होनाजी बाळ - सुप्रसिद्ध मराठी शाहीर

होनाजी बाळ हे वेगवेगळ्या विषयांवरील काव्य निर्माण करण्यात तरबेज होते व त्यांनी पोवाडे, लावण्या, भक्तिगीते असे अनेक काव्यप्रकार हाताळले होते ही खरोखरच आश्चर्याची गोष्ट होती.

होनाजी बाळ - सुप्रसिद्ध मराठी शाहीर
होनाजी बाळ

मराठेशाहीच्या उत्तरकाळात जे प्रसिद्ध कवी व शाहीर होऊन गेले त्यामध्ये होनाजी बाळ यांचे नाव अतिशय आदराने घेतले जाते. होनाजी बाळ यांचे पूर्ण नाव होनाजी सयाजी शिलारखाने असे असून त्यांच्या आजोबांचे नाव साताप्पा आणि वडिलांचे नाव सयाजी असे होते.

होनाजी बाळ यांचा जन्म पुण्यातील गवळी समाजातील एका प्रसिद्ध शाहीर कुटुंबात झाला. त्यांचे आजोबा साताप्पा शिलारखाने आणि वडील सयाजी शिलारखाने हे पेशवे दरबारातील प्रसिद्ध शाहीर होते त्यामुळे या कलेचे बाळकडू त्यांना आपल्या घरातूनच मिळाले होते.

आपला पारंपरिक व्यवसाय करत असताना विविध विषयांवरील पोवाडे रचण्याची आवड होनाजी बाळ यांना बालपणापासूनच होती व यामुळे त्यांना लवकरच प्रसिद्धी मिळाली आणि पुण्याच्या पेशवे दरबारात महत्वाचे स्थान देखील प्राप्त झाले. 

होनाजी बाळ यांचा उदय प्रामुख्याने सवाई माधवराव पेशवे यांच्या काळात झाला कारण या काळात त्यांनी खर्ड्याच्या लढाईचा पोवाडा केला होता. मराठी लोकनृत्यातील प्रसिद्ध प्रकार लावणी होनाजी बाळ यांच्या काळात लोकप्रियतेच्या शिखरावर होता. रागदारीच्या लावण्या होनाजी बाळ यांनी खऱ्या अर्थी लोकप्रिय केल्या होत्या.

होनाजी बाळ हे वेगवेगळ्या विषयांवरील काव्य निर्माण करण्यात तरबेज होते व त्यांनी पोवाडे, लावण्या, भक्तिगीते असे अनेक काव्यप्रकार हाताळले होते ही खरोखरच आश्चर्याची गोष्ट होती.

सवाई माधवराव पेशवे यांच्या मृत्यूपश्चात दुसऱ्या बाजीरावांचे पेशवेपदावर आगमन झाले व त्याकाळातही होनाजी बाळ यांच्या प्रसिद्धीचा स्तर वाढतच होता. दुसऱ्या बाजीरावांचे एकनिष्ठ मानले जाणारे त्रिंबकजी डेंगळे आणि होनाजी बाळ यांचा चांगला स्नेह होता आणि त्रिंबकजी डेंगळे यांच्या वाड्यात होनाजी बाळ यांच्या पोवाड्यांचा व इतर काव्यांचा कार्यक्रम आयोजित केला जात असे.

होनाजी बाळ यांनी लिहिलेले सर्वात प्रसिद्ध भक्तीगीत म्हणजे घनःश्याम सुंदरा. हे गीत भूपाळी या काव्यप्रकारातील होते व सूर्योदयाच्या वेळी हे गाणे म्हणण्याची परंपरा सुरु झाली ती आजही सुरु आहे. या भूपाळीस अमर भूपाळी असे सार्थ नाव प्राप्त आहे कारण आज इतक्या वर्षांनी सुद्धा ही भूपाळी अनेकांना तोंडपाठ आहे.

होनाजी बाळ यांचे घराणे मूळचे कोकणातील असावे कारण त्यांचे कुलदैवत कोकणातील रवळनाथ हे होते याशिवाय ते जेजुरीच्या खंडोबाची सुद्धा भक्ती करीत आणि रवळनाथ आणि खंडोबा या दोन दैवतांवर त्यांनी पोवाडेसुद्धा लिहिले आहेत.

होनाजी बाळ यांच्या लावण्या या राग भैरवी मध्ये असत. होनाजी बाळ यांच्या कालावधीत अनंतफंदी नामक एक प्रसिद्ध कीर्तनकार होऊन गेले त्यांची होनाजी बाळ खूप स्तुती करत.

होनाजी बाळ यांनी लावण्यांचा मूळ गाभा जपून लावण्यांची कीर्ती जपण्याचा कायमच प्रयत्न केला पण तो काळ बदलता होता आणि या काळात लावणी नृत्यप्रकार वेगाने प्रसिद्ध होत असल्याने होनाजी बाळ यांना मोठ्या प्रमाणात स्पर्धक निर्माण झाले मात्र होनाजी बाळ यांना मिळत असलेल्या प्रसिद्धीने त्यांचे या व्यवसायातील शत्रू सुद्धा अनेक झाले होते आणि एके दिवशी होनाजी बाळ यांच्यावर त्यांच्या स्पर्धकांनी मारेकरी घालून त्यांची निर्घृण हत्या केली आणि महाराष्ट्र एका महान कवीस मुकला.

होनाजी बाळ यांच्या निर्घृण हत्येने पुण्यात त्या काळी मोठी खळबळ माजली आणि त्यांनी निर्माण केलेल्या वारशाची जपणूक करण्याची शपथ अनेक कलावंतांनी घेतली आणि भाद्रपद कृष्ण चतुर्दशी हा दिवस त्यांची पुण्यतिथी म्हणून पुण्यात साजरी केली जाऊ लागली व ही परंपरा गेली अनेक वर्षे सुरु होती.

पुण्यातील संगमावर होनाजी बाळ यांची समाधी होती व या समाधीवर बेलाचे एक झाड होते. होनाजी बाळ यांच्या मृत्यूस १७९ वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी अमर भूपाळी आणि इतर अनेक काव्यांतून मराठी जनांच्या मनात ते कायमचे अमर झाले आहेत.