बेलापूर किल्ला माहिती

पोर्तुगीजांच्या काळात बेलापूर किल्ल्याचे नाव होते सॅबेजो. १७३७ साली हा किल्ला मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून स्वराज्यात आणला.

बेलापूर किल्ला माहिती
बेलापूर किल्ला

पूर्वी ठाणे जिल्ह्यातील बेलापूर हे गावं सध्या नवी मुंबई शहरातील एक उच्चभ्रू उपनगर झाले आहे. ज्या काळी उत्तर कोकण हे पोर्तुगीजांच्या अमलाखाली होते त्याकाळी वसई प्रांताच्या अखत्यारीत एकूण सात पेटे अर्थात तर्फ येत असत. या सात पेट्यांमध्ये एक पेटा म्हणजे बेलापूर. बेलापूर पेट्यात त्याकाळी आजूबाजूच्या ६४ खेडेगावांचा समावेश होत असे.

ब्रिटिश काळात सध्याच्या पनवेलच्या खाडीवर जो मोठा पूल बांधला आहे त्या पुलाच्या पलीकडील भागाचा समावेश पूर्वी ठाणे जिल्ह्यात व साष्टी तालुक्यात होत असे व अलीकडे कुलाबा जिल्हा येत असे. सध्याच्या नवी मुंबईमधील पनवेल, कळंबोली व कामोठे हे भाग पूर्वी कुलाबा म्हणजेच रायगड जिल्ह्यात येत व खारघर, बेलापूर, वाशी इत्यादी ठिकाणे ठाणे जिल्ह्यात येत. आता नवी मुंबई हा एक वेगळा जिल्हा झाला आहे.

पोर्तुगीजांच्या काळात बेलापूर किल्ल्याचे नाव होते सॅबेजो. १७३७ साली हा किल्ला मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून स्वराज्यात आणला. वसईवरील मोहिमेत तब्बल ४००० मराठ्यांनी किल्ल्यास वेढा घातला. यावेळी किल्ल्यास पाच बुरुज असून आत ११ तोफा तैनात होत्या तसेच बेलापूर बंदरावर सुद्धा ९ तोफा तैनात होत्या. मराठ्यांनी वेढा घालून बेलापूर किल्ल्यातील पोर्तुगीजांना मुंबई व वसईवरून मदत येणार नाही असा बंदोबस्त केला आणि २० दिवसांच्या युद्धानंतर हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला यावेळी २५ पोर्तुगीज मारले गेले. 

चिमाजी अप्पा पेशवे ब्रह्मेंद्र स्वामींना पत्रात लिहितात की, वांद्रे, वेसावे व बेलापूर हे जागे फार बळकट आहेत. तिथलाही उपाय करू. 

हा किल्ला जिंकण्यापूर्वी चिमाजी अप्पा यांनी येथील महादेवास बेलांचा नवस केला होता व फत्ते झाल्यावर त्यांनी या किल्ल्याचे बेलापूर असे नामकरण केले अशी आख्यायिका आहे. बेलापूर किल्ला पनवेल खाडीच्या मुखावर एका बेटावर बांधला गेला आहे. या बेटाची लांबी एक मैल व रुंदी एक मैल आहे. किल्ल्याची लांबी ४०० फूट तर रुंदी २०० फूट आहे. 

सध्या जेथे नवी मुंबई महानगरपालिका आहे आहे त्या चौकास किल्ला अथवा फोर्ट या नावाने ओळखले जाते. उरण च्या दिशेने आपण अगदी नवी मुंबई महापालिकेच्या विरुद्ध दिशेस उभे राहिलो की डाव्या बाजूला रस्त्याला खेटूनच एक अतिशय जुनी टॉवर सदृश वस्तू आपल्या नजरेस पडते. हा बेलापूर खाडीचे संरक्षण करण्यासाठी बांधण्यात आलेला मनोरा असावा कारण याच्या भिंतीत आतून गोळ्यांचा मारा करण्यासाठी छिद्रे कोरण्यात आली आहेत.

जे एन पी टी रस्त्यावरून बंदरावर नजर टाकली असता किल्ल्याचे दर्शन मुळीच होत नाही कारण आजूबाजूस अनेक उंच इमारती व झाडे असल्याने किल्ला पूर्णतः लपून जातो. या ठिकाणी एकूण दोन मेढेकोट आहेत दोन्ही मेढेकोट अतिशय जीर्णावस्थेत आहेत. एके काळी बेलापूर किल्ल्यास साष्टी बेटाचा रक्षक असे सार्थ नाव होते मात्र आता हा रक्षक आपल्या शेवटच्या घटका मोजत आहे. मराठी बझ तर्फे सरकारला विनंती आहे कि इतिहासाची साक्ष देणाऱ्या  ह्या किल्ल्याचे जबाबदारीने जतन  व्हावे