तानसेन - संगीत कलेचा सम्राट

दरबारात तानसेनाने गायलेली गाणी ऐकून अकबर मुग्ध झाला व तानसेनास आपल्या दरबारातील मुख्य गायकाची जबाबदारी देऊन त्यास नवरत्नांत स्थान दिले.

तानसेन - संगीत कलेचा सम्राट

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

भारतीय संगीतकलेत मोलाची भर घालणारे जे महान संगीतकार इतिहासात होऊन गेले त्यापैकी एक नाव म्हणजे तानसेन. तानसेनचे मूळ स्थान मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर हे असून त्याचा जन्म गौड ब्राह्मण कुळात झाला होता व तानसेनच्या वडिलांचे नाव मकरंद पांडे असे होते.

तानसेनचे पिता मकरंद पांडे यांना तानसेन हा नवसाने झालेला पुत्र होता आणि त्याचे मूळ नाव तन्नामित्र असे होते. तानसेन यांच्याकडे जन्मजात एक विशेष कला होती व ती म्हणजे कुठल्याही प्राण्याचा अथवा पक्षाचा आवाज यास हुबेहूब काढता येत असे. 

एके दिवशी हरिदास बाबा नावाचे मोठे संगीतकार ग्वाल्हेर येथे आले असता तानसेनच्या घरातील बागेत थांबले होते त्यावेळी तानसेनला हुबेहूब प्राण्यांचे आवाज काढताना पाहून ते अतिशय चकित झाले आणि त्यांनी मकरंद यांच्याकडे तानसेनची मागणी केली व मी या बालकास शास्त्रीय संगीताचे संपूर्ण शिक्षण देईन अशी ग्वाही दिली.

तानसेन यांच्याकडे गायनकलेचे गुण उपजत असल्याने हरिदास बाबा हे त्याच्या गुणांना योग्य आकार देतील अशा विश्वास ठेवून मकरंद पांडे यांनी तानसेनास हरिदास बाबांसोबत पाठवले. तानसेन यानंतर हरिदास बाबांकडे शास्त्रीय गायनाचे धडे गिरवू लागला व बराच काळ त्यांच्या सोबत राहून त्याने संगीतकलेचे संपूर्ण शिक्षण घेतले व ग्वाह्लेर येथे परत आला.

ग्वाल्हेर येथे परतल्यावर एक गायक म्हणून तानसेनची कीर्ती चारही दिशांना पसरू लागली व सामान्य जनताच नव्हे तर अनेक राजे राजवाडे देखील तानसेनच्या गायनाने मुग्ध होऊ लागले. त्याकाळात उत्तर भारतात मोगल राज्याचा अमल होता व तख्तावर अकबर बादशाह होता. अकबराच्या कानावर सुद्धा तानसेनची कीर्ती गेली व त्याने तानसेनास आपल्या दरबारी बोलावले. 

दरबारात तानसेनाने गायलेली गाणी ऐकून अकबर मुग्ध झाला व तानसेनास आपल्या दरबारातील मुख्य गायकाची जबाबदारी देऊन त्यास नवरत्नांत स्थान दिले.  

अकबरास माहित होते की तानसेनाचे शिक्षण हे हरिदास बाबा यांच्याकडे झाले आहे त्यामुळे तानसेन इतका उत्कृष्ट गातो तर त्याचे गुरु किती उत्कृष्ट गात असतील हा विचार करून अकबर एकदा हरिदास बाबा यांचे गायन ऐकण्यास गेला. हरिदास बाबांची गाणी ऐकून अकबर अधिकच मंत्रमुग्ध झाला. यावेळी अकबर याच्यासोबत तानसेन सुद्धा होता. कार्यक्रम झालयावर अकबराने तानसेनास विचारले की तुम्ही दोघेही उत्कृष्ट गाता यात बिलकुल संशय नाही मात्र तुम्हा दोघांच्याही गाण्यात फरक आहे व तो कसा काय?

यावर तानसेन अकबरास म्हणाला की फरक असणारच कारण हरिदास बाबा हे आपल्या मर्जीने गातात मात्र मला आपल्या आज्ञेत राहूनच गावे लागते. हे उत्तर ऐकून अकबराचे समाधान झाले. 

तानसेन फक्त एक गायक नसून शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतल्याने त्याने अनेक रागांमध्ये नवीन धृपदे बसवली व नवीन राग सुद्धा निर्माण केले. तानसेनाने तयार केलेल्या काही ध्रुपदांमध्ये त्याने अकबर बादशहाचा उल्लेख केलेला आढळतो. तानसेनाने जे नवे राग शोधले त्यामध्ये मियाचा मल्हार, मियाची तोडी आणि मियाचा सारंग आदी राग प्रसिद्ध आहेत.

तानसेनाचे जन्म व मृत्यू या दोन्हींच्या वर्षांची खूप वेगवेगळी माहिती मिळते मात्र  तानसेनाचा मृत्यू ज्यावेळी झाला त्यावेळी त्याचे वय ६३ वर्षे होते. आपल्या गायनाने व संगीताने तानसेनाने भारतीय संगीतकलेत मोलाची भर घातली आहे.