इतिहासावर बोलू काही

आपल्या पूर्वजांनी लेखनकला अवगत झाल्यापासून विविध भाषांचा शोध लावला कारण घडून गेलेली माहिती पुढील पिढीस समजायची असेल तर भाषा व लिखाण याशिवाय दुसरे माध्यम त्याकाळी अस्तित्वात नव्हते.

इतिहासावर बोलू काही

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

इतिहास! चार अक्षरांनी बनलेला शब्द मात्र या चार अक्षरांत लाखो वर्षाचे सार लपलेले आहे. आपल्या पृथ्वीच्या निर्मितीस आजमितीस साडेचार अब्ज वर्षे झाली व मनुष्य प्राण्याच्या निर्मितीस तीन लाखांहून अधिक वर्षे झाली. हा सर्व काळ इतिहासाचाच एक भाग आहे.

इतिहास या शब्दाची फोड केल्यास त्याचे एकूण तीन अवयव निघतात व ते म्हणजे इति+ह+आस. या तीन अवयवांचा अर्थ होतो जे घडून गेले ते, लेखनकलेचा उदय होण्यापूर्वी हा इतिहास मौखिक स्वरूपात हस्तांतरीत होत असे व याचे सर्वात ठळक उदाहरण म्हणजे आपले वेद. फार पूर्वी निर्माण झालेले हे वेद सुरुवातीस मौखिक स्वरूपातच अस्तित्वात होते व पिढ्यानपिढ्या त्यांचे हस्तांतरण मौखिक स्वरूपात होत राहिले, ज्यावेळी लेखनकला उदयास आली त्यावेळी वेद लिखित स्वरूपात उपलब्ध झाले.

इतिहास हा मुळात प्रवाही आहे. एखाद्या डोंगरात नदीचा उगम होतो व ती त्या डोंगरामधून एखाद्या धबधब्याच्या रूपात खाली येते आणि असंख्य वळणे पार करीत समुद्राच्या दिशेने जाऊ लागते. वाटेत तिला इतर अनेक नद्या, नाले, झरे, कालवे इत्यादी जलस्रोत येऊन मिळतात व तिचा विस्तार वाढतच जातो आणि हा सर्व स्रोत मग प्रथम खाडीस आणि अखेर समुद्रास जाऊन मिळतो. काळ सरतो आणि समुद्रातील पाण्याचे बाष्पात रूपांतर होते व ते बाष्प पुन्हा एकदा भूतलावर येते आणि पावसाच्या रूपाने पुन्हा एकदा जमिनीवर कोसळते आणि पुन्हा एकदा त्याच उगमाकडून समुद्राच्या दिशेने त्या नदीचा प्रवास सुरु होतो तसेच इतिहासाचे आहे.

आपल्या पूर्वजांनी लेखनकला अवगत झाल्यापासून विविध भाषांचा शोध लावला कारण घडून गेलेली माहिती पुढील पिढीस समजायची असेल तर भाषा व लिखाण याशिवाय दुसरे माध्यम त्याकाळी अस्तित्वात नव्हते. आधुनिक युगात इंटरनेट, टीव्ही, रेडिओ, मोबाईल सारखी माध्यमे आली असली तरी ही माध्यमे मुळात लेखनकलेचीच आधुनिक रूपे आहेत म्हणून या माध्यमांनी समस्त जगाचे भावविश्व व्यापल्यावरही आजही लिखाण कला तग धरुन आहे.

आपला भारत तर एक प्राचीन संस्कृती व सभ्यता असलेला खंडप्राय देश, या देशाचा इतिहास जेवढा विविधांगी आहे तेवढा क्वचितच इतर देशांचा असेल आणि या इतिहासावर वेळोवेळी त्या त्या काळातील लेखकांनी भाष्य केले, वेद, पुराण, रामायण, महाभारत यांच्यासारख्ने ग्रंथ तर त्या त्या काळातला इतिहासच आहेत. प्राचीन, मध्ययुगीन, अर्वाचीन आणि आधुनिक काळात भारतात प्रचंड धार्मिक, सांस्कृतिक उलथापालथी झाल्या आणि त्या इतिहासाच्या प्रवाहात मिसळून गेल्या आणि यातून जे सार निर्माण झाले ते म्हणजे आपली भारतीय संस्कृती.

इतिहास हा फक्त एखादी घटना नाही तर एखादी व्यक्ती, वास्तू, वस्तू या सुद्धा इतिहासाचा एक अविभाज्य घटक आहेत व या पुस्तकात याच विषयांचा वेध घेण्यात आलेला आहे. जुन्या काळी होऊन गेलेल्या महान लेखकांनी आपल्या लिखाणाच्या स्वरूपातून आपल्याला आपल्या संस्कृतीची ओळख करून दिली यामध्ये त्यांचा हेतू भावी पिढीस ज्ञान मिळावे हाच होता मात्र पाहता पाहता वर्षे लोटली व हा ज्ञानाचा प्रवाह आधुनिक युगात नव्या पिढीसमोर येण्यास अडचणी पडू लागल्या मात्र नदीला कितीही अडवले तरी शेवटी ती अथक प्रयत्नांती समुद्रास मिळतेच त्याप्रमाणे इतिहास सुद्धा काही काळ अज्ञात राहू शकतो मात्र शेवटी त्याचा प्रवाह पुढे जात राहणारच हा निसर्ग नियम आहे.

आपल्या मागे झालेल्या अनेक पिढ्यांतील लेखकांनी ज्या गोष्टी आपल्याला संदर्भरुपांतून अथवा ग्रंथरुपातून सांगितल्या आहेत त्या आपल्यासोबत इतरांनाही समजाव्यात असे जेव्हा जाणवते तेव्हा इतिहासावर काही तरी बोलण्याची इच्छा होते कारण सुरुवातीस सांगितल्याप्रमाणे इतिहास प्रवाही आहे व तो कायमच प्रवाही राहायला हवा. भारतीय इतिहास व संस्कृती जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकास हे पुस्तक नक्की पसंद पडेल अशी खात्री आहे.

इतिहासावर बोलू काही
पृष्ठ - ६४
किमंत - १६० रुपये
प्रकाशक - ल्युक्रेटिव्ह हाऊस

पुस्तक पुढील संकेतस्थळांवर उपलब्ध आहे - Amazon | Flipkart