गोविंदपंत खासगीवाले - पेशव्यांच्या खासगी विभागाचे व्यवस्थापक

गोविंद खासगीवाले यांनी अवघ्या सोळाव्या वर्षी खासगी विभागाचे पूर्ण ज्ञान मिळवल्याने बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांनी त्यांच्याकडे खासगी विभागाचा कारभार सोपवला होता.

गोविंदपंत खासगीवाले - पेशव्यांच्या खासगी विभागाचे व्यवस्थापक

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

मराठेशाहीच्या उत्तर काळातील ऐतिहासिक साधनांमध्ये गोविंदपंत खासगीवाले हे नाव अनेकदा आढळते. गोविंदपंत खासगीवाले यांचे मूळ नाव गोविंद शिवराम लिमये असे असले तरी त्यांना खासगीवाले या आडनावाने ओळखले जाण्याचे कारण म्हणजे ते पुणे दरबारी पेशव्यांच्या खासगी विभागातील कारभार पाहत.

गोविंद खासगीवाले यांनी अवघ्या सोळाव्या वर्षी खासगी विभागाचे पूर्ण ज्ञान मिळवल्याने बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांनी त्यांच्याकडे खासगी विभागाचा कारभार सोपवला होता.

खासगीचा व्यवहार सांभाळण्याबरोबरच गोविंदपंत यांच्याकडे ब्रिटिश, निजाम यांच्याकडील वकिलीचे काम देण्यात आले. वकिली करीत असताना त्यांचे अनेकांबरोबर सौहार्दाचे संबंध निर्माण झाले.

पेशव्यांकडून कुठले कार्य करून घ्यायचे असल्यास प्रथम गोविंदपंत यांच्याशी संपर्क साधावा लागत असल्याने अनेकजण त्यांना गौरवपर पत्रे लिहीत.

गोविंदपंत हे पेशव्यांकडील खासगी कारभार पाहत असल्याने फक्त मित्रच नव्हे तर शत्रू सुद्धा त्यांना चांगला मान देत असत त्यामुळे त्यांचा नावलौकिक सुद्धा बराच वाढला आणि गोविंदपंत खासगीवाले हे गोविंद तात्या या टोपणनावाने प्रसिद्ध झाले.

आपल्या कार्याची व मुसद्देगिरीची चुणूक दाखवल्यामळे गोविंदपंत यांना तीन गावे इनाम मिळाली आणि स्वारीचा सरंजाम आणि तैनात प्राप्त झाली. थोड्याच काळात त्यांना पैठणचे कुलकर्णी पद सुद्धा प्राप्त झाले.

१७५९ सालच्या सप्टेंबर महिन्यात इंग्रजांनी आपला वकील पुण्यास पाठवला होता त्यावेळी पेशव्यांमार्फत गोविंदपंत खासगीवाले यांनीच ब्रिटीश वकीलाशी चर्चा केली होती.

माधवराव बल्लाळ पेशवे पदावर असताना त्यांना गोविंदपंत यांच्या अनुभवाचा खूप फायदा झाला व अनेक व्यवहारांमध्ये माधवराव गोविदपंत यांचा सल्ला घेत असत. 

माधवराव पेशवेपदी असताना रघुनाथराव हे नाराज असल्याने त्यांनी काही बाधा आणू नये म्हणून गोविंदपंत हे रघुनाथराव यांच्यासोबत राहून त्यांचे मन सांभाळत व माधवराव यांना कारभार सुरळीत चालू राहण्यासाठी मदत करीत. 

गोविदपंत यांनी केलेल्या सेवेचे बक्षीस म्हणून माधवराव पेशवे यांनी १७६७ साली सोलापूरचा किल्ला गोविंदपंत यांच्या कडे सोपवला होता.

२९ एप्रिल १७७२ साली गोविंदपंत खासगीवाले यांचे निधन झाले व त्यांच्या मागून त्यांच्या पत्नी सती गेल्या. गोविंदपंत यांना नीलकंठ नावाचा एक पुत्र होता.

पुणे शहरातील रामेश्वराचे मंदिर बांधण्याचे श्रेय गोविंदपंत खासगीवाले यांना जाते. गोविंदपंत यांच्या कारकिर्दीतील पत्रांचा संग्रह खासगीवाले दफ्तर या नावाने प्रसिद्ध आहे आणि या दफ्तरावरून अठराव्या शतकातील इतिहासावर चांगला प्रकाश पडतो.