चांदोरे - पाताळात दडलेला ऐतिहासिक ठेवा

रायगड जिल्हा हा ऐतिहासिक ठेव्यांनी समृद्ध असा जिल्हा आहे, मात्र आजही येथे अशी अनेक ऐतिहासिक महत्व असलेली ठिकाणे आहेत जी उजेडात यायची आहेत.

चांदोरे - पाताळात दडलेला ऐतिहासिक ठेवा
चांदोरे येथील उत्खननात मिळालेले अवशेष

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

आमच्या युट्युब चॅनलला आजच सबस्क्राईब करा

रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातल्या चांदोरे या लहानशा गावात गेल्या वर्षापासून मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल विभागाकडून इंडियन स्टडी सेंटर (इंस्टुसेन) या संस्थेच्या मदतीने सुरु असलेल्या उत्खनामुळे चांदोरे या गावाचाच नव्हे तर रायगड जिल्ह्याचाही पाताळात दडलेला वैभवशाली इतिहास जगासमोर येण्याची सुरुवात झाली आहे.

मुंबई किंवा पुण्याहून साई-मोरबा मार्गे दिवेआगर्-हरिहरेश्वर्-म्हसळा किंवा श्रीवर्धन येते जाताना वाटेतच चांदोरे गावाचा थांबा दिसतो, मात्र वाहनातून निरिक्षण केल्यास या गावाचे महत्त्व लक्षात येत नाही यासाठी या गावाचा संपुर्ण फेरफटका मारणे अगत्याचे ठरते. चांदोरे गावात पुर्वीपासून काही पुरातन अवशेष अस्तिवात आहेत असा येथील ग्रामस्थांचा विश्वास होता मात्र सखोल संशोधनाशिवाय ते सिद्ध करता येणे शक्य नव्हते. गावाची लोकसंख्या तशी कमीच, बरेचसे नागरिक नोकरी व्यवसायानिमित्त शहरी गेलेले. मात्र इतिहासाविषयी उत्सुकता व जागरुकता असल्याने चांदोरेकरांच्या सहकार्याने मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल विभागास इंडियन स्टडी सेंटर (इंस्टुसेन) या संस्थेच्या मदतीने येथे उत्खनन करण्यास वाव मिळाला एवढेच नव्हे तर येथील नागरिकही या उत्खननाच्या कार्यात सहभागी झाले, मुंबई किंवा इतर ठिकाणाहून उत्खननासाठी येणारे संशोधक के चांदोरे गावाचा अविभाज्य घटकच झाले आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही अर्थात याबद्दल चांदोरे गावच्या ग्रामस्थांचे अभिनंदन केले पाहीजे.

चांदोरे गावात उतरल्यावर डावीकडे म्हणजे पुर्वेकडे जो रस्ता जातो त्या ठिकाणी हे उत्खनन चालू असून अनेक नवीन गोष्टींचा शोध लागत आहे. डावीकडल्या रस्त्यावरुन चालायल लागल्यावर प्रथम दिसतो तो विस्तिर्ण असा जलाशय. लालबुंद मातीच्या पार्श्वभुमीवर हिरव्या रंगाने आच्छादलेला हा जलाशय डोळ्याचे पारणे फेडतो. जलाशये, विहीरी या गावाच्या पाण्याचा प्रमुख स्त्रोत, चांदोरेसारख्या लहानशा गावात असलेला एवढा विस्तीर्ण जलाशय हेच सुचवितो की चांदोरे हे गाव एकेकाळी नक्कीच खुप वैभवसंपन्न व भरभराटीत असावे, चांदोरे गावाच्या ज्ञात इतिहासाबाबत अजुन बरीच माहिती प्रकाशझोतात यायची आहे मात्र या गावाचे पुर्वीचे नाव चंद्रपुर असावे असा कयास बांधता येवू शकतो, शिलाहारांच्या ताम्रपटांत व शिलालेखांत अनेकवेळा चंद्रपुर असे उल्लेख येतात अर्थात चांदोर या नावाची अनेक गावे अस्तित्वात आहेत मात्र यातील काही उल्लेख हे माणगाव तालुक्यातल्या चांदोरेचे असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

या जलाशयाच्या कडेने चालत गेल्यावर प्रथम दिसते ते एक शिवमंदीर, कौलारु छप्पर असलेले हे शिवमंदीर पाहण्यासारखे आहे. याच शिवमंदीरात चांदोरे परिसरात उत्खनन चालू असताना सापडलेल्या काही प्राचिन सतीशिळा, विरगळी व मुर्त्या पहायला मिळतात. येथे पहावयास मिळणारी शेषशायी विष्णूमुर्तीरायगड जिल्ह्यात क्वचितच सापडेल. ही मुर्ती पाहता या परिसरात प्राचिन काळी वैष्णवपंथिय साम्राज्याचा निवास असेल हे लक्षात येते अर्थात या मुर्तीची रचना ही चालुक्यांच्या स्थापत्यशैलींशी जुळणारी असल्याने इसवी सनाच्या ७व्या शतकापासून ८व्या शतकापर्यंत रायगड जिल्ह्यावर ज्यांनी राज्य केले अशा चालुक्य राजघराण्याच्या बदामी शाखेचा या गावातील स्थापत्यशैलींशी संबध असण्याची शक्यता बळावते. सन ७५३ मध्ये राष्ट्रकुट सम्राट दंतीदुर्गाने चालुक्य राजघराण्याची इतिश्री केली. चालुक्य राजघराणे हे वैष्णव असल्याने त्यांच्या स्थापत्यशैलीमध्ये विष्णूची रुपे पहावयास मिळतात. राष्ट्रकुटांनी चालुक्यांविरुद्ध मदत केल्याबद्दल शिलाहार राजघराण्यास पुर्ण कोकणाची सत्ता दिली त्यामुळे कालांतराने या परिसरावर शिलाहारांचे वर्चस्व प्रस्थापित झाले जे ३०० वर्षांहून अधिक काळ टिकले. येथे पहायला मिळणारी मिळणार्‍या सतीशिळा व विरगळी ही याच गावात झालेल्या एका महासंग्रामाच्या प्रतिक आहेत ज्यामध्ये चांदोरे गावाचे जुने वैभव नष्ट झाले असावे. येथील विरगळीवरील दृश्याचे निरिक्षण केल्यास युद्धाचा प्रसंग कोरलेला आढळून येतो, पुर्वी युद्धामध्ये पराक्रम दाखवून धारार्तिथी पडलेल्या सैनिकांचे, सरदारांचे अथवा राजाचे स्मारकाप्रित्यर्थ विरगळी तयार करण्यात येत असत, ज्यामध्ये तत्कालिन युद्धाचे जीवंत प्रसंग कोरले जात. चांदोरेच्या विरगळीमध्ये दाखालेल्या प्रसंगात दोन अश्वारुढ व्यक्ती हातात भाले अथवा तरवार घेऊन सैन्याच्या वेढ्यात लढाई करताना दाखवल्या आहेत. यातील एक व्यक्ती तर स्त्रीसदृश्य वाटते. याचा अर्थ इतक्या पुरातन काळी सुद्धा स्त्रीया पुरुषांच्या बरोबरीने युद्धात भाग घेऊन आपल्या शौर्यत्वाची प्रचिती देत असत. तसेच याच प्रसंगाच्या वर कोरलेल्या दृश्य हे समुद्रमंथनाचे असावे कारण या संग्रामाची तुलना स्थापत्याने देव्-दानव संघर्षाबरोबर केली असण्याची शक्यता आहे.

याशिवाय येथे दिसून येणारी सतीशिळा ही केवळ सतीशिळा नसून महासतीशिळा असावी कारण या शिळेवर कोरलेला प्रसंग हा कुणा मातब्बर राजघराण्याच्या स्त्रीच्या सती जाण्याचा आहे कारण यात कोरलेली स्त्री ही घोड्यावर आरुढ होऊन सती जाताना दाखवलेली आहे तसेच खालील प्रसंगात आपल्या मृत पतीच्या चितेवर बसलेली पत्नी व एकदम वरील दृश्यात स्वर्गारोहण करताना हात जोडून निरोप देणारे जोडपे असे हे दृश्य आहे याचा अर्थ ज्या महासंग्रामावर आधारित या विरगळी आहेत त्याच महासंग्रामत धारातिर्थी पडलेल्या महत्त्वाच्या सेनानीच्या पत्नीची ही सतीशिळा आहे. याशिवाय येथे गणपती तसेच इतर देवतांच्या भग्नावस्थेतल्या मुर्त्या सुद्धा आढळून येतात.

या मुर्त्या पाहून आपण मंदीराबाहेर येऊन त्याच रस्त्यास लागलो की काही अंतरावर डाव्या बाजुला पुरातन अवशेष असल्याचा भास होतो अर्थात हेच ते ठिकाण जेथे सध्या उत्खनन चालू आहे. रस्ता सोडून आपण खाली उतरलो कि भरलेल्या गवतातून जाणार्‍या रस्त्याचा आजुबाजुला काही जुन्या घरांची जोती दिसून येतात तसेच उजव्या बाजुस एक भग्नावस्थेतला नंदी दिसून येतो, हे शिवमंदीराचे अवशेष असावेत हे लक्षात येण्यास वेळ लागत नाहीत. याच शिवमंदीरासमोर एक भलीमोठी जांभ्या दगडात खोदून काढलेली पायर्‍यांची विहीर अर्थात पुष्करणी आहे, या विहीरीत जाण्यास रस्ता आहे व याच रस्त्यात काही कोनाडे कोरले आहेत ज्यातल्या एका कोनाड्यात उमा माहेश्वराची मुर्ती दिसून येते. मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल विभागाकडून इंडियन स्टडी सेंटर (इंस्टुसेन) या संस्थेच्या मदतीने सुरु असलेले उत्खनन ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे ते पुरातत्ववेत्ते व त्यांच्या सहकार्‍यांनी या संपुर्ण पुष्करणीचा तळ शोधून अनेक प्राचिन अवशेष अवगत केले आहेत ज्यांच्यावर सध्या अभ्यास सुरु आहे.

चांदोरे गाव ज्या डोंगररांगेत स्थित आहे त्याच डोंगररांगेत म्हसळ्याच्या दिशेने गेल्यास नवघर नावाचे एक गाव लागते तिथे अमृतेश्वर हे प्राचिन व सुरेख असे शिवमंदीर आहे, या शिवमंदीराचा व चांदोरे येथील पुरातत्वाचा काळ एकच असण्याची शक्यता आह. कारण ज्या प्रकारचा नंदी चांदोरे येथे आहे त्याच प्रकारचा एक नंदी अमृतेश्वर मंदीराबाहेर सुद्धा आहे. रायगड जिल्ह्यात अशी अनेक ठिकाणे आहेत ज्यांच्या प्राचिन व वैभवशाली इतिहासावर प्रकाश पडावयाचा आहे. चांदोरे गावाकडे आज जिज्ञासू पर्यटकांचा ओघ वाढला आहे, लांबुन लांबुन अगदी परदेशातून पर्यटक हे प्राचिन वैभव पाहण्यासाठी गावास भेट देत आहेत व चांदोरे गावातले नागरिक त्यांना आस्थेवाईपणे मार्गदर्शन करत आहेत. चांदोरे गावच्या उत्खननासोबत रायगड जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा शोधून काढण्याच्या पर्वास सुरुवात झाली आहे व भविष्यात याचा फायदा रायगड जिल्ह्याच्या स्थानिक पर्यटन विकासाला व रोजगारास होईल अशी आशा करुयात.