अनंत कोटी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी महाराज हे श्री दत्तात्रयाचे अवतार म्हणून गणले जातात. ऐतिहासिक दृष्टिने पाहता दत्त परंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे 'श्रीपादश्रीवल्लभ' होत. त्याच प्रमाणे तेच पुढे 'नृसिंहसरस्वती' या नावाने जन्मास आले आणि त्यानंतर सुमारे ३०० वर्षांनी स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज प्रकट झाले.

अनंत कोटी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ
अनंत कोटी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ

दत्त संप्रदाय हा सर्वात प्राचीन सर्वात अधिक लोकाभिमुख आहे. त्याची खास अशी वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळेच अजुनही दत्त संप्रदाय प्रवाही स्वरूपात जिवंत आहे. महाराष्ट्रातूनच या संप्रदायाचे मुख्यतः प्रवर्तनआणि प्रचलन झाले आहे.

श्री स्वामी महाराज हे श्री दत्तात्रयाचे अवतार म्हणून गणले जातात. ऐतिहासिक दृष्टिने पाहता दत्त परंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे 'श्रीपादश्रीवल्लभ' होत. त्याच प्रमाणे तेच पुढे 'नृसिंहसरस्वती' या नावाने जन्मास आले आणि त्यानंतर सुमारे ३०० वर्षांनी स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज प्रकट झाले. श्री स्वामी समर्थांच्या अवतारा विषयी एक हकिकत सांगितली जाते.

'लाकुडतोड्या एके दिनी। सहज आला त्याच वनी॥ वृक्षावरी घाव घालोनी। डहाळी झणी पाडिली॥ डहाळी पडताच सकळ| ढासळून गेले वारूळ फार जुनाट मूर्ती सोज्वळ। बाहेर तत्काळ निघाली॥'

अशा प्रकारे श्री नृसिंहसरस्वती ज्या कर्दळीवनातून गुप्त झाले होते, त्या कर्दळीवनातून श्री स्वामींचे अवतारित्व प्रकटले. श्री स्वामी समर्थांचे प्रकट वास्तव्य एकूण ४० वर्षे असून त्यातील २१ वर्षे त्यांनी अक्कलकोट येथे वास्तव्य केले. अक्कलकोट येथील त्यांच्या वास्तव्यात त्यांनी दत्तसंप्रदाय बराच वाढविला. श्री स्वामी समर्थांची कांती दिव्य, तेज पुंज होती. शरीराचा वर्ण गोरा होता. ते अजानुबाहु होते.

'तदेजति तन्तेजति तददुरे तद्वन्तिक। तदन्तरस्य सर्वस्य तदु सर्वस्थास्य बाह्यतः ।।

स्वामी समर्थांच्या बाबतीत फक्त त्यांचा देह दिसत होता. एवढेच, पण बाकी सर्व वरील पक्तींमध्ये सांगितल्याप्रमाणेच अव्यक्त! आत्मगुणांची मांदियाळी त्यांच्या ठायी सदैव विलसत असे. अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. तेथून पुढे वटवृक्षाखाली येऊन त्यांनी तप साधना केली. आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेकविध चमत्कार केले. श्री स्वामी समर्थांचे संपूर्ण जीवन सिद्धपुरुषाचे असल्याने त्यांचे चरित्र म्हणजे अनुभव कथाच होत. श्री स्वामींच्या अनेक चरित्रकारांनी ही चमत्काराची अनुभव कथा अत्यंत रसाळपणाने, प्रेमाने आणि अपार श्रद्धेने मांडलेली आहे.

'मेलेल्या उंदराला जिवंत केले. गाय दुधाळ केली, नरसाप्पा सुताराच्या म्हशीची वासरे जगविली, रिकाम्या चिलीमीतून धूर काढला, पाटावर पाऊले उमटवली मठास कुलूप असतानाही स्वामी पाऊल बाहेर आले असे अनेक चमत्कार त्यांनी केले. चमत्कारामागे भक्तांची श्रद्धा वाढावी, ती दृढ़ व्हावी व त्यात आनंद प्राप्ती व्हावी हाच त्यामागे स्वामींचा हेतू असे. श्री स्वामी समर्थांच्या अनेक चमत्कार कथांतून त्यांचे विषयीची श्रद्धा दृढावते आणि नामघोषाचे सातत्य पुन्हा पुन्हा भक्तांच्या अंतकरणात ठसत जाते.

श्री स्वामी समर्थांनी जो उपदेश केला, त्यात त्यांनी नामस्मरणाला सर्वाधिक महत्त्व दिले.

'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे'

हे त्यांचे आश्वासनही नामजप करता क्षणी 'मी तुझ्या सन्मुख आहे' हेच भक्तीतत्व सांगते.

श्री स्वामींनी आपल्या प्रकट वास्तव्यातील ४० पैकी २१ वर्षे अक्कलकोट येथे घालविली. शके १८०० मध्ये त्यांनी वडाखाली देहत्याग केला व ते निजानंदी निमग्न झाले. या भूतलावर ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थांच्या स्वरूपात प्रत्यक्ष वावरले. मानवाच्या कल्याणासाठी त्यांनी अविरत भ्रमंती केली. अनेकांवर कृपा दृष्टी केली. कित्येकांना मोक्षपदाला नेले. जगाच्या अंतापर्यंत साक्ष राहिल असे अनेक चमत्कार स्वामींनी केले. स्वामी समर्थ हे एक भारतीय जीवनाचाच अविष्कार होते. म्हणून त्यांचे जीवन हे भारतीयांच्या विचाराचेच खरे विकसित आणि मुर्त प्रतिक आहे. श्री स्वामी समर्थ म्हणजे प्रवृत्तींची गंगा, निवृत्तींची यमुना आणि ज्ञानाची सरस्वती यांचा त्रिवेणी संगम होय. श्री स्वामी समर्थांचे जीवन हे एका व्यक्तीच्या परिधान सामावणारे नसून ते साऱ्या जीवकोटीला व्यापून उरणारे असे जीवनाचे 'महाभाष्य' आहे. 'जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती' या उक्तीप्रमाणे भक्तांना सुख, आनंद, शांती प्राप्त व्हावी म्हणूनच सत्पुरुष युगानुयुगे अवतार घेत राहतात. श्री स्वामी समर्थांचे अवतार कार्य ही अखंडपणाने सुरू आहे.

'सदगुरू कृपेवीण काही। भवतरणोपाव तो नाही॥ या कारणे लवलाही। सदगुरू पाय सेवावे।।'

- श्री उदय कळस