आट्यापाट्या - अस्सल मराठी मातीतला खेळ

विशेष म्हणजे हा खेळ अस्सल महाराष्ट्राच्या मातीतील खेळ असल्याने महाराष्ट्रातील मराठी लोकांनीच या खेळाचा शोध लावला ही अभिमानाची बाब आहे.

आट्यापाट्या - अस्सल मराठी मातीतला खेळ

Marathi Buzz Shop

Marathi Buzz Shop

मनुष्याने आपल्या मनोरंजनासाठी व व्यायामासाठी जे अनेक क्रीडाप्रकार शोधले आहेत त्यापैकी एक अप्रसिद्ध क्रीडाप्रकार म्हणजे आट्यापाट्या. मुळात आट्यापाट्या हा पूर्वी एक लोकप्रिय खेळ होता मात्र आधुनिक काळात क्रिकेट सारखे खेळ प्रसिद्ध झाल्याने आट्यापाट्यांचा खेळ मागे पडला आणि सध्या फक्त शिमग्याच्या सणाच्या कालावधीत आट्यापाट्यांचा खेळ महाराष्ट्रातील काही ठिकाणी खेळला जातो.

आट्यापाट्या खेळाचा उगम नक्की केव्हा झाला याचा ठोस उल्लेख आढळत नसला तरी अदमासे पाचशे वर्षांपूर्वी सुद्धा हा खेळ खेळला जात असे. संत तुकाराम यांच्या अभंगात या खेळाचा उल्लेख आट्यापाट्या किंवा मृदंगपाट्या या नावाने आढळतो. 

विशेष म्हणजे हा खेळ अस्सल महाराष्ट्राच्या मातीतील खेळ असल्याने महाराष्ट्रातील मराठी लोकांनीच या खेळाचा शोध लावला ही अभिमानाची बाब आहे. आट्यापाट्यांचा खेळ प्रामुख्याने हिवाळ्यात अथवा उन्हाळ्यात खेळला जातो मात्र वसंत ऋतू या खेळास उत्तम काळ आहे मात्र हल्ली हा खेळ शिमग्याच्या दहा दिवसांत मोठ्या प्रमाणात खेळला जातो.

आट्यापाट्या हा खेळ सामूहिक क्रीडाप्रकार आहे व त्यामुळे अर्थातच हा खेळ खेळण्यासाठी मोकळे मैदान लागते. हा खेळ उंच सखल मैदानात खेळणे शक्य नसते त्यामुळे या खेळास सपाट मैदानच लागते. आट्यापाट्या हा खेळ असा आहे की इतर खेळांत खेळाडूंशिवाय काही वस्तूंचा उपयोग केला जातो मात्र या खेळात एकही वस्तूची गरज लागत नाही व फक्त खेळाडू आणि मैदान असले की हा खेळ आरामात खेळता येऊ शकतो.

फक्त मैदानावर सीमा, पाट्या आणि मृदंग आदी विभाग समजण्यातही खडूने रेषा आखतात. दोन्हीकडील बाजूना ज्या दोन सीमा असतात त्यांपासून बरोबर मध्यावर सामान अंतराने सीमांना समांतर अशी एक रेषा असते तिला मृदंग अथवा सूर असे म्हणतात.

सीमांना काटकोनात छेदणाऱ्या अदमासे दहा दहा फुटांच्या अंतराने आडव्या रेषा पडतात त्यांना पाट्या म्हणतात. या पाट्यांमध्ये पहिल्या व शेवटच्या पाट्यांना दोन वेगवेगळी नावे दिली जातात. पाट्या तयार झाल्यावर खेळाडू दोन गटात विभागले जातात. प्रत्येक गटाकडे जास्तीत जास्त बारा खेळाडू असतात.

आट्यापाट्या हा खेळ मराठ्यांच्या पारंपरिक युद्धपद्धतीचा उत्तम नमुना आहे कारण या खेळात विलक्षण हुशारी व चपळता लागते. हुलकावणी देऊन निसटणे, एखाद्यास कोंडीत पकडणे, वेढ्यात सापडले असता चपळतेने त्यातून बाहेर पडणे, शत्रूस कचाट्यात पकडून त्यास जेरीस आणणे हे मराठ्यांचा युद्धकलेत वापरले जाणारे प्रकार या खेळात क्रीडस्वरूपात आले असल्याने पूर्वी हा खेळ मराठ्यांच्या सैनिकी शिक्षणाची पूर्वतयारी असावी असा विश्वास वाटतो.

आट्यापाट्यांच्या खेळामुळे एकाग्रता, चपळता तर वाढतेच मात्र शरीराचा व्यायामही होतो व सामूहिक खेळ असल्याने खिलाडूवृत्ती मध्ये वाढ होते तरीही हा खेळ आधुनिक युगात उपेक्षित आहे ही खरेच दुर्दैवाची बाब आहे. आट्यापाट्या हा खेळ खऱ्या अर्थी मराठी मातीतील खेळ असल्याने या खेळास पुन्हा एकदा मराठी माणसाने स्वीकारून त्याचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार केला गेला पाहिजे कारण या खेळामुळे भावी पिढीमध्ये शक्ती व युक्तीचा अनोखा संगम होईल यात काहीच शंका नाही.