसवी सन १३३६ साली मुहम्मद तुघलखाने दक्षिण भारतातील अनागोंदी येथील राज्य जिंकून घेतल्यावर त्याठिकाणी एक मुस्लिम सरदार ठेवला. या सरदाराने काही काळ राज्य केल्यावर अनागोंदीचा जो पूर्वीचा राजा होता त्याचा एक हिंदू प्रधान ज्याचे नाव हरिहर असे होते त्याच्या हाती सत्ता दिली.

हरिहर याने कालांतराने विद्यारण्य स्वामींच्या सूचनेनुसार अनागोंदीच्या समोर तुंगभद्रा नदीच्या दक्षिण तीरावर एक योग्य जागा पाहून विजयनगर नावाचे नवे शहर स्थापन केले आणि त्यास आपल्या राज्याच्या राजधानीचा दर्जा दिला. हरिहर याने विजयनगर शहराकडे एवढे लक्ष दिले की ते शहर भारतातील एक संपन्न शहर म्हणून ओळखले जाऊ लागले.

विजयनगर साम्राज्याचे वैशिट्य म्हणजे हे राज्य एकूण चार हिंदू घराण्यांच्या अमलाखाली राहिले होते व या घराण्यांची नावे संगम, सलुव, तुलूव आणि अरविंदु अशी होती. या चार घराण्यातील मिळून एकूण २७ राजांनी या राज्यावर शासन केले व यामधील हरिहर, बुक्क, कृष्णदेवराय आणि अलिया रामराया हे सम्राट अतिशय प्रख्यात आहेत.

इब्नबतूता नामक परकीय प्रवाशाने त्याकाळी विजयनगरास भेट दिली होती त्यावेळी त्याने विजयनगरची स्तुती करताना लिहिले आहे की हे हिंदू राज्य असून या ठिकाणी मुस्लिमांची मोठी वस्ती आहे. मुस्लिम व्यापाऱ्यांस येथे मोठा मान दिला जातो. या राज्यात सहसा चोरी होत नाही. याशिवाय पोर्तुगीज प्रवासी आणि फेरिस्ता यांनी सुद्धा या राज्याचे चांगले वर्णन केले आहे.

इसवी सनाच्या सोळाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत हे राज्य भरभराटीत होते. विजयानगरच्या आसपास मुस्लिम सत्ता प्रबळ झाल्या होत्या आणि या सत्तांसोबत विजयनगर साम्राज्याचे सारखे खटके उडत. इस्लामी राज्यविस्तारापुढे भारतातील सर्वच हिंदू राज्यांनी हात टेकले असताना विजयनगर साम्राज्याने या सत्तांचा अनेक वर्षे प्रतिकार केला आणि या सत्तांना दक्षिण भारतात प्रवेश करण्यापासून रोखले.

तब्बल २५० वर्षे विजयनगर राज्यात हिंदू संस्कृती, कला, धर्म, विद्या जपल्या गेल्या. या राज्यात भारताचे पूर्व व पश्चिम किनारे येत असल्याने समुद्री व्यापारात सुद्धा हे राज्य सरस होते. बहामनी राज्याची शकले होऊन विजापूर, गोवळकोंडा, अहमदनगर, बेदर, बेरार अशा एकूण पाच दक्षिणी शाह्या निर्माण झाल्या त्या सर्वांशी विजयनगर साम्राज्याने दोन हात केले.

विजयनगर साम्राज्याचा उत्कर्ष असाच होत राहिला तर हे राज्य या पाच शाह्या बुडवेल ही भीती या सत्तांच्या शासकांमध्ये निर्माण झाली आणि या पाचही राज्यांनी आपापसातील वाद बाजूला ठेऊन युती केली आणि विजयनगर राज्याचा विनाश करण्याचा निश्चय केला. 

या काळात विजयनगरवर रामराया नावाचा राजा राज्य करीत होता. आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह, इमादशाह आणि बरीदशाह यांचे प्रचंड सैन्य विजयनगर साम्राज्यविरोधात एकवटले आणि रामरायाने सुद्धा या सैन्याचा प्रतिकार करण्याची तयारी करून आपल्या सेनेचे तीन भाग केले. मुख्य विभागाचे अधिपत्य स्वतःकडे घेतले आणि प्रत्येकी वीस हजार स्वार, एक लाख पायदळ आणि पाचशे हत्ती अशा एकूण दोन तुकड्या करून त्या आपल्या दोन भावांच्या अधिपत्याखाली दिल्या.

त्यानतंर भलेमोठे युद्ध झाले. दोन्ही बाजूंचे सैन्य प्राणपणाने एकमेकांविरोधात लढत होते. २३ जानेवारी १५६५ साली या युद्धातील अखेरची लढाई तालिकोट येथे झाली आणि या युद्धात मात्र विजयनगर साम्राज्याचा मोठा पराभव झाला. एक लाखाहून अधिक सैन्य मारले गेले. सत्तर वर्षांचा वृद्ध रामराया निजामशहाच्या हाती लागून त्याचे मुंडके धडावेगळे करण्यात आले.

अशाप्रकारे दक्षिणेत पातशाह्यांना विरोध करणारे विजयनगर राज्य नामशेष झाले मात्र काही वर्षांच्या अंधकारानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा स्वराज्याची स्थापना करून पुन्हा एकदा उत्तर व दक्षिणेतील पातशाह्यांना तडाखा दिला.