मुंबईचे महालक्ष्मी मंदिर

मुंबई बेटातल्या वरळीतील हे महालक्ष्मी मंदिर खऱ्या अर्थी मुंबईचे प्राचीन देवस्थान आहे.

मुंबईचे महालक्ष्मी मंदिर

मंबईचे महालक्ष्मी मंदीर विख्यात आहे. वर्तमानात आपण पहात असलेल्या मंदीराचे बांधकाम हे काहीशे वर्षांपूर्वीचे असले तरी तरी या मंदिरासही प्राचिन इतिहास आहे.

पुरी कोकणवर राज्य करणाऱ्या शिलाहार राजवंशाची कुलदेवता महालक्ष्मी होती असे उल्लेख त्यांच्या अनेक लेखांत येतात. शिलाहारांच्या उत्तर कोकण, दक्षिण कोकण व कोल्हापूर अशा तीन शाखा असून त्यांचे कुलदैवत महालक्ष्मी हे होते व कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर त्याची आजही साक्ष देत आहे.

शिलाहारांच्या लेखांतही त्यांचे कुलदैवत महालक्ष्मी असल्याचा उल्लेख अनेकदा येतो व आपल्या वंशास महालक्ष्मीचा वरप्रसाद प्राप्त आहे अशी त्यांची भावना होती. कोल्हापूर व मुंबई येथील महालक्ष्मी मंदिरांमधील प्रमुख साम्यस्थळ म्हणजे दोन्ही मंदिरात महालक्ष्मी, महासरस्वती व महाकाली या तीन देवतांच्या मूर्ती स्थानापन्न आहेत.

कोल्हापूर शाखेच्या शिलाहारांचे कुलदैवत ज्या प्रकारे त्यांची राजधानी कोल्हापूर येथे होते त्याचप्रकारे उत्तर कोकणच्या शिलाहारांचे कुलदैवत त्यांची राजधानी पुरी येथे असणे संयुक्तिक आहे.

मुंबईची प्राचीन ओळख पुसून टाकण्यास कारण ठरलेली मध्ययुगीन परकीय चक्रे या मंदिराच्या नाशासही कारणीभूत ठरली मात्र ब्रिटिश काळात एक अद्भुत घटना घडली ज्यामुळे मुंबईचे शिलाहारकालीन कुलदैवत पुन्हा एकदा जगासमोर आले.

ती घटना म्हणजे ब्रिटिशांनी वरळीला बांध उभारण्याचे कार्य हाती घेतले होते तेव्हा या बांधकामाची जबाबदारी रामजी शिवाजी नामक एका मराठी प्रभू गृहस्थाकडे होती. हे काम सुरु असताना सर्व गोष्टी ठीक असूनही अचानक ते कोसळत असे त्यामुळे सर्वच चिंतेत होते. सर्व तांत्रिक बाबी योग्य असता बांधकाम सारखे का कोसळत आहे याचा शोध लावणे अनेकांना अशक्य झाले होते.

मात्र एके रात्री रामजी शिवजीच्या स्वप्नात समुद्रातून महालक्ष्मी, महासरस्वती व महाकाली या तीन देवतांचे दर्शन झाले व या देवता रामजीस म्हणाल्या की, मूर्तिभंजकांनी आमचे येथील मूळ मंदिर ध्वस्त करून आमच्या मूर्ती समुद्रात विसर्जित केल्या व तेव्हापासून आम्ही तेथेच आहोत. तू आपल्या माणसांकरवी जर या मूर्ती समुद्रातून बाहेर काढून त्यांची स्थापना पुन्हा आमच्या मूलस्थानी केलीस तर तुझे जे कार्य अपुरे राहिले आहे ते पूर्ण होईल.

दुसऱ्याच दिवशी सकाळी रामजी शिवजीने काही कामगारांना सांगून अथक प्रयत्नाने समुद्रातील तीनही देवतांच्या मूर्ती बाहेर काढल्या व त्यांचे एक मंदिर येथे निर्माण करण्यात आले.

हे कार्य झाल्यावर वरळीच्या बांधाचे कार्यही निर्विघ्नपणे पार पडले. मुंबई बेटातल्या वरळीतील हे महालक्ष्मी मंदिर खऱ्या अर्थी मुंबईचे प्राचीन देवस्थान आहे.