दक्षिण काशी हरिहरेश्वर
दक्षिण काशी म्हणून त्या क्षेत्राचा उल्लेख केला जातो ते हरिहरेश्वर पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांचे कुलदैवत आहे .

माणगाव गोरेगाव म्हसळा श्रीवर्धन मार्गे हरिहरेश्वर येथे जाता येते. हरिहरेश्वराचे मुंबईपासून अंतर दोनशे दहा किलोमीटर आणि पुण्यापासून दोनशे पाच किलोमीटर आहे. धार्मिक स्थळं बरोबरच समुद्र सानिध्य आणि निसर्गाच्या विविध रूपामुळे पर्यटकांना हरिहरेश्वर परिसर नेहमीच आकर्षित करीत आला आहे.
हरिहरेश्वर देवस्थान पेशव्यांच्या जन्मगाव असलेल्या श्रीवर्धन पासून फक्त आठ किलोमीटर अंतरावर आहे. या देवालयाची उभारणी अगस्ती ऋषींनी केली असे म्हटले जाते तसेच हस्तिनापुर होऊन येथे येऊन पांडवांनी येथे पिंडदान सुद्धा केले होते.
कालभैरव आणि हरिहरेश्वर हे या ठिकाणची मुख्य मंदिरे. कालभैरव हे महादेवाचे एक रूप आहे. पद्धतीनुसार प्रथम काळभैरव व योगेश्वरीचे दर्शन घेतल्यानंतर क्रमाने हरिहरेश्वरच्या मंदिरातील नंदी व गणपतीनंतर हरिहरेश्वराचे आणि परत काल भैरव आणि योगेश्वरी चे दर्शन घ्यायचं असतं. कालभैरवाच्या दर्शनाने भूतपिशाच्च बाधा नाहीशी होते अशी भाविकांची धारणा आहे. देवालयाच्या शेजारील डोंगरावर चढून समुद्राकडील पायर्या उतरल्यावर शुक्ल तीर्थ लागते, येथे स्नान केल्यास सर्व पापांचा नाश होतो असे म्हणतात. शुक्ल तीर्थ या ठिकाणी गायत्री व सावित्री या नद्यांचा संगम आहे. अतृप्त आत्म्यांना मुक्ती देण्याचं गती श्राद्ध तसेच नारायण नागबळी, त्रिपिंडी श्राद्ध इत्यादी विधीही येथील शुक्ल तीर्थावर केले जातात. येथील पांडवतीर्थावर उत्तरक्रिया केल्या जातात.
हरिहरेश्वर परिसर निसर्गाने निर्मिलेले एक उत्कृष्ट शिल्प आहे. सागराच्या लाटांनी कातळाची झीज होऊन विविध आकाराची शिल्पे या परिसरात तयार झाली आहेत तर काही ठिकाणी प्रचंड आकाराच्या गुहा तयार झाल्या आहेत.
मंदिराच्या पश्चिमेस असलेल्या टेकड्या आणि पलिकडील समुद्रकाठ या सर्व परिसरात विष्णुपद, गायत्री तीर्थ, चक्रतीर्थ, सूर्य तीर्थ, यज्ञकुंड, विष्णुतीर्थ, ब्रह्मगुहा, कोसाची प्रदक्षणा इत्यादी धार्मिक ठिकाणे आहेत. सर्व ठिकाणच्या कालभैरवाच्या मूर्ती दक्षिणाभिमुख असतात मात्र हरीहरेश्वरचा कालभैरव मात्र उत्तराभिमुख आहे. हरिहरेश्वर मंदिराच्या पाठीमागे मारुतीचे मंदिर आहे व येथे यात्रेकरूंसाठी धर्मशाळा आहेत.
कालभैरव मंदिराच्या पूर्वेकडे प्रवेशद्वारावर गणेश मूर्तीच्या दोन्ही बाजूंना सोळाशे पंचेचाळीस वैशाख शुद्ध चे दोन शिलालेख आहेत यावरून दोन्ही मंदिराचा जीर्णोद्धार पहिल्या बाजीराव पेशव्याने सन १७२३ मध्ये केल्याचे स्पष्ट होते. कान्होजी आंग्रे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धारा साठी एक हजार रुपये दिले होते तसेच या मंदिराच्या पायऱ्या जावळीच्या चंद्रराव मोरे यांनी बांधल्या आहेत. पहिल्या माधवरावांची पत्नी रमाबाई पतीची प्रकृती सुधारावी म्हणून हरिहरेश्वरला आली होती असे उल्लेख मिळतात. रमाबाईंनी तिथे चौघडा इमारत बांधली होती. १७९३ साली इथलं जुने मंदिर जळाले पण सवाई माधवरावांच्या काळात ते पुन्हा बांधले गेले.
रायगड जिल्हा परिषदेने २१ जानेवारी १९७९ पासून चौघडा वादनासाठी पाच हजारांची तरतूद येथे केली. येथे महाशिवरात्री, कार्तिक शुद्ध एकादशी ते पौर्णिमा आणि कालाष्टमीला यात्रा असतात या काळात रात्री येथे असलेली तोफ उडवली जाते. ही प्रथा १७३३ सालापासून सुरू आहे. हरिहरेश्वर येथे निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केली आहे. आंबा नारळी-पोफळीच्या झाडांनी हा परिसर निसर्गरम्य वाटतो. इथला समुद्र मात्र काठावरच खोल असल्याने पर्यटकांनी समुद्रात पोहण्याचा मोह टाळणे कधीही योग्य.
- एस. एम. देशमुख (ज्येष्ठ पत्रकार)