बुद्धिबळ - भारतात निर्माण झालेला खेळ

बुद्धिबळ या खेळात चौसष्ट घरांचा चौरसाकृती पट आणि राजा, वजीर, उंट, हत्ती, घोडे आणि प्यादी असे नग असतात आणि या खेळात दोन खेळाडूच सामील होऊ शकतात.

बुद्धिबळ - भारतात निर्माण झालेला खेळ
बुद्धिबळ

जागतिक स्तरावर अत्यंत लोकप्रिय असलेला खेळ म्हणजे बुद्धिबळ. बुद्धिबळास इंग्रजी भाषेत Chess असे नाव असून हा खेळ संपूर्ण जगात खेळला जात असला तरी या खेळाचा शोध प्रथम भारतात लागला हे अनेकांना माहिती नाही.

नावाप्रमाणेच बुद्धिबळ या खेळात पूर्णतः बुद्धीचा वापरच करावा लागतो व ज्याची बुद्धी या खेळात अधिक तोच या खेळात जिंकतो. बुद्धिबळ खेळाचा उगम हा रामायण काळातील असून महाभारतात एका ठिकाणी एक कथा सांगितली गेली आहे की, रावणास युद्धाची अत्यंत आवड असल्याने त्याला सतत युद्धप्रसंग हवे असत मात्र एक काळ असाही आला की युद्ध खेळण्यासाठी राज्यात एकही जागा शिल्लक राहिली नव्हती कारण सर्व जागा रावणाने पूर्वीच पादाक्रांत केल्या होत्या त्यामुळे रावणाची पत्नी मंदोदरी हिने रावणाच्या करमणुकीसाठी या खेळाची निर्मिती केली.

बुद्धिबळ खेळाचे अत्यंत प्राचीन नाव चतुरंग असे असून प्राचीन काळी या खेळावर चतुरंगकेली आणि चतुरंगप्रकाश असे दोन ग्रंथ लिहिण्यात आले होते. इसवी सनाच्या सहाव्या शतकात हा खेळ भारतातून इराण मध्ये गेला. इराणमध्ये या खेळास चत्रांग असे नाव मिळाले. इराणमधून हा खेळ अरबस्थान मध्ये गेल्यावर त्यास सात्रांच असे नाव मिळाले आणि आजही आपल्याकडे यास जे शतरंज असे नाव मिळाले आहे ते मूलतः चतुरंगचाच अपभ्रंश आहे.  

प्राचीन काळापासून मध्ययुगापर्यंत या खेळात अनेक शोध लावण्यात आले आणि मध्ययुगीन भारतात त्रिभंगाचार्य नावाचे एक निष्णात बुद्धिबळ पटू झाले त्यांनी या खेळात आमूलाग्र शोध लावले आणि त्यांनी शोधलेली पद्धत युरोपात आणि अमेरिकेत प्रसारित होऊन आज जागतिक स्तरावर बुद्धिबळ खेळण्याची जी पद्धत आहे ती रूढ झाली व याचे श्रेय त्रिभंगाचार्य यांना जाते. 

एकेकाळी बुद्धिबळ हा खेळ भारत अत्यंत लोकप्रिय होता मात्र ब्रिटिशकाळात पत्त्यांचा खेळ प्रचलित झाल्याने आणि या खेळात विशेष बुद्धीला ताण देण्याची गरज नसल्याने बुद्धिबळ खेळण्याचे प्रमाण कमी झाले मात्र त्याच वेळी पाश्चिमात्य देशातील लोकांनी बुद्धिबळाच्या खेळाचा अंगीकार करून त्याचा मोठा प्रचार आणि प्रसार केला.

बुद्धिबळ या खेळात चौसष्ट घरांचा चौरसाकृती पट आणि राजा, वजीर, उंट, हत्ती, घोडे आणि प्यादी असे नग असतात आणि या खेळात दोन खेळाडूच सामील होऊ शकतात आणि प्रत्येकाकडे एक राजा, एक वजीर, दोन उंट, दोन घोडे, दोन हत्ती आणि आठ प्यादी असे एकूण सोळा सोळा मिळून बत्तीस नग असतात. 

अकराव्या शतकात सिसॉलिस नामक एका योग्याने युरोपात बुद्धिबळावर एक दीर्घ कविता लिहिली होती आणि १४६० साली या कवितेचे फ्रेंच मध्ये भाषांतर झाले आणि १७७४ साली या कवितेचे इंग्रजीत भाषांतर झाले मात्र भारतात तर हा खेळ मागील हजारो वर्षांपासून खेळला जात होता त्यामुळे भारतात जन्मलेल्या या खेळाचा भारतात मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार व्हायला हवा.

आपल्या भारतात बुद्धिबळ खेळात मोठे कर्तृत्व गाजवलेले ७५ हुन अधिक ग्रँड मास्टर्स, १२४ आंतरराष्ट्रीय मास्टर्स, १८ महिला ग्रँड मास्टर्स आणि ४२ महिला आंतरराष्ट्रीय मास्टर्स असून यांच्या माध्यमातून भारताच्या बुद्धिबळाच्या खेळाचा वारसा जगभरात निनादत आहे.