जहाजासोबत जलसमाधी घेणारा भारतीय कप्तान
भारताला शौर्याची फार मोठी परंपरा आहे. भारत भूमी असो किंवा परकीय भूमी, पूर्वीपासूनच भारतीयांनी "पूर्वजांपरी आम्ही अजिंक्य संगरी" ही आपली परंपरा कायम राखली आहे. हीच परंपरा स्वातंत्र्यानंतरही भारतीयांनी कायम राखली व त्यापैकीच एक होते कॅप्टन...
भारताला शौर्याची फार मोठी परंपरा आहे. भारत भूमी असो किंवा परकीय भूमी, पूर्वीपासूनच भारतीयांनी "पूर्वजांपरी आम्ही अजिंक्य संगरी" ही आपली परंपरा कायम राखली आहे. हीच परंपरा स्वातंत्र्यानंतरही भारतीयांनी कायम राखली व त्यापैकीच एक होते कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला.
३ डिसेंबर १९७१ ला भारत विरुद्ध पाक युद्ध सुरू झालं. जसं हे युद्ध पूर्व-पश्चिम भूभागावर लढला जात होतं, तसंच दोन्ही बाजूच्या पाण्यावरही. दीवच्या नैऋत्येला साधारण ५६ किमी अंतरावर एक पाणबुडी लपून असल्याचे भारतीय नौदलाच्या रेडिओ यंत्रणेला आढळले. त्या पाणबुडीला नष्ट करण्यासाठी भारतीय युद्धनौकांचा ताफा निघाला. या ताफ्यात चार युद्धनौका होत्या.
९ डिसेंबरच्या पहाटे, पाकिस्तानी पाणबुडी "हॅंगोर"ला, दोन युद्धनौका (भा.नौ.पो. खुक्री व किरपाण) आपल्या टप्प्यात आल्याचे आढळले. पण त्या दोन्ही युद्धनौका व पाणबुडी यातील अंतर वाढल्याने पाणबुडीला त्यांवर हल्ला करता आला नाही.
त्याच संध्याकाळी हॅंगोर पाणबुडीला त्या युद्धनौका पुन्हा दिसल्या. खुक्री युद्धनौकेला पाणबुडी आपल्या आसपास असल्याचे कळलेच नाही व खुक्री खूप धीम्या गतीने पाणबुडीचा शोध घेत राहिली.
संध्याकाळी आठच्या सुमारास पाकिस्तानी पाणबुडीने भारतीय युद्धनौका 'किरपाण'वर पाणतीर (torpedo) सोडले. पण हा हल्ला अयशस्वी झाला व 'किरपाण'ने वेगाने दिशा बदलून हॅंगोरवर पाणबुडीविरोधी मोर्टारचा मारा सुरू केला. याच दरम्यान खुक्री वेगाने पाणबुडीच्या दिशेने जाऊ लागली व त्याच वेळी पाणबुडीने खुक्रीवर पाणतीरांचा मारा केला. ते पाणतीर खुक्रीच्या इंधनाच्या टाक्यांवर लागले व त्या टाक्यांचा स्पोट झाला. 'खुक्री'त पाणी भरू लागले.
जहाज बुडू लागल्याने जहाजाचे कप्तान महेंद्रनाथ मुल्ला यांनी जहाज सोडण्याचा आदेश दिला. जहाजावरील प्रत्येकजण आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होता. तर कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला अगदी शांत व संयमाने, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या नौसैनिकांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. जहाज बुडण्याच्या शेवटच्या क्षणी सुद्धा त्यांनी स्वतःचे लाईफ जॅकेट एका नौसैनिकाला दिले. जहाजावरील जास्तीत जास्त सैनिकांचे प्राण वाचावेत म्हणून काय करता येईल हे पाहण्यासाठी कॅप्टन मुल्ला जहाजाच्या पुलावर आले. पण थोड्याच वेळात त्यांचे जहाज पाण्यात पुरते बुडाले. तरीही कॅप्टन मुल्ला यांनी जहाज सोडले नाही. जहाजावरच राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला व थोड्याच वेळात कॅप्टन मुल्ला यांनाही जलसमाधी मिळाली.
खुक्री जहाजावरील १८ अधिकारी व १७६ नौसैनिकांना आपले प्राण गमवावे लागले. कॅप्टन मुल्ला यांनी "कप्तान कधीच जहाज सोडून जात नाही" या नौदल उक्तीचे पालन केले व आपल्या बलिदानाने भारतीय नौदलाची की परंपरा कायम ठेवली.
कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला यांनी दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांना युद्धकाळातील दुसरे सर्वोच्च पदक महावीर चक्र (मरणोत्तर) देऊन गौरवण्यात आले. कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला यांचे बलिदान नेहमीच भारतीय पिढ्यांना प्रेरित करीत राहील.