कन्याकुमारी - भारताचे दक्षिण टोक

कन्याकुमारीचे मंदिर समुद्र तीरावरच असून अतिशय मोठे आहे व अनेक द्वारे ओलांडून आत गेल्यावर कन्याकुमारीचे दर्शन होते. गाभाऱ्यातील कन्याकुमारी देवीची मूर्ती विलोभनीय आहे.

कन्याकुमारी - भारताचे दक्षिण टोक

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

भारताच्या दक्षिणेकडील एक प्रसिद्ध स्थान म्हणजे कन्याकुमारी. कन्याकुमारी हे तामिळनाडू या राज्याच्या टोकावरील एका भूशिरावर स्थित असून या ठिकाणी अरबी समुद्र, हिंदी महासागर व बंगालचा उपसागर यांचा अभूतपूर्व संगम होतो. तीन समुद्राचा संगम या ठिकाणी झाल्यामुळे कन्याकुमारी या क्षेत्रास धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे. 

येथील संगमात स्नान करण्यासाठी देश विदेशातून भाविक येत असतात व त्यांच्या स्नानाकरिता येथील समुद्रतटावर घाट बांधण्यात आला आहे. घाटावर एक मंडप आहे ज्या ठिकाणी भाविक धार्मिक कार्ये करितात.

भारतीयांचा महत्वाचा धर्मग्रंथ असलेल्या महाभारतात कन्याकुमारीचे महत्व पुढीलप्रमाणे प्रतिपादित करण्यात आले आहे.

ततस्तिरे समुद्रस्य कन्यातीर्थ मुप सृशेत। तत्तोय स्पृश्य राजेंद्र सर्व पापे: प्रमुच्यते।।

अर्थ - हे भीष्म, कावेरीत स्नान करून मग समुद्रावरील कन्यातीर्थात स्नान करावे. या तिर्थातल्या जलाचा स्पर्श झाल्यावर मनुष्य सर्व पापांतून मुक्त होतो. 

या स्थळाचे आणखी एक महत्व म्हणजे येथे असलेले कन्याकुमारी देवीचे मंदिर. कन्याकुमारीचे मंदिर समुद्र तीरावरच असून अतिशय मोठे आहे व अनेक द्वारे ओलांडून आत गेल्यावर कन्याकुमारीचे दर्शन होते. गाभाऱ्यातील कन्याकुमारी देवीची मूर्ती विलोभनीय आहे. देवीच्या एका हातात जपमाळ आहे व उत्सवप्रसंगी देवीस रत्नजडित अलंकारांनी सजवण्यात येते.

कन्याकुमारी मंदिराच्या उत्तरेकडील अग्रहारात भद्रकाली या देवतेचे मंदिर आहे व भद्रकाली देवता ही कन्याकुमारी देवीची सखी आहे असे मानण्यात येते. कन्याकुमारी हे देवस्थान भारतातील ५१ शक्तिपीठांपैकी एक आहे.

भारतीय धर्मग्रंथात कन्याकुमारी देवीची जी कथा सांगितली जाते त्यानुसार बाणासुर या राक्षसाने तप करून शंकरांकडे अमरत्वाचे वरदान मागितले. यावेळी भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन त्यास वर दिला मात्र एका कुमारी कन्येशीवाय दुसऱ्या कोणाच्याही हातून तू मरणार नाहीस असेही सांगितले. अमरत्वाचा वर मिळाल्यावर साहजिक बाणासुराने तिन्ही लोकांवर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली यामुळे देव त्रस्त झाले व भगवान विष्णूंना शरण जाऊन मदतीची याचना केली.

विष्णूंनी देवांचे गाऱ्हाणे ऐकल्यावर त्यांना कुमारी कन्येच्या उत्पत्तीसाठी यज्ञ करण्यास सांगितले त्यानुसार देवांनी यज्ञ सुरु केला व या यज्ञाच्या कुंडातील अग्नीतून साक्षात दुर्गादेवी कन्यारूपात प्रकट झाली. कालांतराने आपल्यास भगवान शंकर हे पती म्हणून प्राप्त व्हावेत यासाठी तिने दक्षिण सागराच्या तीरावर तपश्चर्या सुरु केली.

कन्याकुमारीचे तपोबल पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले व त्यांनी तिच्यासोबत विवाह करण्याची संमती दर्शवली मात्र ही बातमी देवांपर्यंत पोहोचल्यावर ते भयभीत झाले कारण जर कन्याकुमारीचे लग्न होऊन ती विवाहित झाली तर तिच्या हातून बाणासुराचा वध होणे शक्य नव्हते. यावर उपाय म्हणून देवांनी नारदमुनींना पाचारण केले. भगवान शंकर कैलास पर्वतातून दक्षिणेस कन्याकुमारीच्या पाणिग्रहण करण्यास निघाले असता शुचीन्द्रम या क्षेत्राजवळ नारदाने शंकरास थांबवून ठेवले यामुळे लग्नाचा मुहूर्त टळला व कन्याकुमारी अविवाहित राहिली.

कन्याकुमारीने शंकरास पती म्हणून प्राप्त करण्यासाठी पुन्हा तप सुरु केले. याच काळात बाणासुरापर्यंत कन्याकुमारीच्या सौंदर्याची कीर्ती गेली व त्याने थेट भारताचा दक्षिण किनारा गाठला व कन्याकुमारीस लग्नासाठी हट्टाने मागणी घालू लागला. कन्याकुमारीने अर्थातच त्याची मागणी झिडकारले व त्यामुळे बाणासुराने संतप्त होऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे कन्याकुमारी संतप्त झाली व दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले व या युद्धात बाणासुर मारला गेला. अशारीतिने कुमारी कन्येच्या हातून बाणासुराचा वध झाला.

या काळापासून ते आजतागायत कन्याकुमारी या ठिकाणी भगवान शंकरांची तपश्चर्या करीत असून ते कधी येतील याची वाट पाहत आहे त्यामुळे कन्याकुमारी देवीच्या मूर्तीच्या हातात जपमाळ दिसून येते. कन्याकुमारीस सती देवीच्या देहाचा पृष्ठभाग सुद्धा गळून पडला होता असा उल्लेख धर्मग्रंथांत आढळतो.

कन्याकुमारी या क्षेत्राचा प्रभाव अनेक माहात्म्यांवर पडला होता व स्वामी विवेकानंद सुद्धा ध्यानधारणेसाठी कन्याकुमारी येथे येत असत व समुद्रातील पाण्यातून वर आलेल्या एका खडकावर बसून तपश्चर्या करत. या खडकास सध्या स्वामी विवेकानंद खडक या नावाने ओळखले जाते. 

कन्याकुमारी परिसराचे जुने नाव गंगैकोण्ड चोलपुरम् असे होते व या ठिकाणी चोल या राजवंशाची सत्ता होती. याच ठिकाणी चोल सम्राट कुलोत्तुंग चोळ (पहिला) याचा शिलालेख ही सापडला आहे. 

भारतातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणूनही कन्याकुमारीस महत्त्व आहे. दूरवर पसरलेल्या समुद्राच्या अफाट लाटांमध्ये येथील सूर्योदय आणि सूर्यास्ताचे दृश्य अतिशय मनमोहक असते व समुद्र किनाऱ्यावर पसरलेली रंगीबेरंगी वाळू या परिसराच्या सौंदर्यात भर घालते. अशा प्रकारे भारताच्या दक्षिण टोकाला असलेले कन्याकुमारी हे शक्तीपीठ वर्षानुवर्षे धर्म, कला, संस्कृती आणि सभ्यतेचे प्रतीक म्हणून प्रसिद्ध आहे.