रुळलेल्या वाटा सोडून

या पुस्तकात प्रामुख्याने अज्ञात पर्यटनस्थळांचा वेध घेण्यात आलेला आहे. आजही महाराष्ट्रात अशी विपुल स्थळे आहेत जी प्रसिद्धीच्या झोतात येणे बाकी आहे.

रुळलेल्या वाटा सोडून
रुळलेल्या वाटा सोडून

आपली महाराष्ट्रभूमी म्हणजे निर्मात्याने विशेष लक्ष देऊन निर्माण केलेले आनंदवनभुवन. या महाराष्ट्राला वैभवशाली इतिहासाचा, भूगोलाचा, संस्कृतीचा, साहित्याचा व स्थापत्याचा उज्वल वारसा आहे. पर्यटनस्थळांची तर महाराष्ट्रात एवढी विपुलता आहे की सर्व पर्यटनस्थळे पाहायचा संकल्प केल्यास एक जन्मही पुरणार नाही.

महाराष्ट्रात जी विपुल पर्यटनस्थळे आहेत त्यामध्ये किल्ले, मंदिरे, लेणी, समुद्र, डोंगर, ऐतिहासिक, नैसर्गिक असे अनेक प्रकार येत असले तरी त्याहून वेगळे दोन प्रकार म्हणजे परिचित पर्यटनस्थळे व अपरिचित पर्यटनस्थळे आणि आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अपरिचित पर्यटनस्थळे सुद्धा विपुल प्रमाणात आहेत ज्यांचा प्रचार व प्रसार जेवढा हवा तेवढा होऊ शकला नाही कारण ही स्थळे रुळलेल्या वाटांवर नसून आडवाटांवर, डोंगर दऱ्यांत, किनाऱ्यावर, जंगलांत, कडेकपारीत आहेत त्यामुळे ही स्थळे कायमच स्वत:भोवती अज्ञाताचे गूढ वलय पांघरून अनेक वर्षे लोकांच्या नजरेपासून दूर राहिली आहेत.

आडवाटेवरील ही स्थळे महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची व संस्कृतीची ओळख करून देणारे वारसे आहेत व ते पाहण्यासाठी रुळलेल्या वाटा सोडून आडवाटेचा प्रवास करणे भाग आहे.

गेली अनेक वर्षे भटकंतीची आवड जपताना रुळलेल्या रस्त्यांना खेटून कुठेतरी दूरवर जाणाऱ्या या आडवाटा लेखकाच्या आकर्षणाचा विषय होता व पर्यटनासोबत इतिहासाची आवड निर्माण झाल्यावर या वाटा पुन्हा एकदा पालथ्या घालायच्या ठरवून दऱ्या खोऱ्यांनी व अरण्यांनी वेढलेल्या वाटांचा प्रवास सुरु झाला व पाहता पाहता अनेक अज्ञात स्थळे नजरेस पडली. या स्थळांची ऐतिहासिक व भौगोलिक माहिती घेण्याचा लेखकाने प्रयत्न केला व जे मनाला उमजले ते इतरांनाही कळावे यासाठी लेखांच्या माध्यमातून या स्थळांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

पर्यटन केल्याने ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यास मदत होते व त्या स्थळांचा इतिहास व भूगोल आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. आपल्या पूर्वजांनी किल्ले, मंदिरे, लेणी, वास्तू, मूर्ती निर्माण करताना आधुनिक यंत्रणा उपलब्ध नसतानाही जे महत्कार्य केले ते या युगातील आधुनिक तंत्रज्ञानालाही शक्य होणार नाही असेच आहे त्यामुळे या गोष्टींपासून अनेक बोध घेता येऊ शकतात.

या पुस्तकात प्रामुख्याने रायगड जिल्हातील अज्ञात पर्यटनस्थळांचा वेध घेण्यात आलेला आहे. आजही रायगड, कोकण व महाराष्ट्रात अशी विपुल स्थळे आहेत जी प्रसिद्धीच्या झोतात येणे बाकी आहे व अगोदर सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातील परिचित व अपरिचित पर्यटनस्थळांचा वेध घ्यायचा झाल्यास एक जन्मही पुरणार नाही त्यामुळे याच जन्मात जर शक्य तेवढी पर्यटनस्थळे पाहणे शक्य झाले तर ते एका प्रकारे जन्माचे सार्थकच ठरेल.

या पुस्तकात अशाच आडवाटेवरील तेरा पर्यटनस्थळांचा वेध घेण्यात आला असून सर्वच ठिकाणे पूर्णपणे अपरिचित नसली तरी त्यांच्या अपरिचित इतिहासाचे अज्ञात पेलू या पुस्तकाच्या माध्यमातून मांडण्यात आले आहेत. पुस्तकातील प्रकरणांत किल्ले, मंदिर, पुरातत्व, मूर्ती, वीरगळ, स्मारके, शिलालेख, लेणी, निसर्गनिर्मित आश्चर्ये इत्यादी स्थळांचा, वास्तूंचा व वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे. हे पुस्तक वाचून जिज्ञासू वाचकांची पावले नक्कीच रुळलेल्या वाटा सोडून या आडवाटांवरील ठिकाणांकडे वळतील आणि त्यातून या स्थळांची महती व माहिती जगासमोर येईल अशी अपेक्षा आहे.