जमदग्नी ऋषी - परशुरामाचे पिता

जमदग्नी हा अत्यंत कोपिष्ट ऋषी असल्याचे संदर्भ जुन्या धर्मग्रंथांत आढळतात. एकदा त्याच्या कोपाचा अनुभव खुद्द त्याच्या कुटुंबास भोगावा लागला.

जमदग्नी ऋषी - परशुरामाचे पिता

Marathi Buzz Shop

Marathi Buzz Shop

एखादा मनुष्य शीघ्रकोपी असला की त्यास आजही जमदग्नीचा अवतार म्हणायची पद्धत आहे मात्र ज्या जमदग्नी वरून ही पद्धत सुरु झाली आहे तो जमदग्नी कोण हे जाणून घेतल्यावरच या म्हणीचा अर्थ खऱ्या अर्थाने समजू शकेल.

जमदग्नी हे हे प्राचीन काळातील एका ऋषीचे नाव असून तो परशुराम याचा पिता व रेणुका हिचा पती होता. वारुणी भृगु कुळात जन्मलेल्या ऋचिक नामक ऋषीचा जमदग्नी हा पुत्र असून त्यास अर्चिक असेही नाव होते.

जमदग्नीची पत्नी रेणुका ही प्रसेनजीत राजर्षी रेणूची कन्या असून रेणुकेपासून जमदग्नीस एकूण पाच पुत्र झाले होते व त्यांची नावे रुमण्वन, सुषेण, वसुमान, विश्वावसू आणि राम (परशुराम) अशी होती. पाच पुत्रांपैकी राम हा परशुधारी असल्याने त्यास परशुराम म्हणून प्रसिद्धी मिळाली.

जमदग्नी हा अत्यंत कोपिष्ट ऋषी असल्याचे संदर्भ जुन्या धर्मग्रंथांत आढळतात. एकदा त्याच्या कोपाचा अनुभव खुद्द त्याच्या कुटुंबास भोगावा लागला. एके दिवशी रेणुका आश्रमाजवळील नदीवर स्नान करण्यास गेली असता तेथे चित्रवत नामक मर्तिकावतक देशाचा राजा आपल्या बायकांसहित जलक्रीडेस आला होता व हे दृश्य पाहता पाहता रेणुकेस आश्रमात येण्यास थोडासा उशीर झाला.

रेणुकेस उशीर झाल्याने जमदग्नी अत्यंत संतप्त झाला व त्याने रागाच्या भरात आपल्या पुत्रांस तिचा वध करण्याचा हुकूम दिला मात्र स्वतःच्या मातेची हत्या करणे म्हणजे सर्वात मोठे पाप म्हणून सर्व पुत्र शांत राहिले त्यामुळे जमदग्नीने संतापाच्या भारत सर्वांना पाषाणासारखे केले मात्र सर्वात लहान पुत्र परशुराम यावेळी जंगलात गेला होता त्यामुळे तो या कोपापासून वाचला.

परशुराम जेव्हा अरण्यातून परत आला त्यावेळी जमदग्नीने परशुरामासही तीच आज्ञा केली व यावेळी परशुरामाने रेणुकेचा वध केला. आपल्या लहान पुत्राने आपले ऐकल्याने प्रसन्न होऊन जमदग्नीने त्यास वर दिला व म्हणाला की तुला जे हवे ते माग व यावेळी परशुरामाने आपल्या पित्याकडे हा वर मागीतला की माझी माता आणि भाऊ पुन्हा पाहिल्यासारखे व्हावेत आणि यानंतर मी माझ्या मातेचा वध केल्याची आठवण माझ्या स्मृतीतून कायमची नाहीशी व्हावी याशिवाय आपण आपला रागीट स्वभाव कायमचा सोडावा. जमदग्नीने प्रसन्न होऊन परशुरामास वर दिला आणि रेणुका व परशुरामाचे चारही बंधू तात्काळ जीवित झाले. 

आपल्या पुत्राच्या सांगण्यानुसार जमदग्नीने क्रोधाचा त्याग केला त्यामुळे क्रोध नामक देवतेने त्याची एकदा परीक्षा पाहायची ठरवली आणि एके दिवशी जमदग्नीच्या आश्रमात पितृकार्य सुरु असताना क्रोधदेवतेने सर्परुपात तेथे येऊन पितरांच्या प्रसादावर विष टाकले जेणेकरून जमदग्नी क्रोधीत होतो का हे तिला पाहायचे होते मात्र यावेळी जमदग्नी क्रोधीत झाला नाही आणि त्याने तिला शांतपणे सांगितले की हा अपराध तू माझा नाही तर माझ्या पितरांचा केला आहेस. हे पाहून क्रोधदेवता प्रसन्न झाली आणि प्रसाद पुन्हा पूर्वीसारखे करून अदृश्य झाली.

यानंतर बऱ्याच काळाने सोमवंशातील एक प्रसिद्ध राजा कार्तिवीर्य अर्जुन अर्थात सहस्त्रार्जुन आपल्या सैन्यासहित जमदग्नीच्या आश्रमास आला व यावेळी जमदग्नीने कामधेनू नामक एका गायीच्या योगे सर्वांचा उत्तम आदरसत्कार केल्याने कार्तिवीर्यास कामधेनूचे हरण करण्याची इच्छा झाली व त्याने त्या कामधेनूचे हरण करून तिला आपल्या राज्यात घेऊन गेला मात्र यावेळी सुद्धा जमदग्नि शांत राहिला मात्र परशुराम आश्रमात आला असता त्यास कामधेनूच्या अपहरणाबद्दल समजले आणि आपण दिलेल्या वाचनामुळे आपले पिता शांत राहिले आणि त्यामुळे कार्तिविर्यने कामधेनूचा अपहरण केले हे लक्षात येऊन त्याने कार्तिवीर्यार्जुनच्या राज्यावर हल्ला करून कार्तिवीर्यार्जुनाचा वध केला आणि कामधेनूस सोडवले व पुन्हा एकदा आश्रमात आणले.

कार्तिवीर्यार्जुनाच्या पुत्रांनी आपल्या पित्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी पुन्हा एकदा जमदग्नीच्या आश्रमावर हल्ला केला मात्र यावेळी परशुराम तेथे नसल्याने कार्तिवीर्यार्जुनाच्या पुत्रांनी जमदग्नी ऋषीची हत्या केली मात्र परशुराम परत आल्यावर त्याने जमदग्नीस पुन्हा जिवंत करून पृथ्वी निःक्षत्रिय करण्याची प्रतिज्ञा केली.