बकासुर - महाभारतातील एक प्रसिद्ध राक्षस

वैत्रकीय वनातच बकासुराचा निवास होता. बकासुराच्या पित्याचे नाव जटासूर असे होते.

बकासुर - महाभारतातील एक प्रसिद्ध राक्षस

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

महाभारतात जे प्रसिद्ध राक्षस होऊन गेले त्यापैकी एक म्हणजे बकासुर. बकासुर हा आपल्या खाण्याच्या आसक्तीसाठी प्रसिद्ध होता त्यामुळे आजही जर कोणी मनुष्य जरुरीपेक्षा अधिक खात असेल तर त्याला बकासुर म्हटले जाते. बकासुर व भीमाची कथा ही आपल्या बऱ्यापैकी परिचयाची असली तरी या लेखात आपण या घटनेविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

प्राचीन भारतात एकचक्रा नामक एक मोठी नगरी होती व या नगरीच्या शेजारी वैत्रकीय नावाचे एक मोठे अरण्य होते. या वनास वैत्रकीय असे नाव असण्याचे कारण म्हणजे या वनात वेताची झाडे प्रचंड प्रमाणात होती. एका अर्थी हे संपूर्ण वन वेताच्या झाडांनीच भरले होते. वेतास संस्कृत भाषेत वैत्र असे म्हटले जाते.

वैत्रकीय वनातच बकासुराचा निवास होता. बकासुराच्या पित्याचे नाव जटासूर असे होते. बकासुर हा वैत्रकीय वनातून एकचक्रा नगरीतील व आजूबाजूच्या परिसरातील सामान्य जनांना खूप त्रास देत असे. अनेक दिवस हा त्रास परिसरातील नागरिक सहन करीत होते त्यामुळे एके दिवशी समस्त विभागातील नागरिकांनी एकत्र बैठक बोलावली आणि बकासुराला भेटायचे ठरवून वैत्रकीय वनात प्रवेश केला.

वैत्रकीय वनात बकासुराची भेट झाली यावेळी नागरिकांनी त्यास त्रास न देण्याची विनवणी केली व या बदल्यात तुला दर दिवशी एक गृहस्थ आळीपाळीने वीस खंडी धान्य आणि एक रेडा खंडणी म्हणून देत जाईल व या बदल्यात तू आम्हास त्रास द्यायचा नाहीस व इतर शत्रूंपासून सुद्धा तू आमचे रक्षण करीत जावेस.

बकासुराने हा प्रस्ताव मान्य केला आणि दर दिवशी परिसरातील एका घराकडून बकासुरास वीस खंडी धान्य आणि रेडा जाऊ लागला. अशा प्रकारे काही दिवस सरले आणि एका अतिशय गरीब गृहस्थावर खंडणी देण्याची वेळ आली. ज्या गरीबाच्या घरात खायला दोन घास नाहीत तो वीस खंडी धान्य आणि रेडा कसा देऊ शकतो हा विचार त्याच्या कुटुंबास पडून ते अतिशय चिंतीत झाले मात्र बकासुरास वेळेवर कर मिळाला नाही तर त्याचा प्रकोप पुन्हा एकदा होण्याची भीती सर्वांना पडली.

याच काळात पांडव लाक्षागृहातून सुखरूप बाहेर पडून याच परिसरात वास्तव्यास होते त्यावेळी त्यांच्या कानावर ही गोष्ट गेली. कुंतीने गरीब गृहस्थाचे कथन ऐकल्यावर तिने भीमास स्वतः वैत्रकीय वनात जाऊन बकासुराचा समाचार घेण्यास सांगितले आणि भीम थोडे अन्न आणि रेडा घेऊन त्या वनात गेला.

वनात भीम बकासुराची प्रतीक्षा करीत असताना त्यास भूक लागून त्याने गाड्यावरील बरेचसे अन्न सेवन केले आणि तेवढ्यात बकासुर आला. भीम हा या वनात बकासुराचा समाचार घ्यायलाच आला असल्याने साहजिकच आपले अन्न भीमाने फस्त केलेले पाहून बकासुरास राग आला आणि तो भीमावर चालून गेला. भीमाने सुद्धा बकासुराशी दोन हात करण्याची तयारी केली.

यानंतर भीमाचे व बकासुराचे मोठे युद्ध होऊन त्यामध्ये बकासुराचा वध झाला व एकचक्रा नगरी आणि परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकून भीमाचे व कुंतीचे आभार मानले.