जेव्हा सुभाषचंद्र बोस यांनी केली होती ब्रिटीश प्राध्यापकाची धुलाई

सदर आठवण हे नेताजींचे सहअध्यायी कै. सतिशचंद्र चणगिरी यांनी सांगितली होती, १९१६ साली जेव्हा चणगिरी प्रेसिडेन्सी कॉलेजला तिसर्‍या वर्षास होते तेव्हा मधल्या सुट्टीच्या वेळी सर्व विद्यार्थी एका वर्गात गप्पा मारण्यासाठी जमत.

जेव्हा सुभाषचंद्र बोस यांनी केली होती ब्रिटीश प्राध्यापकाची धुलाई

नेताजी सुद्धा त्यामध्ये सहभागी होत असत. त्या काळातही बोस यांच्या प्रतिमेने सर्व विद्यार्थी भारावून जात आणि त्यांना सर्व आपले पुढारी मानत. एकदा कॉलेजतर्फे चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला गेला व त्यास सर्व विद्यार्थांना बोलावण्यात आले. त्या प्रसंगी एक ब्रिटीश प्राध्यापक ई.एफ. ऑटन हे भाषण देण्यासाठी उभे राहीले आणि त्यांनी उद्धटपणे भारतातील लोकांच्या चारित्र्याबद्दल अत्यंत तिरस्करणीय असे उद्गार काढले.

सर्व विद्यार्थी त्यांचे बोलणे दुरुत्तर न करता मुकाट्याने ऐकत होते. परंतु बोस हे या सर्वांहून निराळे होते त्यामुळे अशा या अपमानकारक भाषणामुळे ते प्रचंड संतापले आणि मागून येऊन काही न बोलता प्राध्यापक ऑटन यांना फटकावले आणि त्यांना खालच्या मजल्याकडे ढकलून दिले. यानंतर कॉलेज परिसरात प्रचंड गोंधळ माजून चौकशीचे आदेश दिले गेले.

यावेळी कॉलेजचे प्राचार्य जामेस यांनी कॉलेजचे फाटक बंद करुन सर्व विद्यार्थ्यांना आत कोंडले व हल्लेखोर कोण आहे ते शोधून काढायला सर्वांना बजावले. शेवटी खालच्या वर्गातील एका विद्यार्थ्याच्या साक्षीने बोस यांना या प्रसंगाचे सुत्रधार ठरवण्यात आले. मात्र या प्रसंगातून आणखी एक प्रसंग उद्भवला.

गव्हर्नमेंट सुपरिटेंडेंट ऑफ एज्युकेशनने या प्रकरणाच्या मुळाशी कोण आहे याचा तपास सुरु केला व कॉलेजच्या प्राचार्यांना या प्रकरणी रिपोर्ट देण्याबद्दल सांगितले मात्र त्यास प्राचार्यांनी विरोध केला. मात्र मला सुपरिटेंडेंट च्या हुकूमाची गरज नाही व या प्रकरणाची चौकशी करण्यास प्राचार्य समर्थ आहे असे उत्तर त्यास दिल्याने दोघांमध्ये वादावदी होऊन प्राचार्यांनी सुपरिटेंडेंट यांना फटकावले.

या सर्व प्रकारामुळे दोन गोष्टी घडल्या एक म्हणजे प्राचार्यांना तत्काळ बडतर्फ करण्यात आले आणि बोस यांना कॉलेजमधून काढून टाकण्यात आले.

१९१६ साली घडलेली ही घटना म्हणजे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतली एक महत्वाची ठिणगी असेच म्हणावे लागेल.

मुळ लेखन - तत्सऊ हयाशिदा |अनुवाद - गौतम पंडीत