डाकिन्यां भीमाशंकर
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारी व भीमा या पवित्र नदीचे उगमस्थान असलेले जागृत देवस्थान व निसर्गरम्य पर्यटन स्थळ भीमाशंकर.

पावसाळ्यात सह्याद्रीच्या या लाडक्या डाकीनी नावाच्या डोंगराला पाझर फुटतो. माथ्यावर विविध झाडे दिमाखाने डोलू लागतात. निळ्या लाल-पिवळ्या रानफुलांनी हा डोंगर भरून जातो. आपला थांगपत्ता कोणालाही लागू नये म्हणून तो आपल्या अंगावर धुक्याची दाट चादर ओढून घेतो, पण येथे तर तो फसतो कारण हे अवर्णनीय दृश्य पाहून कोण वेडा तेथे नाही जाणार?
हे स्थळ आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारी व भीमा या पवित्र नदीचे उगमस्थान असलेले जागृत देवस्थान व निसर्गरम्य पर्यटन स्थळ भीमाशंकर. हिरवागार निसर्ग, जागोजागी कोसळणारे धबधबे, तुफान पाऊस, दाट धुके व निर्झर पाहून अगदी हिमालयात आल्याचा भास होतो. अर्थात हे भगवान शंकराचे निवासस्थान असल्याने व शंकरास कैलासाची सवय झाल्याने त्याने कैलासास साम्य असलेली जागा येथे निवडली आहे.
त्रिपुरासुर नावाचा एक दैत्य होता. त्याने देव-देवतांना अतिशय त्रास दिला म्हणून ब्रह्मदेव व देवांचा राजा इंद्र या दोघांनी एक हजार वर्षे तपश्चर्या केली. या तपश्चर्येमुळे भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी इंद्राला ब्रह्माला आदिमायेची अर्थात शक्तीची प्रार्थना करण्यास सांगितले. मग त्या दोघांनी कमंडलूत पाणी आणून कमल पुष्पाने पूजा करून आदिमायेची स्थापना केली. हिच आदी माया आदी शक्ती या स्थळी कमलजादेवी या नावाने प्रसिद्ध आहे. यानंतर भगवान शिव व कमलजादेवी या दोघांनी मिळून त्रिपुरासुराशी या स्थानावर भयंकर युद्ध केले यावेळी सर्व देवांना सोबत घेऊन शिवपार्वती यांनी एक पाय नदीच्या काठावर तर दुसरा पाय रथावर ठेवून भीमरूपात त्रिपुरासुराचा वध केला. शिवपार्वतीच्या या स्वरुपास भीमरूप (उग्ररुप) असे नाव असल्याने या स्थानास भीमाशंकर असे नामाभिमान प्राप्त झाले. हे भीम (उग्र) रूप धारण करताना भगवान शंकराच्या अंगातून घामाच्या प्रचंड धारा वाहिल्या व या धारांमुळेच भीमा नदीचा या स्थानी उगम झाला.
त्रिपुरासुरास मारले त्यावेळी भगवान शंकराने विष्णूचा बाण व नागांचा राजा वासुकीचे धनुष्य करून ब्रह्मदेवास रथाचा सारथी केले होते व हा दिवस कार्तिक शुद्ध पौर्णिमेचा होता म्हणून या दिवसाला त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी येथे देवाचा जन्म दिवस मोठ्या समारंभाने साजरा केला जातो.
समुद्रसपाटीपासून 1 हजार पाच मीटर उंचीवर असणारे हे स्थान खरोखर एक चमत्कारच आहे. येथे हेमाडपंथी बांधणीचे सुमारे 900 वर्षापूर्वीचे भीमाशंकराचे देवालय आहे, उत्तर भारतीय शैलीचे अर्ध शिखर या मंदिरास आहे. सन १७३३ मध्ये नाना फडणवीस यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला होता.
मंदिराच्या गाभाऱ्यात स्वयंभू शिवलिंग आहे. येथे दरवर्षी त्रिपुरी पौर्णिमा श्रावणी सोमवार व महाशिवरात्रीस मोठा उत्सव भरतो. मंदिराच्या प्रांगणात दोन खांब मध्ये एक पोर्तुगिजकालिन घंटा बांधली आहे. मराठ्यांच्या वसई विजयाची साक्ष म्हणून ही घंटा येथे लावली गेली. भीमाशंकराच्या उजव्या बाजूची टेकडी चढून उतरत्या पठारावरून दुसऱ्या टेकडीच्या पायथ्याशी असणारे हनुमान तळे हे निसर्गरम्य ठिकाण आहे. याशिवाय येथे व्याघ्रपदतीर्थ, पापनाथन तीर्थ, कमलजा देवीचे तळे, अरण्यतीर्थ, पापमोचनी, ज्ञानकुंड, भाषादेवी, गुप्त भीमाशंकर इत्यादी धार्मिक स्थळे आहेत. येथील नागफणी टेकडीवरून माथेरान कर्जत व कल्याणचा परिसर दृष्टीस पडतो.
भीमाशंकर चे अभयारण्य म्हणजे विविध वनस्पती व प्राण्यांचे भांडारच आहे. या घनदाट अरण्यात बिबट्या, तरस, भेकर, कोल्हे, मुंगूस इत्यादी प्राणी तर जांभूळ, आंबा, तमालपत्र इत्यादी औषधी वनस्पती सापडतात. येथील शेकरु ही उडणारी खार प्रसिद्ध असून हा महाराष्ट्र राज्याचा राज्यपशू आहे.
भीमाशंकर येथे निवासासाठी पर्यटन महामंडळाचे विश्रामगृह आहे तसेच इथे असणाऱ्या धर्म शाळांकडून सुद्धा निवासाची सोय होऊ शकते. मुंबई हुन 249 किलोमीटर पुण्याहून 120 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या धार्मिक गिरिस्थानावर जाण्यासाठी मुंबई व पुण्याहून थेट राज्य परिवहन महामंडळाच्या बस गाड्या आहेत किंवा रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील खांडस मार्गे फक्त अकरा किलोमीटर चालत जाऊन भीमाशंकर गाठता येणे शक्य आहे.
कुठेतरी हरवून गेलेला जीवनातला आनंद परत मिळवायचा असेल तर या घनदाट जंगलात हरवून गेलेल्या भीमाशंकरास एकदा तरी भेट द्याच, कारण हा जन्म वारंवार मिळत नसतो.