कोकणातील कातळशिल्पे - एक गूढ

श्री. सुधीर रिसबूड यांनी या वेबिनारमध्ये कोकणातील कातळशिल्पांचे महत्त्व स्पष्ट करताना असे सांगितले की प्रागैतिहासिक मानवाच्या कलात्मक जीवनाची खूण म्हणजे ही शिल्पकला आहे.

कोकणातील कातळशिल्पे - एक गूढ
कोकणातील कातळशिल्पे

सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळकोकण, राष्ट्रदेवीचे निसर्गनिर्मित केवळ नंदनवन अशा शब्दांत कवी माधव ज्युलियन यांनी वर्णन केलेल्या कोकणात गेली १० वर्षे मैत्री ग्रुपच्या माध्यमातून कातळशिल्पांचा शोध घेत आहेत. या संपूर्ण अनुभवाचे फलित कोंकण वेबिनार शृंखलेच्या चौथ्या वेबिनारमध्ये पाहायला आणि ऐकायला मिळाले. 

सुधीर रिसबूड (भाई), सुरेंद्र ठाकुरदेसाई आणि धनंजय मराठे या मित्रत्रयीने आधी आवड म्हणून आणि नंतर अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने या कातळशिल्पांविषयीची माहिती संकलित केली. ही कातळशिल्पे कोकणातील सड्यांवर म्हणजे जांभ्या खडकातून बनलेल्या कमी उंचीच्या पठारांवर दिसतात.

ही शिल्पे पिक्टोग्लिफ आणि पेट्रोग्लिफ अशा दोन प्रकारात मोडतात. पिक्टोग्लिफ म्हणजे शिल्पचित्रे भीमबेटका येथे सापडली होती. आणि पेट्रोग्लिफ म्हणजे दगड खोदून केलेली शिल्पे पेरू या देशात सापडली होती. मानवी प्रागैतिहास समजून घेण्याचे साधन म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. 

श्री. सुधीर रिसबूड यांनी या वेबिनारमध्ये कोकणातील कातळशिल्पांचे महत्त्व स्पष्ट करताना असे सांगितले की प्रागैतिहासिक मानवाच्या कलात्मक जीवनाची खूण म्हणजे ही शिल्पकला आहे. या शिल्पांमध्ये अनेक जलचर, भूचर आणि उभयचर अशा तीनही प्रकारातील पशू-पक्षी-मासे पाहायला मिळतात. काही प्राणी- उदाहरणार्थ एकशिंगी गेंडा ज्ञात इतिहासात कधीही कोकणात आढळला नव्हता मात्र तो या कातळशिल्पांमध्ये दिसतो.

एलिफन्ट बर्ड हा केवळ आफ्रिकेत आढळणारा पक्षी या कातळशिल्पांमध्ये दिसतो. प्राण्यांचे आकार बहुतांश वेळा खऱ्या आकाराशी साधर्म्य साधणारे असतात. काही जलचरांची शिल्पे अशा प्रदेशात आढळली जिथून समुद्र २० किमी अंतरावर आहे. त्यामुळे कधीच न आढळणाऱ्या या प्राण्यांचे येथे वास्तव्य होते काय किंवा समुद्राची पातळी आधी वेगळी होती काय असे प्रश्न यातून उद्भवतात. 

काही अमूर्त शिल्पे, काही भौमितिक आकृत्या देखील येथे पाहायला मिळतात. यापूर्वी श्री. श्रीकांत परब, श्री. प्र. के. घाणेकर इत्यादींनी केलेले संशोधन मैत्री संस्थेने पुढे नेले. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील विविध ठिकाणी आढळतात. राजापूर येथील देवाचा गोठणे येथील कातळशिल्पांजवळ प्रचंड जैवविविधता तर आहेच शिवाय येथे केवळ बर्म्युडा ट्रँगल येथे अनुभवायला येणारे चुंबकीय विस्थापन अनुभवायला मिळते. येथून १२५ मीटर त्रिज्येच्या क्षेत्रात होकायंत्र चुकीची दिशा दर्शवते. असे निसर्गाचे अद्भुत रूप पाहणे आता या संशोधकांनी शक्य केले आहे. 

ही कातळशिल्पे पुराणाश्मयुग ते नवाश्मयुगाच्या मधल्या काळात म्हणजे साधारण इसवीसनपूर्व २५०००-४००० मध्ये केली गेल्याचा अंदाज असून त्यावर संशोधन सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या राज्य पुरातत्व विभाग श्री. सुधीर रिसबूड यांच्या कार्याला सहकार्य करत आहे व या कातळशिल्पांना जागतिक वारसास्थळांत सामील करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. निसर्गयात्री ही संस्था या कातळशिल्पांची देखरेख, त्यांचे संवर्धन इत्यादींसाठी लोकसहभागातून प्रयत्न करत आहे. एरव्ही नापीक असणारे हे कोकणातील सडे हिवाळ्यात सुकलेले आणि लांबच लांब पसरलेले गवत, पावसाळ्यात मनमोहक हिरवळ आणि श्रावणात असंख्य कातळफुलांनी बहरलेले असतात. 

येथून खगोलीय निरीक्षणे करता येतात. त्यामुळे या शिल्पांची गंमत आयुष्यात एकदा तरी प्रत्यक्ष अनुभवाच असे आवाहन श्री. सुधीर रिसबूड यांनी व्याख्यानाच्या शेवटी केले. वेबिनारच्या शेवटी निसर्ग टूर्स चे संचालक श्री. संजय नाईक यांनी श्री. सुधीर रिसबूड यांचे आभार मानले व पुढील वेबिनारची उद्घोषणा करून समारोप केला. ‘नव्याने कोकण दाखवूया’ ही कोकण पर्यटनावरील वेबिनार शृंखला सर्वांसाठी खुली असून २३ एप्रिल ते २८ मे च्या दरम्यान दर शुक्रवारी संध्याकाळी ४.३० वाजता कोकण पर्यटन प्रादेशिक विभागाच्या अधिकृत फेसबुक पेजवर ती प्रसारित केली जात आहे.

- पर्यटन संचालनालय महाराष्ट्र राज्य