ऐतिहासिक भोर

'ऐतिहासिक भोर : एक दृष्टीक्षेप' या ग्रंथात वरील बाबींचा आढावा श्री सुरेश शिंदे यांनी अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने घेतला आहे.

ऐतिहासिक भोर

|| इतिहास प्रदिपेन मोहावरण घातिना ।। || लोकगर्भगृहकृस्नं यथावत् संप्रकाशितम् || महाभारतात व्यासमुनिंनी अडीच हजार वर्षापूर्वी इतिहासाची वरील व्याख्या केली आहे. याचा अर्थ असा आहे की, इतिहास ही राष्ट्राची ज्योत आहे. तिच्या प्रकाशात अज्ञानरुपी अंधकार नाहीसा होतो. आपले पूर्वज, त्यांच्या वास्तू, राजे यांचे यथार्थ दर्शन घडते.

भोर या नगरीस मी भरवशाची नगरी म्हणतो, कारण या गावच्या इतिहासात एक अजरामर व्यक्तिमत्त्व होऊन गेले, स्वामीनिष्ठा, राजनिष्ठा म्हणजे काय? हे ज्यांच्याकडून शिकावे ते 'शंकराजी नारायण सचिव'. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रधानमंडळातील महत्त्वाचे पद भूषविणारे शंकर लोकशंकरम् (राजाराम चरित्रम्-केशवपंडीत) तसेच राजाराम महाराजांनी ज्यांना मदार-उल-महाम (दौलतीचा आधारस्तंभ) म्हटले असे हे भोर संस्थानाचे लोकप्रिय राजे शंकराजी नारायण. शाहुमहाराज औरंगजेबाच्या कैदेतून सुटून आल्यावर खेड कडूसची लढाई झाली. शाहूराजे शिरवळला आले. रोहिडा किल्ल्यावर शंकराजी नारायण होते. शाहू महाराजांनी त्यांना भेटावयास या म्हणून आदेश केला. परंतु आपण ताराराणींच्या पक्षात रहावे की शाहुराजांकडे जावे? या पेचप्रसंगात त्यांनी आपला देह ठेवला. पुढे शाहू महाराजांनी त्यांच्या अल्पवयीन मुलास नारोशंकर यांस सचिव पद बहाल केले. त्यांच्याच वंशजांचे पुढे भोर हे राजधानीचे गाव झाले. सचिव या नावानेच पुढे हे घराणे ओळखले जाऊ लागले. ब्रिटीश प्रशासनात संस्थानांना बरेच स्वतंत्र अधिकार असत. त्यामुळे आपल्या राज्यात (प्रदेशात) ते जरुर तशी कर आकारणी करीत, आलेल्या उत्पन्नातून बांधकामे, शिक्षण सुविधा, प्रशासकीय कारभार, उत्सव समारंभ इत्यादी गोष्टी करीत. राजांप्रमाणेच राज्याभिषेकादि विधी करवून घेत आणि राजाधिराज म्हणून प्रशासन चालवित.

'ऐतिहासिक भोर : एक दृष्टीक्षेप' या ग्रंथात वरील बाबींचा आढावा श्री सुरेश शिंदे यांनी अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने घेतला आहे. भोर तालुक्यातील हिरडस मावळ येथील बाजीप्रभू यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेऊन त्यांना अभिवादन करुन त्यांनी आपल्या ग्रंथाचा आरंभ केला आहे. हिंदवी स्वराज्य निर्मितीसाठी ज्या शूर बाजीप्रभू यांनी आपले प्राण धारातीर्थी सोडले त्या भोरच्या भूमिपूत्राला त्यांनी 'शूरा मी वंदिले...धारातीर्थी तप जे आचरती...' या शब्दांत आरंभीच वंदन करण्याचे औचित्याचे कसब त्यांनी साधले आहे. दुसरे शुर सेनानी सरदार कान्होजी जेधे, स्वराज्य निर्मितीच्या कामातील स्वामीनिष्ठ सेनानी सरदार कान्होजी जेधे यांच्या पराक्रमाची स्वामीनिष्ठेची कहाणी उलगडून दाखवली आहे. रंगो बापूजी हे भोरच्या भरवशाच्या पुष्पहारातील एक मोलाचे पुष्प. प्रतापसिंह महाराजांसाठी जिवाची बाजी लावणारे महान व्यक्तिमत्त्व. स्वातंत्र्य समरात समर्पण करणाऱ्या त्यांच्या पुत्राची कहाणी म्हणजे भोरच्या इतिहासातील एक सुवर्णपान.

पुढे शंकराजी नारायण सचिवांची चरित्रगाथा श्री. सुरेश शिंदे यांनी अतिशय भावपूर्ण शब्दांत दिली आहे. पुढे भोर संस्थानातील भुतोंडे गावचे स्वराज्याचे पदाती सरनोबत येसाजी कंक यांच्या कर्तृत्वाचा आढावा घेऊन श्री क्षेत्र आंबवडे, बनेश्वर या देवस्थानांविषयी सविस्तर माहिती दिली आहे. भोरचा राजवाडा हा आजही भोरचे वैभव आहे. स्थापत्य आणि रेखिवपणा यांचे अतिशय अचूक वर्णन करुन संस्थानातील पाणीपुरवठ्याची योजना ही स्थापतींना मार्गदर्शक ठरेल. त्याचे सार्थ वर्णन लेखकाने केले आहे. किल्ले रोहिडा, धाराई गाडे स्मारक, भोर नगरपरिषद, राजा रघुनाथराव हायस्कूल यांची अचूक माहितीही लेखकाने अतिशय ओघवत्या भाषेत दिली आहे.

श्री सुरेश शिंदे यांनी या ग्रंथाद्वारे भोरच्या इतिहासलेखनात मोलाची भर टाकली आहे. सामान्य वाचकापर्यंत अगदी अचूक माहिती ससंदर्भ पोहचवण्यात त्यांना यश आले आहे. त्यांचे याबद्दल किती कौतुक करावे. अशा सच्चा इतिहासलेखकाच्या पुढील लेखनासाठी शुभेच्छा! इति मर्यादा!

- डॉ. सदाशिव शिवदे ज्येष्ठ इतिहास संशोधक