मिरगड उर्फ सोनगिरी किल्ला

मिरगड या किल्ल्याचे स्थानिक नाव सोनगिरी असेही आहे. सोनगिरी नावाचा आणखी एक दुर्ग कर्जत तालुक्यातही आहे मात्र मिरगड उर्फ सोनगिरी हा दुर्ग पेण तालुक्यात आहे.

मिरगड उर्फ सोनगिरी किल्ला

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

रायगड जिल्ह्यातील पेण, पाली व रोहा तालुक्यात पसरलेली महालमिरा डोंगररांग ही लघु सह्याद्री म्हणून ओळखली जाते. महालमिरा डोंगररांगेस मीरा डोंगर, मीरा महाल अथवा महालमिऱ्या या नावानेही ओळखले जाते.

या डोंगररांगेस महालमिरा हे नाव पाडण्याचे कारण म्हणजे पूर्वी येथे काळ्या मिरीचे असंख्य मळे होते. याच रांगेत व्याघ्रेश्वर व रामेश्वर ही पुरातन मंदिरे असून मिरगड व रत्नगड हे शिवकालीन इतिहासाचे महत्वाचे साक्षीदार असलेले दुर्ग आहेत.

मिरगड या किल्ल्याचे स्थानिक नाव सोनगिरी असेही आहे. सोनगिरी नावाचा आणखी एक दुर्ग कर्जत तालुक्यातही आहे मात्र मिरगड उर्फ सोनगिरी हा दुर्ग पेण तालुक्यात आहे. मिरगड हा किल्ला तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पेण शहराच्या आग्नेय दिशेस १३ किलोमीटर अंतरावर असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून अदमासे १२०० फूट आहे.

भौगोलिक दृष्ट्या मिरगड हा किल्ला महालमिरा डोंगररांगेच्या मध्यभागी असून डोंगररांगेवर पश्चिम दिशेकडून नजर टाकल्यास किल्ला नजरेस पडतो. मूळ रांगेचा एक फाटा एका ठिकाणी निमुळता होत गेला आहे व पाच उंचवटे तयार झाले असून दक्षिणेकडील शेवटच्या उंचवट्यावर मिरगड हा किल्ला आहे. या परिसरास पांचगणी असेही नाव आहे. बहुदा या पाच उंचवट्यांवरून हे नाव मिळाले असावे. मिरगडाच्या आसपास जे दुर्गम खोरे तयार झाले आहे त्यास पाबळ खोरे असे म्हटले जाते.

मिरगड किल्ल्याचा पश्चिम व दक्षिणेकडील भागात खोल दरी निर्माण झाल्याने गडावर जाण्यास पूर्वेकडून व उत्तरेकडून वाट आहे. पूर्वेकडून कोंढवी या गावातून व उत्तरेकडून पांचगणी या गावातून गडावर जात येते.

१६६२ छत्रपती शिवाजी महाराजांनी उंबरखिंडीत मोगल सैन्याचा दारुण पराभव केला तेव्हा यावेळी मोगल सरदार नामदारखान याने पळून जाण्याचा बेत केला मात्र महाराजांनी मीरा डोंगरावर नाकेबंदी केली. दलपत राय याने ही माहिती नामदारखानास सांगितली तेव्हा नामदार खान कसाबसा नागोठणे बंदरावर येऊन तेथून त्याने पेणचे बंदर गाठले व तेथून तो कल्याणमार्गे पळून गेला.

मिरगड हा किल्ला भौगोलिक दृष्ट्या उत्तर कोकणात असून पूर्वी निजामशाहीनंतर हा परिसर विजापूरच्या आदिलशाही कडे होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण सुभा स्वराज्यात आणला त्यावेळी मिरगड हा किल्ला सुद्धा स्वराज्यात आला. मिरगड हा किल्ला महालमिरा डोंगराच्या आसमंतात चालणाऱ्या दळणवणावर टेहळणी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त होता कारण या महालमिरा डोंगरातून पूर्वी कोकणातून घाटमाथ्यावर जाण्यासाठी अनेक खुष्कीचे मार्ग होते. शिवाजी महाराजांनी कल्याण सुभ्याचा खजिना स्वराज्यात आणला तो याच प्रदेशात त्यामुळे मिरगड हा किल्ला तत्कालीन ऐतिहासिक घडामोडींचा महत्वपूर्ण साक्षीदार होता.

किल्ल्यावर पूर्वी तटबंदी, बुरुज, बांधीव पायऱ्या, मंदिरे, पाण्याची टाकी व काही इमारती होत्या मात्र कालौघात या सर्व वास्तू नष्ट होऊन फक्त अवशेषच शिल्लक राहिले आहेत मात्र शिवकाळातील काही महत्वाच्या प्रसंगांचा साक्षीदार असलेला मिरगड प्रत्येकाने एकदा तरी पाहावयासच हवा.