परसोजी भोसले - पहिले सेनासाहेब सुभा

छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात स्वराज्य मोगली संकटात असताना परसोजी भोसले यांनी स्वराज्याशी एकनिष्ठ राहून राजाराम महाराजांना खूप मदत केली.

परसोजी भोसले - पहिले सेनासाहेब सुभा

स्वतःचा ब्लॉग, व्यवसायाची वेबसाईट, ऑनलाईन शॉप, पुस्तक अथवा व्यवसायाची ऑनलाईन मार्केटिंग करून लाखो लोकांपर्यंत जाण्याची इच्छा असल्यास त्वरित 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सऍप मेसेज करा.

स्वतःचा ब्लॉग, व्यवसायाची वेबसाईट, ऑनलाईन शॉप, पुस्तक अथवा व्यवसायाची ऑनलाईन मार्केटिंग करून लाखो लोकांपर्यंत जाण्याची इच्छा असल्यास त्वरित 7841081516 या क्रमांकावर व्हाट्सऍप मेसेज करा.

मराठेशाहीत विशेष प्रसिद्ध पावलेल्या घराण्यांपैकी एक म्हणजे नागपूरचे भोसले घराणे. नागपूरच्या भोसले घराण्यातील अनेकांनी आपल्या कर्तृत्वाने व पराक्रमाने  मराठ्यांच्या राज्यविस्तारात योगदान दिले हे आपणास ठाऊक आहेच मात्र या घराण्यातील एक प्रख्यात पुरुष म्हणून परसोजी भोसले यांचे नाव अतिशय आदराने घेतले जाते.

परसोजी भोसले यांच्या जन्मतिथीचा नक्की उल्लेख आढळत नसला तरी त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात केली. सुरुवातीस ते स्वराज्याच्या सैन्यात होते आणि त्यांनी याकाळात आपल्या पराक्रमाने मोठे नाव प्राप्त केले. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वऱ्हाड आणि गोंडवन या प्रांतात मराठ्यांचा अमल होण्यासाठी परसोजी भोसले यांनी अनेक स्वाऱ्या केल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीतही परसोजी भोसले स्वराज्याची सेवा करीत होते.

छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात स्वराज्य मोगली संकटात असताना परसोजी भोसले यांनी स्वराज्याशी एकनिष्ठ राहून राजाराम महाराजांना खूप मदत केली आणि वऱ्हाड आणि गोंडवन या प्रांतात मराठ्यांचा अमल बसवण्यात महत्वाची कामगिरी बजावली. या कार्यामुळे प्रसन्न होऊन राजाराम महाराजांनी परसोजी यांना मानाचा सेनासाहेब सुभा हा किताब आणि सरंजाम देऊन या दोन्ही प्रांतातील चौथाई वसुली आणि सरदेशमुखीचे कार्य सोपवून त्यांना सनद बहाल केली.

या नंतर परसोजी भोसले वऱ्हाड प्रांतातील भाम येथे वास्तव्यास आले. १७०७ साली छत्रपती शाहू महाराजांची मोगलांच्या कैदेतून सुटका झाली आणि त्यांनी स्वराज्याच्या दिशेने प्रयाण सुरु केले व वाटेत त्यांना मराठ्यांचे अनेक सरदार येऊन मिळाले. शाहू महाराज स्वराज्यावर आपला हक्क सांगण्यास येत आहेत असे समजल्याने महाराणी ताराबाईंनी त्यांस विरोध करण्याचा प्रयत्न केला आणि प्रथम परसोजी भोसले यांचे बंधू बापूजी यांस आपल्या पक्षात वळवून त्यांना परसोजी यांस सुद्धा आपल्या पक्षात येण्याचा निरोप देऊन परसोजी व बापूजी या दोघांना शाहू महाराजांना रोखण्यासाठी पाठवले.

मोगलांच्या कैदेतून सुटून आलेले शाहू महाराज खरे की खोटे असा संशय अगदी सुरुवातीपासून महाराणी ताराबाई आणि इतर मराठे सरदारांस होता त्यामुळे परसोजी भोसले आणि बापूजी भोसले यांनी प्रथम शाहू महाराजांची भेट घेतली आणि भेटीअंती शाहू महाराज खरोखरीच छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र आणि स्वराज्याचे वारस शाहू आहेत हे सिद्ध झाले.

परसोजी व बापूजी यांना शाहू महाराज हे अस्सल आहेत याची खात्री पटली तरी इतर सरदारांना अजूनही शाहू महाराज खरे आहेत की नाहीत याची शंका होती त्यावेळी या शंकेचे निरसन करण्यासाठी परसोजी, छत्रपती शाहू महाराज आणि बापूजी हे सर्वांसमक्ष एकाच ताटात जेवले आणि सर्व सरदारांची शाहू महाराज खरे असल्याची खात्री पटली.

आपल्या कठीण प्रसंगात परसोजी यांनी दिलेल्या साथीने अनेक मराठे सरदारांनी शाहू महाराजांचा पक्ष स्वीकारल्याने शाहू महाराजांची बाजू बळकट झाली आणि त्यांनी सातारा येथे आपला राज्याभिषेक केल्यावर परसोजी यांनी आपल्यासाठी जे कार्य केले त्याचे बक्षीस म्हणून १७०७ साली त्यांचे पूर्वीचे सेना साहेब सुभा हे पद आणि वऱ्हाड गोंडवन या प्रांताचा अंमल त्यांच्याकडेच कायम करून त्यांना ही सनद वंशपरंपरेने कायम करून दिली.

१७०७ ते १७०९ अशी दोन वर्षे परसोजी भोसले यांनी वऱ्हाड आणि गोंडवन या दोन प्रांताचा कारभार उत्तमरीत्या पहिला आणि कालांतराने ते साताऱ्यास शाहू महाराजांची भेट घेण्यास गेले असता तेथून परत येत असताना कृष्णा व वेण्णा या दोन नद्यांचा संगम ज्या ठिकाणी आहे अशा संगम माहुली येथे १७०९ साली त्यांचा मृत्यू झाला. संगम माहुली या ठिकाणीच परसोजी भोसले यांची समाधी असून शाहू महाराजांनी या समाधीच्या निगराणीसाठी इनाम जमीन परसोजी यांचे पुत्र कान्होजी यांस दिली होती.

परसोजी भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि छत्रपती शाहू महाराज अशा चार छत्रपतींच्या कारकिर्दी पहिल्या असून त्यांनी आपले पूर्ण आयुष्य हे स्वराज्यसेवेत अर्पण केल्याने मराठ्यांच्या इतिहासात त्यांचे नाव अजरामर आहे.